संतांच्या सद्ग्रंथाचा आधार घेत त्या ग्रंथाच्या वाचनातून होणाऱ्या मननातून साधनेचा शोध सुरू असतो. तेव्हा त्या संताची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि त्या आधारावर शोध निर्गुण परमेश्वराचा सुरू असतो! काहीजण एखाद्या समाधीस्थळी जातात आणि त्या समाधीला धरून वाटचाल करीत असतात. तेव्हाही त्या समाधीस्थ सत्पुरुषाची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि शोध निर्गुण परमात्म्याचा सुरू असतो. काहींना खरा सद्गुरूही लाभतो. त्याच्याशी बोलता येतं, त्याला ऐकता येतं, त्याला प्रश्न विचारता येतात, शंका दूर करता येतात.. आणि इथेच खरी कसोटी सुरू होते! याचं कारण एखाद्या संताला सद्गुरू मानून सद्ग्रंथ वाचा किंवा समाधीस्थळी जाऊन सद्गुरू म्हणून त्यांच्या बोधाचा आधार घ्या, यात मनाची जडणघडण आपल्यालाच करायची असते. त्या सद्ग्रंथातून किंवा त्या सत्पुरुषाच्या बोधातून आपण नेमकं काय निवडतो, काय आचरणात आणतो, यालाही फार महत्त्व असतं. त्यात बरेचदा आपलं मनच दगा देत असतं. ‘‘सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।।’’ (दासबोध, दशक ५, समास ९). असं समर्थ सांगतात. पण यातली खरी दक्षता कोणती, खरी सावधानता कोणती, नित्य आणि अनित्याचा विवेक खरा कसा साधावा, जगाचा संग मनातून कसा सुटावा आणि एक सत्संगच कसा दृढ धरता यावा, या गोष्टी ज्याच्या त्याच्या आकलनानुसार ठरतात. बरेचदा जे अनित्य आहे तेच मला नित्य भासू शकतं. जिथं सावध व्हायला हवं तिथंच मी बेसावध राहू शकतो. जिथं दक्षता हवी तिथं दुर्लक्ष होऊ शकतं. जगाचा संग म्हणजे नेमका कुणाचा संग, हे कळण्यात गफलत होऊ शकते. हा संग मनातून सुटावा म्हणजे कसा, ते कळण्यात गफलत होऊ शकते. तेव्हा खरी सावधानता, खरी दक्षता, खरा नित्यानित्य विवेक आणि खरी नि:स्संगता उकलत नसल्यानं साधक म्हणूनही खरी जडणघडण साधत नाही! ‘‘प्राणी साभिमानें भुललें। देह्य़ाकडे पाहात गेले। मुख्य अंतरात्म्यास चुकलें। अंतरीं असोनी।।’’ (दासबोध, द. १५, स. ७). अशी गत आधी होतीच. आता साधकपणाचा नवा अभिमान त्यात जोडला जातो. देहाभिमान काही सुटत नाही आणि त्यामुळे अंतरात असूनही अंतरात्म्यास आपण अंतरत राहातो. खरं समाधान अनुभवास येत नाही. समर्थ सांगतात, ‘‘कर्म उपासना आणि ज्ञान। येणें राहे समाधान।।’’ (दशक ११, समास ३). पण खरं साधकपणच नसल्यानं खरं कर्म कोणतं, खरी उपासना कोणती, खरं ज्ञान कोणतं, याचंही आकलन नसतं. तरीही साधना जर खरी नेटानं सुरू असेल तर स्वबळाचं, स्वबुद्धीचं, स्वप्रयत्नांचं उणेपण हळूहळू जाणवू लागतं. सद्गुरूशिवाय ही वाटचाल शक्य नाही, हे जाणवू लागतं. मग ग्रंथरूपी किंवा प्रत्यक्षातल्या सद्गुरूचा आधार प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न अधिक जोमानं सुरू राहातो. हे सारं सुरू असताना त्या सगुण संगातून शोध निर्गुण परमतत्त्वाचा सुरू असतो. थोडक्यात सद्गुरूशिवाय निर्गुण परमात्म्याचा शोध, दर्शन, साक्षात्कार अशक्य आहे, या निष्कर्षांपर्यंत आपण पोहोचतो. अर्थात सद््गुरूचं खरं स्वरूप, खरा हेतू, खरं उद्दिष्ट, खरं महत्त्व आपल्याला समजत नाहीच. ते ज्या सहजतेनं जीवनात येतात त्यामुळे त्यांचं दुर्लभत्व लक्षात येत नाही. असो. काही असो, हा सगुणातला सद्गुरू निर्गुणाच्या वाटेची सुरुवात करून देतो, म्हणून तो ‘आरंभ निर्गुणाचा’ आहे! त्या निर्गुणाचा आरंभ अशा सद्गुरूंनाच समर्थानी नमन केलं आहे. तेव्हा ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।’ या दोन चरणांचा साधकासाठीचा गूढार्थ असा विलक्षण आहे.
– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा