सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी ‘भावदिंडी’ या पहिल्या सदराच्या अखेरीस लिहिलं होतं की, ‘आजची परिस्थिती अशी आहे आणि समाजात इतका असंतोष खदखदत आहे की लोक खरं तर रस्त्यावर उतरून जाळपोळ करतील.. पण ते तसं करीत नाहीत याचं कारण या देशातल्या लोकांच्या मनावर असलेले सूक्ष्म आध्यात्मिक संस्कार! या संस्कारावर विसंबून आपण परिस्थिती आहे तशीच राहू देणार की परिस्थितीला योग्य दिशा देत ते संस्कारही जपणार, हा खरा प्रश्न आहे!’ आज इतकी वर्ष उलटूनही ही वाक्यं जशीच्यातशी लागू आहेत. असंतोषाची कारणं काहीही असतील, पण त्याचा उद्रेक समाजमन दुभंगून टाकत आहे, हे खरं. तरीही या असंतोषानं अद्याप अराजकाचं रूप धारण केलेलं नाही, याचंही कारण एकच.. या मातीतला सूक्ष्म आध्यात्मिक संस्कार. तो जाणवत नाहीच, पण त्याच्याच आधारावर आपण तग धरून आहोत. मग हा संस्कार आपण जपणार की गमावणार, हा आजही लागू असलेला प्रश्न आहे. एक काळ असा होता की चार्वाकालाही त्याचा विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार होता.. आज काळ बदललाय, माणसानं अधिक प्रगती केलीय, पण विरोधी विचारालाही व्यक्त होऊ देण्याची मोकळीक कुठेतरी आक्रसत चालली आहे. विचारमांडणीची पातळीही घसरत चालली आहे. समाज अधिक संकुचित होत चालला आहे. वैचारिक आंदोलनांनी समाजमन अधिक प्रगल्भ व्हायला हवं होतं. तसं न होता ते अधिकच हिंसक आणि कळपकेंद्रित झालं आहे. त्यामुळे साधकासाठी तर आध्यात्मिक विचाराचा आधार घट्ट धरून आंतरिक जडणघडण करण्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. विचारांच्या असहिष्णुतेतून कृतीही असहिष्णु होऊ लागते, हे लक्षात घेतलं तर खरा शुद्ध विचार जपण्याचं महत्त्व साधकासाठी तरी फार मोलाचं आहे. कुणाला वाटेल की, बाह्य़ परिस्थिती स्फोटक बनत असताना आपण एका चौकटीत स्वत:ला कोंडून घेऊन, चिणून घेऊन आध्यात्मिक चिंतन करणं आणि त्या चिंतनाच्या कल्पित आनंदानं आत्मसंतुष्ट होत राहाणं कितपत कालसंगत आहे? तर त्यासाठी एक स्पष्ट करायला हवं. परिस्थिती स्फोटक बनते किंवा बिघडत जाते, त्यात माणसाच्या अविचाराचाच वाटा मोठा असतो. त्यामुळे शुद्ध विचाराची कास धरल्याशिवाय अविचाराच्या पकडीतून सुटता येत नाही. पू. बाबा बेलसरे म्हणत ना? की कितीतरी ‘इझम्’ माणसानं निर्माण केले, पण अखेरीस ते ‘इझम्’ स्वार्थकेंद्रित माणसाच्याच ताब्यात राहिल्याने समाज आहे तिथंच राहिला. आजवर माणसानं अनेक तऱ्हेच्या सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञानाची मांडणी केली आणि ती प्रत्येक मांडणी ही माणसाला खरं सुख मिळावं, या प्रामाणिक इच्छेतूनच केली गेली होती. तरीही माणूस सुखी झाला नाही. कारण त्या उत्तुंग तत्त्वज्ञानाला माणसानंच खुजं केलं, भ्रष्ट केलं, निष्प्रभ केलं आणि पराभूतही केलं! माणसाची वृत्ती जोवर सुधारत नाही, तोवर त्याचा स्वार्थ कधीच सुटणार नाही. स्वार्थ जोवर सुटत नाही, तोवर त्याचा संकुचितपणा संपणार नाही. संकुचिताच्या पकडीतून सुटून माणसानं व्यापक व्हावं, माणूस म्हणून जन्मलेल्या माणसानं निदान मनुष्य होऊन जगावं, याच हेतून सत्पुरुषांनी अनंत काळ बोध केला. त्यांच्या विचारांची स्पंदनं याच भूमीच्या वातावरणात आजही भरून आहेत. त्या विचारांचं बोट पकडून चिंतनाच्या मार्गावर चालू लागू, तर खरं ध्येय कोणतं, हे उमजून चालणं ध्येयसंगत होईल. त्या विचारांचं बोट आता पकडू!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा