अध्यात्मपथावर पाऊल टाकण्याआधी आत्मशक्ती असलेल्या ज्या शारदेचं नमन केलं आहे तिचं महत्त्व आणि महात्म्य आपण जाणून घेतलं. आता ही शारदा ‘मूळ चत्वार वाचा’ आहे, म्हणजे काय? फार सुंदर आहे हा गूढार्थ.. ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’ या चरणाचा अर्थ साधारणपणे असा मानला जातो की, ही शारदा वैखरी, मध्यमा, पश्यन्ति आणि तुर्या या चार वाणींच्या रूपात प्रत्येकात विद्यमान आहे. त्या चार वाणींच्या आधारावर राघवाच्या पंथावर वाटचाल करता येते. आता हा अर्थही योग्यच आहे तरी गूढार्थ हा ‘मूळ’ शब्दाकडेच नेणारा आहे. समर्थानी नामसाधनाच सांगितली आणि नामाचा मार्ग सर्वात सहज भासतो, यात शंका नाही. तो अत्यंत खोलवर पालट घडवतो, यातही शंका नाही. नाम अनंत रूपांत आणि अनंत साधनांत भरून आहे, हेही पटकन लक्षात येत नाही. एक निरलस वृत्तीचे साधक मला म्हणाले, ‘‘आमच्या सद्गुरूंनी काही नामसाधना सांगितलेली नाही.’’ ते योगसाधक होते. मी विचारलं, ‘‘साधना करताना सद्गुरूंचं स्मरण असतं ना?’’ ते म्हणाले, ‘‘हो तर.’’ मी विचारलं, ‘‘त्या स्मरणात मनात त्यांचं नाव येत नाही का?’’ असेच एक प्रामाणिक सद्गुरूभक्तही उद्गारले की, ‘‘आम्ही नामाला मानत नाही!’’ मी हसलो आणि फक्त काही शब्द उच्चारले. दगड, वीट, रॉकेल, तांदूळ आणि मग त्यांच्या सद्गुरूंचं नाम उच्चारलं. त्यांना विचारलं, ‘‘दगड हा शब्द ऐकताना आणि तुमच्या सद्गुरूंचं नाव ऐकताना आंतरिक भाव एकसारखाच होता का?’’ तर ‘नाम’ असं खोल आहे. ते अगदी आतपर्यंत भावसंस्कार जोपासतं. तरीही ‘नमू शारदा मूळ चत्वार वाचा’चा अर्थ स्वस्थ बसू देत नव्हता. जे वरकरणी नामसाधना करीत नाहीत किंवा ज्यांना जन्मजात वाणीच नाही, त्यांनाही हा अर्थ लागू कसा होईल, हा विचार सारखा मनात येई. एक गोष्ट अगदी खरी ती म्हणजे ‘वैखरी’ ही व्यक्त वाणी असली तरी मूकबधीराच्या अंत:करणातही वेगळ्या रूपातली ‘वैखरी’ असतेच! तरीही या ‘चत्वार वाचा’मध्ये ‘वाचा’ हा शब्द ‘वाणी’ म्हणून नव्हे तर ‘प्रकार’ म्हणून समोर आला तेव्हा गूढार्थ सळसळत प्रकटला! ही ‘शारदा’ ज्या मूळ चार रूपांत जीवनात प्रकटली आहे ते चार प्रकार म्हणजे, ‘जाणीव’, ‘ग्रहण’, ‘आकलन’ आणि ‘अभिव्यक्ती’ वा ‘कृती’! आणि या चारही शक्ती आहेत बरं का! जाणण्याची शक्ती, ग्रहण करण्याची शक्ती, आकलनाची शक्ती आणि अभिव्यक्त होण्याची शक्ती.. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे ही मूळ शारदा आदिशक्ती जशी आहे तशीच ती मायाशक्तीही आहे. त्यामुळे या चारही गोष्टी एकतर शुद्ध स्वरूपात किंवा अशुद्ध स्वरूपात जीवनात प्रकट होत असतात. समस्त जीवन याच चार गोष्टींनी व्यापलं आहे. जाणीव शुद्ध नसेल, मायेच्या प्रभावाखाली असेल तर ग्रहणही शुद्ध होत नाही. ग्रहण अपूर्ण असेल तर आकलनही अपूर्णच असतं. मग जाणीव, ग्रहण आणि आकलन जिथं अशुद्ध असतं तिथं अभिव्यक्ती, कृतीतून दिला जाणारा प्रतिसादही अशुद्ध अर्थात मायेच्या प्रभावाखालीच असतो. आपलं आताचं जगणं या चारही गोष्टींच्या अशुद्ध रूपानं बरबटलं आहे त्यामुळेच मायेच्या प्रभावाखाली आहे. आपल्या जगण्यात म्हणूनच विसंगति, गोंधळ आहे. ती विसंगति दूर करण्यासाठी आणि मनुष्य जन्माचा मूळ हेतू साध्य व्हावा, यासाठी आदिशक्तीचं नमन आहे. ते नमन करण्यामागे या चारही गोष्टींचं शुद्ध रूप प्रकटावं, हाच हेतू आहे. म्हणूनच जीवनातली विसंगति संपावी आणि सुसंगति साधावी यासाठी शारदेला नमन करून, ‘गमूं पंथ आनंत या राघवाचा।।’ असा मनाच्या श्लोकांचा प्रारंभ केला आहे. ‘गमूं’ म्हणजे जाणून घेऊ! हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तो नीट जाणून घेतला नाही तर अर्थही जाणता येणार नाही!
-चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा