मनोहरपंतांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे पिलू सोडले ते शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाची फजिती पाहावी यासाठीच. पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारण्याचा हा मनोहरी कावा म्हटला पाहिजे. लोकसभेच्या तिकिटासाठी ते ज्या कोलांटउडय़ा मारत आहेत ते सारेच कीव वाटावी असे आहे. वस्तुत: पुढच्या पिढीस आपली गरज उरलेली नाही हे मनोहरपंतांना उमगलेले दिसत नाही.
पाव्हण्याच्या वहाणेने विंचू मारण्याच्या कलेत महाराष्ट्रात ज्या काही नामांकित महाजनांनी नैपुण्य मिळवले आहे, त्यात मनोहर जोशी यांचे स्थान बरीक वरचे. जोशी यांचे सारे राजकारणच वास्तविक या कलेचा मुक्त आविष्कार. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मवाळ आहे, हा साक्षात्कार पंतांना ज्या कार्यक्रमात झाला, तो कार्यक्रम त्यांच्या या कलेतील नैपुण्याचे निदर्शक ठरावा. या कार्यक्रमाच्या आयोजकांचा थेट संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी. म्हणजे मुळात मनोहरपंतांनी हा कार्यक्रम स्वीकारला तेथपासूनच बातमीस सुरुवात होते. त्यात त्यांचे सहवक्ते भारतकुमार राऊत. मनोहरपंतांच्या बाबत कोहिनूर कधी आणि कोठे संपते आणि राजकारण कधी आणि कोठे सुरू होते हे जसे कळत नाही त्याचप्रमाणे भारतकुमार यांचेही. पत्रकारिता कधी आणि कोठे संपते आणि राजकारण, खासदारकीचे प्रयत्न कोठे सुरू होतात हे ज्या पत्रकारांच्या बाबत कळत नाही त्यातील ते एक. शिवाय दोघेही समदु:खी. एक राज्यसभेची खासदारकी वा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून व्याकूळ तर दुसरा आहे ती उमेदवारी टिकेल कशी यासाठी चिंतित. उभयतांतील या वैशिष्टय़ामुळे हा कार्यक्रम म्हणजे समसमा संयोग की जाहला.. असे म्हणावे असा. तर या कार्यक्रमात पंत म्हणाले की बाळासाहेब जिवंत असते तर वडिलांच्या स्मारकाच्या प्रश्नावर त्यांनी सरकार पाडले असते. याबाबत त्यांचा काहीसा गोंधळ उडालेला दिसतो. बाळासाहेबांचे वडील म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. ते कडवे बुद्धिवादी आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख सामाजिक विचारवंतांत गणना करावी अशांपैकी एक. तेव्हा त्यांचे असे स्मारक करावे या फंदात बाळासाहेब पडले नसते. कारण याबाबत प्रबोधनकारांच्या मतांचा पूर्ण अंदाज बाळासाहेबांना होता. आणि दुसरे असे की दादरमध्येच मध्यवर्ती ठिकाणी प्रबोधनकारांचे स्मारक आहेच. परंतु महाभारतातील अर्जुनास ज्याप्रमाणे फक्त पक्ष्याचा डोळा दिसत असे, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या महाभारतातील या मनोहरार्जुनास फक्त कोहिनूर दिसत असावे. त्यामुळे प्रबोधनकारांच्या स्मारकाचा त्यांना विसर पडला असावा. याखेरीज अन्य महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाहेब वा त्यांच्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वडिलांच्या नावे कधी मते मागावयाची नव्हती. बाळासाहेब त्याबाबत स्वयंप्रज्ञ होते. त्यांनी मते जी काही मागितली ती स्वत:च्या नावाने. परंतु बाळासाहेबांच्या चिरंजीवांचे तसे नाही. त्यांना मते मागावयाची आहेत ती वडिलांच्या नावाने. त्यामुळे बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या स्मारकाची गरज जितकी वाटत नव्हती त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात बाळासाहेबांच्या चिरंजीवांना आपल्या वडिलांच्या स्मारकाची गरज आहे, हे विसरता येणार नाही. मनोहरपंत यांना ही बाब माहीत नाही, असे होऊच शकत नाही. परंतु तरीही आपल्याला जे माहीत आहे ते माहीत नाही असे दर्शवत अनभिज्ञता कशी दाखवावी हे त्यांच्याकडूनच शिकावे. किंबहुना ही बाब माहीत असल्यामुळेच मनोहरपंतांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे पिलू हवेत सोडून दिले. बाळासाहेबांचे स्मारक ही शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाची गरज आहे, याची पूर्ण जाणीव मनोहरपंतांना होती. वास्तविक त्याही वेळी शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे स्मारक करावयाचे तर अनंत कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागणार याची जाणीव महापौरपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत गेलेल्या मनोहरपंतांना नसणार हेही अशक्यच. परंतु तरीही त्यांनी ते पिलू सोडले ते शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाची फजिती पाहावी यासाठीच. केवळ स्मारक हाच जर मनोहरपंतांच्या इतक्या जिव्हाळ्याचा विषय असता तर त्यांनी शिवाजी पार्कासमोरच्या कोहिनूर प्रकल्पातील किमान काही चौरस फुटांची जागा त्यासाठी देण्याचे औदार्य दाखवले असते. परंतु तसे केले असते तर पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारणारे ते पंत कसले? त्यांनी शिवसैनिकांच्या खांद्यावर या स्मारकाचे जोखड देऊन टाकले आणि वर नंतर समोरच्या ओशियानातून ११व्या मजल्यावरून गंमत पाहात बसले. आताही पंतांच्या ‘पाहुण्याच्या वहाणे’चे कौतुक करावे अशी बाब म्हणजे त्यांना प्रमाणपत्र दिले ते माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी. मनोहर जोशी यांना खिंडीत पकडू नका, असे शरद पवार म्हणाले. परंतु पवार यांनी न उच्चारलेले वाक्य असे की समजा मनोहरपंत खिंडीत अडकले गेलेच तर त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी मी आहे. मनोहरपंतांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना खिंडीतून सोडवणे हाच तर पवार यांचा मुख्य कार्यक्रम होता. त्या काळात आणि एरवीही मनोहरपंत हे पवार यांना जेवढे जवळचे होते तेवढे बाळासाहेबांनाही नव्हते, ही बाब राजकारणाच्या अभ्यासकांना पूर्णपणे ठाऊक आहेच.
वस्तुत: एका लोकसभेच्या उमेदवारीसाठी मनोहरपंत गेले काही दिवस ज्या काही उडय़ा कोलांटउडय़ा मारीत आहेत, ते पाहिल्यास कीव यावी. दादर हे त्यांचे पारंपरिक केंद्र. त्याच केंद्रातून त्यांना गेल्या खेपेस एकनाथ गायकवाड यांच्या हातून केविलवाणा पराभव स्वीकारावा लागला. खरे तर आपल्या कारकिर्दीची उलट गणती सुरू आहे हे त्यांनी त्याच वेळी लक्षात घ्यावयास हवे होते. त्यांनी ते घेतले नाही आणि नंतर मिळेल त्या फांदीस लोंबकळत राहिले. त्याची गरज नव्हती. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा मनोहरपंतांचा हेवा वाटावा असा प्रवास आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर आली असती तर कदाचित देशाच्या उपराष्ट्रपती भवनात मनोहरपंतांना वास्तव्याची संधी मिळाली असती. ती संधी थोडक्यात हुकली. तरीही जे काही त्यांना मिळाले तेही भरपूरच म्हणावयास हवे. जे मिळाले ते शिवसेनेमुळेच. तेव्हा त्याबाबत खरे तर त्यांनी कृतज्ञ आणि समाधानी राहावयास हवे. परंतु तरीही त्यांची हाव पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. सध्याच्या काळात शिवसेना नेतृत्वास रसदपुरवठा करीत असलेले राहुल शेवाळे यांचे महत्त्व मनोहरपंतांपेक्षा अधिक असणार हे उघड आहे. त्यांच्या तुलनेत मनोहरपंतांकडून सेनेस आता काही मिळण्यासारखे नाही. शिवाय जेव्हा मिळत होते तेव्हाही ते हातचे राखूनच होते. अशा परिस्थितीत सेना नेतृत्वास पंतांपेक्षा अन्य कोणी महत्त्वाचे वाटत असेल तर ते साहजिकच. तरीही उमेदवारी मलाच द्या, इथून देत नसाल तर दुसरीकडून द्या, दुसरीकडून देत नसाल तर तिसरीकडून द्या.. ही अशी केविलवाणी धडपड करायची त्यांना काहीही गरज नव्हती. तरीही त्यांनी ती केली. याबाबत ते भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गाने जाताना दिसतात. याबरोबर अडवाणी यांचे अन्य गुणही पंतांनी घेतले असते तर ते अधिक मनोहर वाटले असते. आपली पुढच्या पिढीस गरज नाही हे त्यांनी समजून घ्यावे आणि उरलेला काळ हरी हरी नाही तर निदान कोहिनूर कोहिनूर करीत घालवावा. ते अधिक सन्मानाचे. आपला आब आपणच राखावयाचा असतो, हे अनेकांना उमगत नाही. मनोहरपंतांचा समावेश त्यांच्यात व्हावा हे दुर्दैवीच.
मनोहरपंतांची स्मरणशक्ती उत्तम आहे. त्यांना त्यांच्या शालेय जीवनातील पंख चिमुकले, निळे जांभळे या कवितेच्या ओळी आठवत असतीलच. वर्गातील एखादा बोबडा विद्यार्थी ही कविता म्हणताना हमखास पंत चिमुकले.. असे म्हणावयाचा. आपला मान त्यांनी स्वत:च राखला नाही तर सध्याचे बोबडे शिवसैनिक त्यांचा उल्लेख असाच करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा