मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाच्या निमित्ताने काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि दंभ या सहा विकारांचा आपण संक्षेपानं मागोवा घेतला. साधनापथावर चालायचं तर या सहा विकारांच्या आवेगांपासून साधकाला स्वत:ला सांभाळावंच लागेल, हेही आपण जाणलं. तरी अनेकांच्या मनात प्रश्न येईल की, आम्हा चारचौघांसारख्या सांसारिक साधकांना हे विकार आवरून जगणं शक्य तरी आहे का? यावर समर्थानीच ‘दासबोधा’त पाचव्या दशकाच्या दहाव्या समासाच्या प्रारंभीच्या सहा ओव्यांतच याचं उत्तर दिलं आहे. या ओव्यांचा अर्थ एकामागोमाग एक याप्रकारे आता जाणून घेऊ. समर्थ म्हणतात, ‘‘सन्मार्ग तो जीवीं धरणें। अनमार्गाचा त्याग करणें। सांसारिका त्याग येणें। प्रकारें ऐसा।।’’ सांसारिकाच्या त्यागाची सुरुवातच सन्मार्गाच्या निवडीत आणि अन्य मार्गापासून दूर होण्यात आहे! आणि केवळ साधनापथ हा सर्वश्रेष्ठ सन्मार्ग असला तरी त्या मार्गावर जाताना प्रथम अनेक पायावाटांनी, रस्त्यांनी जावंच लागतं ना? आपण लांबच्या प्रवासाला घरून निघतो तेव्हा घराशेजारून काही महामार्ग जात नाही. त्यासाठी आधी पायवाटा, साधे रस्ते यांनीच जावं लागतं. तसाच साधनेचा जो विराट सन्मार्ग आहे त्याकडे जाताना प्रपंचातल्या वाटांनीच वाटचाल सुरू होते. तेव्हा, सन्मार्ग तो जीवीं धरणें। साधनेचा सन्मार्गच सर्वार्थानं धरायचा, हा जर आपला निर्धार असेल, तर आधी माझं जगणं ज्या ज्या मार्गानी प्रवाहित आहे, ते मार्गही सन्मार्ग व्हावे लागतील! मग माझं व्यावहारिक वागणं-बोलणं त्या सन्मार्गाला सुसंगत आहे का, हे मला तपासावं लागेल. दुसऱ्याची फसवणूक, दुसऱ्याचा घात, दुसऱ्याचा अवमान, दुसऱ्याला दुखावणं माझ्याकडून जर माझ्या ‘मी’पणातून होत असेल तर त्यात बदल करावाच लागेल. मला ज्या व्यापक साधनेच्या हमरस्त्यावरून चालायचं आहे, तिथं डोक्यावर कमीतकमी ओझं हवं. हे ओझं आहे विचारांचं, कल्पनांचं, चिंतांचं, काळजीचं. ते ओझं प्रपंचातच मी गोळा करीत आहे तेव्हा प्रपंचातून हा पसारा गोळा करणं आणि अंतरंगात साठवत जाणं थांबावं, यासाठीही जागरूक व्हावं लागेल. सन्मार्गापेक्षा जे अन्य आहे त्याचा मनातून त्याग सुरू करणं, हाच प्रापंचिकाचा त्याग आहे! मग समर्थ सांगतात, ‘‘कुबुद्धित्यागेंविण कांहीं। सुबुद्धि लागणार नाहीं। संसारिकां त्याग पाहीं। ऐसा असे।।’’ माणसाच्या अंतरंगाचा एक विशेष असा आहे की जोवर कुबुद्धीचा त्याग होत नाही, तोवर ते सुबुद्धीकडे वळतच नाही. अंतरंगात कुबुद्धी भरून असताना मी सुबुद्धीसाठी प्रयत्न करीन, असं होऊच शकत नाही. तेव्हा कुबुद्धीचा त्याग घडत गेला तरच हळुहळू त्या प्रमाणात सुबुद्धी व्याप्त होऊ लागते. यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे नाम! कुबुद्धी, कुतर्क, कोतेपणा, कामनांधता हे सारं असूनही माणूस नाम घेत गेला की ते नामच आपल्यातील या कचऱ्याची जाणीव करून देऊ लागतं. मग तो कचरा काढून टाकण्याची तळमळ निर्माण करतं. जसजसा कचरा दूर होत जातो तसतसं अंतर्मन निर्मळ होऊ लागतं. तेव्हा कुबुद्धीचा त्याग हा प्रापंचिकाचा त्याग आहे. आता मग मोठा डगमगता पूल येतो! तो म्हणजे, ‘‘प्रपंचीं वीट मानिला। मनें विषेयत्याग केला। तरीच पुढें आवलंबिला। परमार्थमार्ग।।’’ परमार्थपथावर जायचं तर आधी प्रपंचाचा वीट आला पाहिजे. मनानं विषयत्याग केला पाहिजे. असा वीट आणि असा त्याग साधला तरच परमार्थ मार्ग अवलंबिता येतो! हा डगमगता पूल पाहूनच अनेकजण पुन्हा घराकडे वळतात! त्यांना वाटतं हे काही आपलं काम नाही. थोडं देवाचं करावं आणि भरपूर समाधान मिळावं, यासाठी आलो तर मधेच हा एवढा भलाथोरला डगमगता पूल आलाच का?
– चैतन्य प्रेम