अपमानित स्थितीत, स्वत:हून पक्ष सोडला, तर उद्याच्या अस्तित्वाला कोणतीच प्रतिष्ठा राहणार नाही, याची कदाचित मनोहर जोशी यांना खात्री असावी. त्यामुळेच, आपले स्थान आता उरणार नाही, हे ओळखूनही त्यांनी स्वत:हून बाजूला होणे धोरणीपणाने टाळले. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मवाळ आहे, असा सूर त्यांनी लावला, तेव्हाही त्यांना भविष्याची जाणीव नव्हती असे नाही..
दादरच्या ‘अहमद सेलर’ चाळीत अनेक कुटुंबांचा पिढय़ापिढय़ांचा जिव्हाळा दाटून राहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी, या अहमद सेलरमधील एक संध्याकाळ अशाच एका कौटुंबिक सोहळ्यानं रंगीबेरंगी झाली. निमित्त होतं, चाळीत राहणाऱ्या, राहिलेल्या आणि चाळीशी नातं जडलेल्या ‘माहेरवाशां’च्या संमेलनाचं! सगळे जुने, नवे चाळकरी गच्चीत जमले आणि सोहळा सुरू झाला. तरी कुणी तरी कमी असल्याचं सगळ्यांनाच जाणवत होतं. सगळ्यांचे डोळे जिन्याकडे लागले होते. औपचारिक कार्यक्रम संपले आणि अचानक कसली तरी चाहूल लागल्यासारखा एक जण कठडय़ाकडे धावला. त्यानं खाली बघितलं आणि तो ओरडला.. ‘सर आले!’
मग सगळे जण कठडय़ाशी जमा झाले. खाली रस्त्यावर एक दिमाखदार ‘मर्सिडीझ’ उभी होती. सर दिमाखात गाडीतून उतरत होते. जमिनीवर पाऊल टेकताच त्यांनी सहज वर बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उजळलं. मग झपाझप जिने चढून सर वरती आले आणि गप्पा रंगल्या. मग, सारा कार्यक्रम सरांभोवती एकवटला. सर एकएक आठवणी सांगू लागले. अहमद सेलरमधील आठवणींचा एक खजिना त्यांच्या तोंडून खुला होऊ लागला आणि बोलता बोलता सरांनी आपलं मन मोकळं केलं.
‘एक जुनाट फियाट ते एक आलिशान मर्सिडीझ’ असा प्रवास सहजपणे सांगताना, सरांनी जणू आपल्या कारकिर्दीचा प्रतीकात्मक पटच चाळकऱ्यांसमोर उभा केला होता.. सर बोलू लागले आणि सगळ्यांच्या डोळ्यांपुढून सरांच्या उत्कर्षांचा आलेख सहजपणे सरकू लागला. ‘कोहिनूर क्लास’चा चालक ते ‘कोहिनूर समूहा’चा मालक, शिवसेनेचा नगरसेवक, मुंबईचा महापौर, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाच्या लोकसभेचा अध्यक्ष.. ‘फियाट ते मर्सिडीझ’ या टप्प्यांशी समांतर वाटावा, असाच हा प्रवास होता. त्याचे आपण साक्षीदार आहोत, या जाणिवेने अहमद सेलरचे रहिवासी सुखावत होते आणि सर आपल्या अहमद सेलरच्या आठवणींमध्ये रमले होते, बोलत होते..
हे ‘सर’ म्हणजे, मनोहर जोशी!.. शिवसेनेचा चालताबोलता इतिहास आणि शिवसेनेचे प्रत्यक्ष वर्तमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जायचे, ते मनोहर जोशी. बाळासाहेब ठाकरे यांचे पहिल्या क्रमांकाचे विश्वासू नेते आणि शिवसेनेचा चाणक्य, प्रिन्सिपॉल, डॉ. मनोहर जोशी!
शिवसेनेच्या स्थापनेआधी, केवळ ‘कोहिनूर क्लास’चे चालक असलेल्या मनोहर जोशींना म्हणे, बाळासाहेबांनी एका अडचणीच्या क्षणी मदतीचा हात दिला आणि मनोहर जोशी बाळासाहेबांचे भक्त झाले. ते त्यांची सावली झाले. त्यामुळे, शिवसेनेच्या वाटचालीतील प्रत्येक पायरीवर, बाळासाहेबांशेजारी मनोहर जोशी यांना पाहण्याची शिवसैनिकांना जणू सवयच होऊन गेली होती.
इतके ‘अंतर्बाह्य़ शिवसैनिक’ असलेल्या मनोहर जोशींनाच, शिवसेनेचे अंतरंग, शिवसैनिकाची नस नेमकी माहीत असणार, असा सगळ्या मराठी मानसाचा समज होता. त्यामुळेच, शिवसेनेवर बोलण्याचा एकमेव अधिकार त्यांच्याकडे सहजपणे चालून आला होता. त्यातूनच त्यांनी शिवसेनेवर संशोधन प्रबंध लिहिला आणि चिकित्सा करण्याची हिंमतही न दाखविता त्यांना मुंबई विद्यापीठाने त्यावर डॉक्टरेट बहाल केली. शिवसेनेच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा एक ऐतिहासिक दस्तावेज डॉ. मनोहर जोशी यांनी निर्माण केला. ‘शिवसेना- काल, आज आणि उद्या’ या नावाचा एक हजार पानांचा हा शोधनिबंध म्हणजे, शिवसेना आणि मनोहर जोशी यांच्या एकत्रित वाटचालीचा ऐतिहासिक साक्षीदारही ठरला..
‘शिवसेनेचा भविष्यकाळ मी किती पाहणार आहे, याची मला कल्पना नाही, परंतु भूतकाळ आणि वर्तमानकाळ मात्र मी शिवसेनेसोबत जगलो आहे.’ हे त्या पुस्तकात पाच वर्षांपूर्वी डॉ. मनोहर जोशी यांनी व्यक्त केलेले मनोगत.. आज मागे पाहताना, मनोहर जोशींना भविष्याचा अंदाज आला होता का, असे वाटू लागते. या पुस्तकात आपले व्यक्तिगत भाष्य त्यांनी कटाक्षाने टाळले आहे. जे घडले, तसे वाचकांसमोर ठेवणे हा त्यांचा उद्देश होता, असे ते सांगतात, पण शिवसेनेच्या ‘उद्या’वर मात्र, काही मान्यवरांनाच या पुस्तकात मनोहर जोशी यांनी लिहिते केले. कदाचित, त्या वेळीच भविष्याचे काही आडाखे त्यांनी स्वत:शी बांधून तयार ठेवले असावेत, इतक्या सहजपणे त्यांनी शिवसेनेच्या भविष्यकाळापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.
मनोहर जोशी जे ठरवतात, तसेच घडवूनही आणतात, असेही त्यांच्याविषयी बोलले जाते. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात रविवारी झालेल्या दसरा मेळाव्यात जे काही घडले, ते अनेकांसाठी अनपेक्षित असले, तरी मनोहर जोशींना त्याचा धक्का बसला असेल असे मानण्यास त्यांना जवळून ओळखणारे अनेक जण तयार नाहीत, ही ‘अंदरकी बात’ आहे. नेहमी बाळासाहेबांसोबत सावलीसारखे वावरणारे मनोहर जोशी यांच्या बाळासाहेबांच्या कोणत्याही सभेतील भाषणाची वेळ नेमकेपणाने ठरविली जात होती, हेही काही मोजक्यांनाच माहीत आहे. बाळासाहेबांच्या आगमनाची वर्दी आली, बाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, सभेतील गर्दीतून ‘क्षत्रिय कुलावतंस’चा टिपेच्या सुरातील नारा घुमू लागला, की माइकसमोर असलेले मनोहर जोशी काही काळ भाषण थांबवत असत.. मग बाळासाहेबांचे मंचावर आगमन होईपर्यंतचा सारा माहोल संपल्यानंतर सरांचे पुढचे भाषण सुरू व्हायचे आणि त्या वातावरणातच ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत सर भाषण संपवून बाळासाहेबांच्या शेजारी बसायचे. मनोहर जोशींच्या भाषणाच्या वेळेचा हा मान मात्र, कुणीच हिरावून घेऊ शकत नव्हता.. नंतरही जेव्हा जेव्हा शिवसेनेकडे ‘मानाची पाने’ चालून आली, तेव्हा तेव्हा त्यावर मनोहर जोशींचाच हक्क जणू ठरून गेला..
नारायण राणे यांची हकालपट्टी आणि राज ठाकरे यांच्या पक्षत्यागानंतर या पुस्तकाविषयी एका पत्रकाराशी गप्पा मारताना, ‘उद्याच्या शिवसेनेबद्दलची शंभर पाने पुस्तकातूनच वगळा’ असा सल्ला त्या पत्रकाराने मनोहर जोशी यांना दिला होता. तेव्हा त्याचा आपल्याला राग आला होता, असे जोशी म्हणतात. पण अशा लोकांसाठीच हे पुस्तक लिहायचेच असे त्यांनी पक्के ठरविले आणि पुस्तक पूर्ण झाल्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षांतच, भविष्यकाळाची दिशा बदलली..
मनोहर जोशी यांचे शिवसेनेतील स्थान घसरत चालले आहे, अशी चर्चा सुरू झाली, त्याच्या किती तरी अगोदर स्वत: जोशी यांना त्याची स्पष्ट जाणीव असणार, याची त्यांना नेमके ओळखणाऱ्या अनेकांची खात्रीच आहे. दादरमधील ‘फलकबाजी’च्या प्रकरणानंतर, उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी तक्रार करून मिळालेल्या प्रतिसादावरून मनोहर जोशी यांनी तशी खातरजमा करून घेतली असावी. त्या वेळी मनात मांडलेल्या भविष्यकाळाचे त्यांना स्पष्ट दर्शन झाले असावे.. अपमानित स्थितीत, स्वत:हून पक्ष सोडला, तर उद्याच्या अस्तित्वाला कोणतीच प्रतिष्ठा राहणार नाही, याची कदाचित त्यांना खात्री असावी. त्यामुळेच, आपले स्थान आता उरणार नाही, हे ओळखूनही त्यांनी स्वत:हून बाजूला होणे धोरणीपणाने टाळले. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मवाळ आहे, असा सूर त्यांनी लावला, तेव्हाही त्यांना भविष्याची जाणीव नव्हती असे नाही. पण नगण्यपणे बाजूला होण्याचे त्यांना मान्यच नसावे. पक्षातून बाहेर ढकलले गेल्यास संपूर्ण शिवसेनेकडूनच उपेक्षा होईल, हेही त्यांनी ओळखले असावे. त्याऐवजी, शिवाजी पार्कच्या ज्या मैदानात बाळासाहेबांच्या सावलीसारखी हजेरी लावली, त्याच मैदानावरून अपमानित स्थितीत निघून जावे लागले, तर कुठे तरी सहानुभूतीचा एक कोपरा आपल्यासाठी जागा राहील, हे ओळखूनच ते मंचावर आले आणि अपमान ‘करून घेऊनच’ त्यांनी मंच सोडला. शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटनेसोबत राहिलेले, पक्षाचा झेंडा आपल्या हातात सदैव राहील अशी वारंवार ग्वाही देणारे मनोहर जोशी अखेर शिवसेनेच्याच मेळाव्यात शिवसेनेपासून दूर गेले. हे ‘घडवून आणायचे’ असे कदाचित त्यांनीच ठरवले असावे. तसेच त्यांनी घडविले.
‘एखादी गोष्ट करायची असे त्यांनी ठरविले की ती तशीच पार पाडणारच’, असे बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या बाबतीत एका वाक्यात नमूद केलेच होते. त्यामुळे, काय करायचे, हे त्यांनीच ठरविलेले असते आणि ते तसेच घडावे यासाठीचे काही आडाखेही त्यांनी तयार केलेले असतात. दसरा मेळाव्यात जे घडले किंवा घडविले गेले, ते तसेच होणार याची कदाचित जोशी यांना पुरती जाणीव असावी. म्हणूनच त्यांनी ते घडू दिले असावे. संपूर्ण सहानुभूती गमावण्यापेक्षा, कुठे तरी सहानुभूतीचा कोपरा आपल्यासाठी जागा राहावा आणि मुख्य म्हणजे, आपल्याबद्दल सहानुभूतीचा कोपरा कुठे तरी पेरताना, एवढय़ा ज्येष्ठ नेत्याचा असा अपमान केल्याबद्दलची तिरस्काराची भावनाही कुठे तरी जिवंत राहावी, यासाठीच त्या नाटय़ाचे सारे अंक पार पाडण्यास त्यांनी मदत केली असावी.
कारण, दसरा मेळाव्यात आपल्याला शिवसेनेतील एका गटाच्या ठरवून व्यक्त केलेल्या रोषाला तोंड द्यावे लागणार एवढे न ओळखण्याइतके ते भोळे नक्कीच नव्हते.. त्यांना ओळखणाऱ्या अनेकांना याची पक्की खात्री आहे.
मनोहर जोशी शिवसेनेपासून लांब गेले आहेत, हे आता स्पष्ट आहे. शिवसेनेचा भूतकाळ आणि वर्तमान सोबत घेऊन जगलेला हा राजकारणी, पक्षाच्या भविष्यकाळाकडे लांबूनच पाहणार आहे. शिवसेनेच्या कोंदणात दिमाखाने मिरविणारा हा ‘कोहिनूर’ आता मात्र काळवंडला आहे.. ‘४२१ कोटींचा कोहिनूर’ नावाचे नवे पुस्तक लिहिण्याचा एक संकल्प त्यांनी पाच वर्षांपूर्वी सोडला होता. त्यामध्ये काय लिहायचे, याची आखणी आता नव्याने तयार होत असेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा