महावाक्य, पंचीकरणादि तत्त्वे आदि शाब्दिक ज्ञान केवळ संतसंगानं आणि अगदी अचूक सांगायचं तर सद्गुरू संगानंच अनुभवजन्य होतं.. आणि इथंच जो एक मोठा धोका असतो त्याचं वर्णन समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १५४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत करीत आहेत. हे दोन चरण असे : ‘‘द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो। तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो।।’’ याचा प्रचलित अर्थ असा सांगितला जातो की, द्वितीयेची चंद्रकला ज्याने आधी पाहिली असते तो (सद्गुरू) ज्याला ती पाहायची असते त्याला (मुमुक्षु साधकाला) ती दाखवताना प्रथम एखादी झाडाची फांदी दाखवतो. त्या फांदीकडे प्रथम लक्ष जाऊन मग त्या चंद्रकलेकडे लक्ष जातं. तर इथं फांदी म्हणजे ही महावाक्यं आहेत वा तत्त्वज्ञान आहे. ते सद्गुरूकडून ऐकता ऐकता परमतत्त्वाचं दर्शन होतं. आता या प्रचलित अर्थापलीकडेच मनोज्ञ असा गूढार्थ भरून आहे! आता द्वितीयेचीच चंद्रकला कशाला? कुणी म्हणेल, की त्या दिवसाची कोर फार बारिक असते.. पण इथं द्वितीय म्हणजे दुसरा, असा अर्थ लक्षात घेतला तर सर्व गूढार्थ उलगडतो. हा दुसरा म्हणजे जो द्वैतमय जगातच आपलं अस्तित्व मानतो असा दुजाभावानं भरलेला जीव आहे. तो साधना करतो म्हणून साधक म्हणवला जातो. तर त्याला ‘संकेत जो दाविजेतो’, त्याला परमतत्त्वाचा संकेत प्रथम जो दाखवतो तो सद्गुरू. तर होतं काय? त्या संकेतानंही जेव्हा सद्गुरू कृपेनं ज्ञानकिरण अंत:करणाला स्पर्श करू लागतात तेव्हा कोणता मोठा धोका उत्पन्न होतो, ते समर्थ अखेरच्या चरणात सांगत आहेत. हा धोका म्हणजे, ‘‘तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो।।’’ आता ‘तया’ अर्थात ‘त्याला’ म्हणजे कोणाला? तर ‘संकेत जो दाविजेतो’ त्या सद्गुरूला! म्हणजे ज्याच्या आधारावर परमतत्त्वाचं ज्ञान होऊ लागतं त्याला सोडून जीव त्या शाब्दिक ज्ञानावरच भाळू लागतो! रूपकाच्या अंगानं विचार केला तर जाणवेल की, जो चंद्रमा आहे तो कलेकलेनं घटणारा आणि कलेकलेनं वाढणारा असा आहे. पूर्णचंद्राचं दर्शन रोज होत नाही. ऐकीव ज्ञानाचं तसंच आहे. सद्गुरूकडून ज्ञान ऐकलं आणि अनुभवलं तरी सहज नित्य अनुभव म्हणून ते लगेच मुरत नाही. अंत:करण पूर्ण ज्ञानजाणिवेनं फार थोडा वेळ व्यापतं. नाहीतर नित्याच्या जगण्यात त्या ज्ञानात घट तरी होत असते नाहीतर कलेकलेनं वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे त्या ज्ञानाचं महत्त्व कलेकलेनं जाणवत असतं, पण त्याच जोडीनं वर्तुळाचा अप्रकाशित भाग हा जीवभावाच्या अज्ञानानंच व्याप्त असतो.. आणि असं असताना त्या तुटपुंज्या ज्ञानावरच मन भाळतं आणि ज्याच्या योगे खरं पूर्णज्ञान प्राप्त होणार आहे त्याला सांडून मन त्या ज्ञानाभासातच गुंतू पाहातं! या ‘जाणतेपणा’च्या भ्रमावर समर्थ १५६व्या श्लोकात फटकारे ओढणारच आहेत, पण त्याआधी ते पुन्हा पुन्हा सांगतात की बाबारे, ते ज्ञान जे आहे ते अदृश्यातच दृश्यमान आहे! समर्थ म्हणतात :
४९३. तया सांडुनि!
सद्गुरूकडून ज्ञान ऐकलं आणि अनुभवलं तरी सहज नित्य अनुभव म्हणून ते लगेच मुरत नाही.
Written by चैतन्य प्रेम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-12-2017 at 01:02 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knowledge of immortality