एखादा माणूस परप्रांतात प्रदीर्घ वास्तव्यासाठी जातो. जाताना आपलं बँक खातं तो त्या प्रांतात स्थानांतरित करून घेतो. नव्या प्रांतानुसार त्याचं राहणीमान, सोयी-गैरसोयी यात बराच फरक पडू शकतो, पण त्याच्या बँक खात्यात आधीचीच पुंजी कायम असते. त्यात भर घालायची की घट करीत राहायचं, हे त्याच्याच प्रयत्नांवर अवलंबून असतं. अगदी त्याचप्रमाणे जीव अनेक जन्म घेतो. प्रत्येक जन्मानुसार त्याचं सामाजिक, आर्थिक राहणीमान बदलतं, पण अंत:करणरूपी बँक खात्यातील त्याचा वासनापुंजरूपी ठेवा या जन्मात हस्तांतरित झाला असतो. त्यात भर घालत ओझं वाढवत जायचं की घट करीत निर्वासन होत जायचं, हे त्याच्या आध्यात्मिक स्वाध्यायावर अवलंबून असतं. ‘‘विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी।’’ हा तो स्वाध्याय आणि ‘‘विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी।। ’’ ही त्याची फलश्रुति आहे! आता विवेकपूर्वक जी देहबुद्ध सोडायची आहे त्या प्रक्रियेचा थोडा विचार करू.
अंत:करणात अनंत वासनांचा जो पुंज आहे तोच या देहबुद्धीचा आधार आहे. वासना कितीही प्रकारच्या असल्या तरी त्यांचं मूळ आहे ते हवेपणात आणि नकोपणात. वासना सूक्ष्म आहे. त्या वासनापूर्तीचा मुख्य दृश्य आधार आणि साधन हा देहच आहे. हवेपणाची धडपड अर्थात जे हवंसं वाटतं, ज्याची हाव आहे ते मिळविण्याचा, भोगण्याचा आणि टिकविण्याचा प्रयत्न हा या देहाच्याच आधारावर करता येतो. अगदी त्याचप्रमाणे नकोपणाची धडपड अर्थात जे नकोसं वाटतं, ज्याची नावड आहे ते टाळण्याचा, दूर करण्याचा वा नष्ट करण्याचा प्रयत्नही या देहाच्याच आधारावर करता येतो.
आता हा जो जाणवणारा हवे-नकोपणा आहे, त्याचं मूळ अत्यंत सूक्ष्म आंतरिक अशा हवे-नकोपणातच दडलं आहे. ज्याची जाणीवही आपल्याला नसते. तो आंतरिक सूक्ष्म हवे-नकोपणा दूर करण्यासाठीचे प्रयत्नही, हा देहच साधना आणि स्वाध्यायाला लावूनच सुरू करता येतात. ती साधना आणि तो स्वाध्याय जरी देहाकडून सुरू होत असला तरी अखेर तो सूक्ष्म अंत:करणापर्यंत पोहोचणारा असतो. अशी खरी साधना आणि खरा स्वाध्याय हा तितकाच सूक्ष्म असतो आणि सूक्ष्मावर परिणाम करीत त्याच्यात पालट घडविणारा असतो. अंत:करणशुद्धीशिवाय हा पालट अर्थात हवं-नकोपणा नष्ट होणं साधत नाही. आज या घडीला आपण देहबुद्धीनुसार दृश्यप्रभावात जगत आहोत. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात जे नजरेत येतं तिथपर्यंतचा विचार प्रथम आपण करणार आहोत. त्या विचारानुसार या देहाच्याच आधारावर आपल्याला प्रयत्न सुरू करावे लागतील ते जाणवणारा, दृश्य असा हवे-नकोपणा सौम्य करण्याचे. त्यामुळे ही चर्चा प्राथमिक पातळीवरच सुरू आहे, हे लक्षात घेऊ.
आता समजा जमिनीत पुरलेल्या गुप्तधनाची जागा एखाद्याला समजली आहे. तिथं पुरलेलं ते गुप्तधन शोधण्यासाठी तो माणूस नेटानं खड्डा खणू लागतो. अर्थात जिथं गुप्तधन पुरलं आहे त्या खोल जागी तो थेट कुदळ तर मारू शकत नाही ना? त्याला चिकाटीनं खड्डा खणत खणतच जावं लागतं. खड्डा खणणं म्हणजे काय? तर दगड-माती उपसत बाहेर टाकत जाणं. मग एक वेळ अशी येते जेव्हा ते गुप्तधन आढळतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला प्रयत्न दृश्यापासूनच सुरू करावे लागतात. इथं खड्डा खणत जाणं म्हणजे देही असलेल्यानं देहबुद्धी उपसत विदेही होत जाण्याचा प्रयत्न करीत जाणं. खड्डा जसा योग्य साधनांशिवाय खणता येत नाही आणि तो योग्य तऱ्हेनंच खणावा लागतो त्याप्रमाणे आपली ही साधनाही विवेकाशिवाय अशक्यच असते. हा विवेक जाणण्याआधी जिच्यामुळे अविवेक माजला आहे, त्या देहबुद्धीची छाननी आपण करीत आहोत. -चैतन्य प्रेम
८५. उत्खनन : १
ज्याची नावड आहे ते टाळण्याचा, दूर करण्याचा वा नष्ट करण्याचा प्रयत्नही या देहाच्याच आधारावर करता येतो.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-05-2016 at 04:53 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excavation