सर्वशक्तिसंपन्न रावणाची अखेर किती दारूण झाली, हे दाखवत समर्थ आपल्याला सावध करतात की, ‘‘म्हणोनी कुडी वासना सांडिं वेगीं। बळें लागला काळ हा पाठिलागी।।’’ अरे वेडय़ा, जिथं रावणाचा पसाराही अकस्मात नष्ट झाला तिथं तुझा पसारा नष्ट व्हायला कितीसा वेळ लागणार? त्यामुळे हा पसारा वाढविणारी वाईट वासना सांडून टाक. ज्या वासनांमध्ये तुझे प्राण गुंतले आहेत, ज्यांच्या पूर्तीसाठी तू प्राणांतिक धडपड करतो आहेस, त्या सोडून दे.. आणि मग आपल्या मनात प्रश्न पडतो की वासना सोडून देणं इतकं सोपं आहे का? त्यावरचा एक सोपा उपाय गेल्या भागात नमूद केला तो असा की, मनातून सर्वच वासना काढून टाकणं सोपं नसलं तरी त्या वासनांच्या छाननीचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. ही छाननी म्हणजे काय? तर प्रत्येक वासना तरंगाचं अलिप्तपणे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मनात ज्या वासना, ज्या इच्छा उत्पन्न होत आहेत त्या सद्गुरूंनी केलेल्या बोधाला अनुरूप आहेत की त्या बोधाच्या आड येणाऱ्या आहेत, बोधाच्या विपरीत आहेत, हे पाहाणं सुरू झालं पाहिजे. आजवर काय घडत गेलं? वासना तरंग उमटला की लगेच त्या वासनापूर्तीसाठी मन देहाला प्रेरित करीत होतं. मग हा देहही संपूर्ण क्षमतांनिशी त्या वासनापूर्तीसाठीच्या प्रयत्नांना जुंपला जात होता. आता निदान वासना तरंग उमटताच आणि मन देहाला प्रेरित करीत असतानाच त्या वासना तरंगाचं निरीक्षण सुरू होऊ लागेल. एवढय़ानं मन आणि देह त्या वासनेच्या गुंत्यातून सुटतील असं नव्हे! पण निदान ज्या वेगानं आपण वासनेच्या आधीन होत होतो, त्या वेगावर नियंत्रण येऊ लागेल. आजही किती संकुचित वासनांकडे माझं मन खेचलं जात आहे, याची जाणीव होऊन नंतर दु:खंही होईल. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वासनांमध्ये आणि त्यातही सर्वात बलिष्ट अशा कामवासनेमध्ये वाईट काहीच नाही. त्या वासनेतलं आपलं गुंतणं, अडकणं आणि त्या वासनापूर्तीशिवाय जगण्याला दुसरा हेतू न उरणं, हे वाईट आहे. साधकच कशाला, कोणतंही क्षेत्र घ्या. त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जे शास्त्रज्ञ, जे कलावंत, जे साहित्यिक, जे उद्योजक, जे समाजधुरीण, जे विचारवंत, जे राजकीय नेते पोहोचले आहेत त्यांना संकुचित वासनांच्या गुंत्यातून सुटल्याशिवाय प्रगती साधलेलीच नाही. त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी जे ज्ञान, जे चिंतन, जे प्रयत्न आवश्यक आहेत, त्यासाठी जी एकाग्रता, जी तन्मयता, जे समर्पण आवश्यक आहे त्याच्या आड त्यांनी संकुचित वासनांना येऊ दिलेलं नाही. भौतिकातल्या एखाद्या क्षेत्रातल्या यशासाठीही जर स्वत:च्या वासनांवर ताबा मिळवावा लागतो, तर आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर ते अनिवार्य नसेल काय? त्यातही विशेष गोष्ट अशी की अध्यात्म कोणतीही गोष्ट दडपायला, नाकारायला, अव्हेरायला सांगत नाही, तर त्याला वळण लावायला आणि त्याचा मनावरचा प्रभाव तेवढा दूर करायला सांगतं. कारण जन्म गेला तरी वासनांची पूर्ती होणार नाही. त्या नादात आपला वेळ, आपले श्रम, आपल्या क्षमता मात्र व्यर्थ खर्च होत जातील. तेव्हा प्रारब्धानुसार विहित मार्गानं सर्व वासनांच्या पूर्तीचे प्रयत्न देहाद्वारे सुरू असतानाही मनानं त्या प्रयत्नांमधलं गुंतणं थांबवून धारणेचं, चिंतनाचं, मननाचं, विचाराचं, कल्पनेचं केंद्र केवळ बदलायचं आहे, एवढंच अध्यात्म सांगतं. आजवर अशाश्वत इच्छांच्या पूर्तीतून शाश्वत सुख मिळवण्याची ओढ, हेच मनाचं केंद्र होतं. आता शाश्वत सुखाच्या इच्छेच बीज रोवून शाश्वताचं भान राखणं, हे मनाचं केंद्र झालं पाहिजे. मनाच्या धारणेचा, चिंतनाचा, मननाचा, कल्पनेचा, विचाराचा प्रवाह शाश्वताकडेच वळत राहिला पाहिजे. त्यासाठीच अंतरंगात उमटणाऱ्या प्रत्येक वासना तरंगाकडे लक्ष ठेवलं पाहिजे.
-चैतन्य प्रेम