परमात्म्याची परमशक्ती आत्मशक्तीच्या रूपानं जीवमात्रात विद्यमान आहे. हीच आत्मशक्ती विविध शक्तीरूपानं प्रकट होते. समर्थानी तुळजामातेच्या स्तोत्रांत म्हटलं आहे की, ‘‘शक्तीरूपें जगन्माता। वर्तते जगदंतरी। त्रिलोकीं जितुके प्राणी। शक्तीविण वृथा वृथा।।’’ ही शारदा शक्तीरूपानं चराचरात भरून आहे आणि या त्रलोक्यातले जितके प्राणी आहेत ते शक्तीविना जगूच शकत नाहीत. प्राणशक्ती आहे म्हणून जीव आहे, जीवनशक्ती आहे आहे म्हणून जीवन आहे! आता शक्ती ही चांगली किंवा वाईट नसते, तिचा वापर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. तसंच ही मूळ जीवनशक्ती जी आहे तिच्याच जोरावर माणूस परमात्म्याचा शोध घेऊ शकतो, पण तसं न होता तो त्याच जीवनशक्तीच्या आधारावर जगत असतानाही त्या परमात्म्यापासून दुरावत जातो! असं का व्हावं? समर्थानी म्हटलं आहे, ‘‘साजिरी शक्ती तों काया। काया मायाचि वाढवी।।’’ शक्तीच्या आधारावरच हा देह वावरत असतो, पण तो देहच मायेत गुरफटत राहातो, मायेचा प्रभाव वाढवत राहातो! खरं तर देह मुळात वाईट नाहीच. तो आपण भ्रम वाढविण्यासाठीच राबवत राहातो, हे वाईट आहे! समर्थ सांगतात, ‘‘देहे हें असार कृमींचें कोठार। परी येणें सार पाविजेतें। देहसंगें प्राणी अधोगती जाती। आणी धन्य होती देहेसंगें।।’’ म्हणजे देह हा कृमींचं कोठार असला तरी त्याच देहाच्या आधारावर खरं जे परम सारतत्त्व आहे, ते प्राप्त करून घेता येतं. या देहाच्या संगानं, देहबुद्धीच्या संगानं माणूस जसा अधोगतीला जाऊ शकतो तसाच याच देहाचा खरा वापर करून तो जीवन धन्यही करू शकतो! पण हे सद्गुरूच्या आधाराशिवाय जाणता येत नाही. आणि तो आधार घेण्यासाठी जी अंतर्यामी आदिशक्ती आहे तिचंच नमन करायला समर्थ सांगत आहेत. तरी आपल्या मनात एक प्रश्न उद्भवतोच की, ‘शारदा’ जर आत्मशक्ती आहे तर मग ती अज्ञानभ्रमात रमवणारी महामायाही कशी असू शकेल? या प्रश्नाचं उत्तर मोठं रहस्यमय आहे! कारण या आत्मशक्तीच्या जोरावर शुद्ध मार्गानं जसं परमसत्य जाणता येतं तसंच मायाशक्तीच्या प्रभावात गुरफटून भ्रमयुक्त जीवन असतानाही अखेर माणूस सत्यापर्यंतच पोहोचतो! ही त्या ‘शारदे’चीच खरी विराट कृपा असते! सत्याच्या वाटेवरून जाणाऱ्या, ज्ञानाच्या वाटेवरून जाणाऱ्या साधकाला तर ती परमात्म्यापर्यंत नेतेच, पण जो मोहाच्या वाटेवरून भ्रमाच्या वाटेवरून जात आहे त्यालाही ती परमात्म्यापर्यंत नेल्याशिवाय राहात नाही! हे ऐकून आपल्याला थोडा धक्का बसेल.. मग वाटेल की सत्याचा शोध वगैरे तरी कशाला घ्यावा? मन मानेल तसं जगावं की! एक कथा आठवते. एका गावात एक आळशी माणूस सदोदित झाडाखाली पडलेला असे. काही कामधंदा करीत नसे. कुणी दिलं तर खाई. मनात आलं तर नदीवर आंघोळ करी. त्याची ती दशा बघून एका सज्जनाला राहवलं नाही. तो म्हणाला, ‘‘बाबा रे, असं जीवन घालवू नकोस. काहीतरी कष्ट कर.’’ त्या आळशानं विचारलं, ‘‘कष्ट करून काय करू?’’ सज्जन म्हणाला, ‘‘त्यामुळे तुला पैसे कमवता येतील.’’ आळशानं विचारलं, ‘‘त्यानं काय होईल?’’ सज्जन म्हणाला, ‘‘तुला निश्चिंतपणे आरामात जगता येईल.’’ आळशी म्हणाला, ‘‘मग मी आताही निवांतपणे आरामात जगतोच आहे की!’’ आता आपण सांगा, हा निवांतपणा, हा आराम खरा का आहे? त्यामुळेच कसंही जगून अखेर सत्यच गवसणार असेल, तर मग कसंही का जगू नये, या प्रश्नाला अर्थ नाही. कारण सत्य गवसेपर्यंत किती जन्मं खस्ता खात जगावं लागेल, कोण जाणे! असो. तर आदिशक्ती शारदा मायाशक्तीही कशी आणि मायेत गुरफटलेलाही अखेर सत्यापर्यंत कसा पोहोचतो, याचं रहस्य थोडं जाणून घेऊ. त्यातून त्या शारदेचं व्यापकत्व लक्षात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

 

चैतन्य प्रेम