व्यावहारिक जगाबद्दल आपले काही आडाखे असतात. त्यानुसार अमुक केलं की अमुक मिळेल, अशी आपली व्यवहारातली कल्पना असते. साधनापथावर आलो की व्यवहारातली हीच कल्पना आपण अध्यात्मात वापरू पाहातो. एवढंच नाही तर आध्यात्मिक साधनेच्या योगानं जगालाही आपल्या मनाजोगतं करू पाहातो. अर्थात जग आणि अध्यात्म या दोहोंबाबत आपलं मन कल्पनामयच असतं. जगाचं खरं रूप कळत नाही तोवर त्याचा प्रभाव ओसरत नाही आणि जगाचा प्रभाव ओसरत नाही तोवर खरी साधना सुरूच होत नाही! तेव्हा कल्पनेचा गळ असा पक्का आहे. त्यातून सुटायचं तर एकच उपाय आहे तो म्हणजे जो स्वत: कल्पनेच्या जाळ्यात फसलेला नाही अशा सत्पुरुषाचं साह्य़ घेणं! त्याच्या सहवासात खऱ्या बोधाची ओळख करून घेणं.. आणि इथंच मोठी फसगत होते! कारण आपण आपल्या कल्पनेनुसारच सत्पुरुषाचा शोध घेतो. ‘खरा सत्पुरुष’ कोण असतो, कसा असतो, याची आपणच आपल्या मनाशी कल्पनेनं एक व्याख्या निश्चित केलेली असते. आधीच सांगितलं की, कल्पनेच्या गळातून सुटका व्हावी असं वाटत असेल, तर जो स्वत: कल्पनेच्या जाळ्यात फसलेला नाही, अशाच सत्पुरुषाचं साह्य़ घेतलं पाहिजे; पण आपण आपल्या कल्पनेनं निश्चित केलेल्या साच्यानुसार अशाच ‘गुरू’पर्यंत जाऊन पोहोचतो जो स्वत:च कल्पनेत, मोह-भ्रमात आकंठ बुडालेला असतो. जास्तीत जास्त लोक आपल्याला मानणारे असावेत, अशी त्यालाही चटक लागलेली असते. शिष्याच्या खऱ्या आध्यात्मिक प्रगतीकडे त्याचंच लक्ष नसतं, मग शिष्याचं कुठून असणार? त्याचंही सर्व लक्ष शिष्याच्या आर्थिक प्रगतीकडेच असेल तर दोघांच्याही कल्पना सैराट धावत असतील, यात काय नवल? आणि अशा कल्पना जेव्हा सैराट धावत असतात तेव्हा त्या मानवी गुरूला आणि मानवी शिष्याला, म्हणजेच जे मनाच्याच कब्जात आहेत, अशांना खरा देव कसा काय लाभणार? अर्थात तो लाभणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ‘‘मना कल्पना धीट सैराट धांवे, तया मानवा देव कैसेनि पावे?’’ तेव्हा खऱ्या ‘देवा’ची म्हणजेच खऱ्या शाश्वत तत्त्वाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर त्यासाठी खऱ्या सत्संगाचीच अत्यंत जरूर आहे. हा जो खरा सत्संग आहे तो कसा असतो? तर त्या सहवासात कल्पनेच्या, मोह-भ्रमाच्या जाळ्यात आपण कसं रुतलो आहोत, याची जाणीव होऊ लागते. तरीही तो मोह सोडवत मात्र नसतो. उलट आपल्या मोहेच्छा सत्पुरुषानं पूर्ण कराव्यात, अशी सुप्त इच्छा शिष्याच्या मनात असते. अनंत जन्मांच्या संस्कारांनी त्याच्या मनाची ही धाटणी झालेली असते. तेव्हा खरा सत्पुरुष प्रथम ही धाटणी बदलण्याचं कार्य हाती घेतो. तो सत्पुरुष लगेच आपली कल्पना करण्याची सवय तोडत नाही. तो प्रथम कल्पना बदलतो. पू. बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, ‘‘संत संगतीने जीवाची अविद्य कमी होत जाते. ती कमी झाली की आपली कल्पना बदलत जाते. कल्पना बदलली की सध्या दिसणारे जगाचे स्वरूप बदलते आणि मग ते जसे खरे आहे तसे अनुभवास येते.’’ थोडक्यात आपण अविवेकानं जे जगत असतो त्या अविवेकाचं भान हा सत्पुरुष आणतो. अविवेकानं आपण जगाकडून अपेक्षा बाळगत असतो आणि अविवेकामुळंच आत्मभान हरवून जगाच्या दास्यात अडकलेलो असतो! लाचार जिणं जगत असतो. खरा सत्पुरुष विवेकाचं भान आणतो. जगण्यात विवेक कसा करायचा, त्या विवेकानुसार कसं जगू लागायचं, हे शिकवतो. ही शिकवण त्याच्या बोलण्यातून प्राप्त होत असतेच, पण अनेकदा त्याच्या जगण्यातूनही त्या विवेकाचे संस्कार चित्तावर होत असतात. ‘मनोबोधा’चा पुढचा म्हणजेच १०५वा श्लोक त्या विवेकाकडेच वळवीत आहे.
– चैतन्य प्रेम