जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस कर्म करीत असतो. कर्माशिवाय क्षणभरही तो राहू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस विचाराच्याही पकडीत असतो. अर्थात क्षणोक्षणी त्याच्या मनात विचार सुरूच असतो. विचार हा केवळ विद्वानच करतो किंवा करू शकतो, असं नव्हे. वेडाही विचार करतो, कपटी माणूसही विचार करतो, कैदीही विचार करतो. पण याचा अर्थ प्रत्येकजण शुद्ध विचार करत असतो, असं नव्हे. तर अनेकदा माणूस अविचारच करतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस नेहमीच योग्य, शुद्ध कर्म करीत असतो, असंही नव्हे तर बरेचदा तो त्याच्या अविचारानुरूप चुकीचं कर्मही करीत असतो. कोणतं कर्म करावं, याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. त्याचप्रमाणे कोणता विचार करावा, याचंही स्वातंत्र्य माणसाला आहे. पण कोणतंही कर्म करण्याचं स्वातंत्र्य माणसाला असलं, तरी त्याचं फळ त्याच्या हाती नाही! त्याचं फळ निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला नाही. अगदी त्याचप्रमाणे विचार कोणता करावा, याचं स्वातंत्र्य माणसाला असलं, तरी त्या विचाराचं फळ काय असेल, हेसुद्धा माणसाच्या हाती नाही. दुष्कर्माचं फळ माणसासाठी ‘दु:खकारक’ असतं आणि अविचाराचं फळही त्याला दु:खाकडेच नेणारं असतं. त्यामुळेच सत्कर्म आणि सद्विचाराकडेच माणसानं वळावं, असा संतांचा प्रयत्न असतो. आपल्या हातून सत्कर्म घडावं, अशी इच्छा माणसालाही होते. पण त्यामागे सत्कर्माचं खरं प्रेम नसतं, तर सत्कर्माच्या योगे पुण्य मिळेल आणि त्या पुण्यामुळे आपल्या पापाचं परिमार्जन होईल, असं माणसाला वाटत असतं. गंमत म्हणजे पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय, हे त्याला नेमकेपणानं सांगता मात्र येत नाही. सत्कर्माप्राणे सद्विचाराचं महत्त्व मात्र पटकन लक्षात येत नाही. सत्कर्मानं पुण्य मिळतं, हे त्यानं लहानपणापासून ऐकलं असतं, पण सद्विचाराचं काही पुण्य असेल, असं त्याला वाटतही नाही. प्रत्यक्षात सद्विचार हाच आंतरिक जडणघडणीतला मोठा आधार असतो. सद्विचारानंच कल्पनांमधला भ्रामकपणा कमी होत जातो, भावना शुद्ध होत जाते आणि कामना या भगवद्केंद्रित होऊ लागतात. अविचारानं भ्रामक कल्पना दृढ होत जातात, कुभावना पक्क्य़ा होतात आणि देहबुद्धीच्या चिखलातच मनोवासना रूतत जातात. तर सद्विचाराचं महत्त्व हे असं आहे. आपली अडचण अशी की, आपल्याला सद्विचाराचं महत्त्व समजतं आणि पटतंही, पण तरीही अविचाराचाच प्रभाव मनावर पटकन पडतो. अविचाराच्या कह्य़ात आपण क्षणार्धात जातो आणि त्यामुळे आपली कृतीही अविचाराचीच होते. अविचारी कृतीचं फळही मग प्रतिकूलच असतं. ते आपला वेळ, आपली मानसिक शांती, स्थैर्य आणि शक्ती खच्ची करणारं असतं. याउलट सद्विचाराच्या बळानं सहज सत्कर्मच घडतं आणि त्याचं फळही मनाला स्थैर्य, शांती आणि नवी उमेद देणारं असतं. मात्र सद्विचाराचा प्रवाह अखंड टिकणं आपल्याला साधत नाही. बरेचदा स्वार्थ, भ्रम, मोह, आसक्ती, द्वेष, मत्सर मनाला व्यापून टाकतात आणि त्यामुळे अविचाराचा लोंढा मनात शिरकाव करू शकतो. त्या प्रभावातून कृतीही भ्रम, मोह, आसक्तीनं बरबटलेलीच होते. तिचं फळ प्रतिकूल, दु:खकारक असतं. त्यामुळे मेंढय़ांना जसं काठीनं हाकून हाकून योग्य मार्गावर वळवत राहावं लागतं, तसंच या मनाला सद्विचाराच्या काठीनं सतत मार्गावर राखावं लागतं. अशा बोधवचनांचं चिंतन, हाच आपल्या सदराचा हेतू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा