संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर खूप खूप चिडले आहेत. सहा महिने माध्यमांशी बोलणारच नाही, असा पणच त्यांनी केला आहे. तसे ते नेहमीच चिडलेले असतात. पूर्वी ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हाही ते चिडलेले असत. आता ते संरक्षणमंत्री आहेत. तेव्हा त्यांना पाकिस्तान, दहशतवादी, झालेच तर माध्यमे यांच्यावर चिडावेच लागते. तसे माध्यमांवर सारेच चिडलेले असतात. याचे कारण माध्यमांचा तोंडाळपणा. माध्यमांनी कसे लोकांस जे पटेल, रुचेल, भावेल तेवढेच बोलावे. पण माध्यमांचे प्रतिनिधी असे हुच्च की आपल्या लोकप्रिय नेत्यांना कधी कधी अडचणीतसुद्धा आणतात. चक्क टीका करतात. त्यांचा पगार किती, त्यांचे शिक्षण किती, ते बोलतात किती, याचे काही भान? खुद्द पíरकर यांनी ते मुख्यमंत्री असताना हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. फार फार तर २५ हजार पगार असलेले हे पत्रकार म्हणजे साधे पदवीधारक. ते काही बुद्धिमंत नव्हेत, असे चिरंतन सत्यच त्यांनी मांडले होते. त्यांचे आताचे मंत्रिमंडळातील सहकारी जन. व्ही. के. सिंह यांनी माध्यम प्रतिनिधींची तुलना वारांगनांशी केली. त्याहून केवढे मवाळ सत्य होते पíरकरांचे. तरीही त्यांच्यावर टीका झाली. पुढेही अनेकदा आपल्या ५६ इंची छातीचा कोट करून त्यांना असे अनेक टीकाप्रहार झेलावे लागले. त्याने माणसाचे माथे तडकणार नाही, तर काय होणार? तेव्हा त्यांनी तडकून माध्यमांशी तडक सहा महिन्यांची कट्टी घेतली. म्हणजे कसे, दहशतवाद्यांचा काटा काटय़ानेच काढला पाहिजे असे त्यांनी म्हणायचे आणि त्यावर लोकांनी टीका करायची, कोणा माजी पंतप्रधानांनी अन्य देशांतील भारतीय हेरांची सुरक्षा धोक्यात आणली असा आरोप त्यांनी करायचा आणि त्यावरून वाद व्हायचा, ५० वर्षांत युद्धच झाले नाही त्यामुळे सन्याविषयीचा लोकांचा आदर कमी झालाय असे विधान त्यांनी करायचे आणि लोकांनी ते कसे चुकीचे आहे हे सांगायचे, असे काही व्हायला नको. त्यातून सरकार अडचणीत यायला नको. तेव्हा संरक्षणमंत्र्यांच्या या सहामासी मौनव्रताचे तमाम देशवासीयांनी स्वागतच केले पाहिजे. हा निर्णय त्यांनी सहा महिन्यांसाठीच का घेतला हा प्रश्नच आहे. कारण नियम तर ‘अट्टीबट्टी गारगोट्टी िलबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको’ असा असतो. परंतु हेही थोडके नसून, हा कित्ता त्यांच्या अन्य अनेक सहकाऱ्यांनी, उदाहरणार्थ प.पू. साध्वी निरंजन ज्योती, प.पू. योगी आदित्यनाथ, झालेच तर नितीन गडकरी, राज्यवर्धन राठोड- नावे तरी कोणाकोणाची घ्यायची- या सगळ्यांनी गिरवण्यासारखा आहे. हातातील सत्ता मस्तकात गेल्यानंतर जिभेवरील नियंत्रण सल होते हे शरीरशास्त्रच आहे. तेव्हा मोदी यांनी त्या दृष्टीने त्यांना जिभेचे एखादे आसन शिकवले तर बरेच होईल. यातील काहींना त्यांनी कायमस्वरूपी विपश्यनेला पाठवले तर ते अधिकच बरे होईल. पण तो पुढचा भाग झाला. सध्या तरी या मोदीमंत्र्यांनी पर्रिकरांच्या पावलावर पाऊल टाकून मौनराग धारण करावा हीच देशवासीयांची इच्छा असेल. नाही तर मग ते ललित मोदी प्रकरणात सुषमाताईंना वाचवण्यास जेटलीजी पुढे येतात आणि आपल्या बोलण्याने त्यांना अधिक अडचणीत आणतात असे काही तरी पुनपुन्हा व्हायचे..

Story img Loader