हे विवरण सुरू करण्याआधी एक स्पष्ट केलं पाहिजे. मनाचे श्लोकांचा एक सार्वत्रिक अर्थ आहे. तो त्या पातळीवर योग्यच आहे. आपण मात्र साधकासाठीचा गूढार्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. प्रचलित अर्थ सर्वपरिचित अथवा सहजप्राप्य असल्यानं तो दिलेला नाही. केवळ मननार्थाचं विवरण केलं आहे. या चिंतनाची स्थळ-कालमर्यादा लक्षात घेता सर्वच दोनशे पाच श्लोकांचा मागोवा यथास्थित घेता येईल, असंही नाही. तरी प्रमुख श्लोकांचा मागोवा घेण्याचा आपला प्रयत्न राहील. तर आता पहिला श्लोक असा..
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा।।१।।
श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत सद्गुरुवंदना आहे आणि अखेरच्या दोन चरणांत त्यांच्या पंथावर कसं पाऊल टाकायचं, याचं मार्गदर्शन आहे.
कसा आहे हो हा सद्गुरू? पहिल्या श्लोकाचे दोन चरण सांगतात की, हा सद्गुरू गणाधीश आहे, सर्व गुणांचा अधिपती आहे, तोच मुळारंभ आहे, निर्गुणाचाही आरंभ आहे! आता प्रत्येक शब्दाचा मागोवा घेत गेलो, की हळूहळू अर्थ उकलत जाईल.. सद्गुरू हा गणाधीश आहे, म्हणजे नेमकं काय, हे उकलण्याआधी आपल्या जीवनाकडे थोडं पाहिलं पाहिजे. कसं आहे आपलं जीवन?
हे जीवन स्थूल आणि सूक्ष्म गोष्टींनी भरलेलं आहे. स्थूलात आपल्या देहाइतक्या आणि सूक्ष्मात आपल्या मनाइतक्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला खरा अनुभव नाही. आपलं जीवन दृश्य आणि भौतिक भासत असलं तरी सूक्ष्म वृत्तीवासनांतूनच ते विस्तारत आहे. समर्थ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘मनाच्या वृत्ती नाना। त्यांत जन्म घेते वासना। वासना पाहातां दिसेना। परंतु आहे।।’’ (दासबोध, दशक ९, समास ८). या मनात अनंत वृत्ती उत्पन्न होत असतात आणि त्यातून वासना प्रसवत असते आणि ती कृतीसाठी या देहाला जुंपत असते. थोडक्यात आपल्या जीवनाचा डोलारा भौतिक भासत असला तरी त्या जीवनावर सूक्ष्म अशा वासनावृत्तीचाच अंमल आहे. आता या वासना निर्माण होतात मनात आणि त्यांच्या पूर्तीचे प्रयत्न केले जातात ते इंद्रियांद्वारे. ही इंद्रियंही स्थूल आणि सूक्ष्म कार्य करीत असतात. ज्ञानेंद्रियांद्वारे सूक्ष्म आणि कर्मेद्रियांद्वारे स्थूल कार्य पार पाडलं जात असतं. तरी या दोन्हींचा वापर मनाच्या वासनावृत्तींच्या पूर्तीसाठीच होत असतो. आता ही वासना कशी आहे? ती क्षणभंगुर देहभौतिकाशीच जखडली आहे. देहसुख आणि भौतिक सुखाच्या पूर्तीसाठीची ही वासना सदोदित मला उद्युक्त करीत असते. प्रत्यक्षात हा देहही नश्वर आहे आणि हे भौतिकही नश्वर आहे. थोडक्यात या देहाद्वारे जे जे भौतिक प्राप्त केलं जातं ते ते कालौघात बदलणारं वा नष्ट होणारंच आहे. त्यामुळे या देहिक आणि भौतिकावर कालाचाच प्रभाव आहे. तरीही अशाश्वतात शाश्वत सुख शोधण्याची माझी धडपडच दु:खाला कारणीभूत ठरते. हे चित्र पालटण्यासाठी इंद्रियांद्वारे बहिर्मुख धावणाऱ्या मनाला अंतर्मुख करूनच भौतिकाच्या प्रभावातून सोडवावं लागतं. ही कला तोच शिकवू शकतो जो स्वत: इंद्रियाधीन नाही! जो स्वत: बद्ध आहे तो दुसऱ्या बद्धास सोडवू शकत नाही. जो स्वत: चिखलात रुतला आहे तो चिखलात रुतत असलेल्याला वाचवू शकत नाही. जो स्वत: इंद्रियाधीन आहे, ज्याचं मन स्वत:च्या ताब्यात नाही तो दुसऱ्याला मन ताब्यात आणण्याची कला शिकवू शकत नाही. त्यामुळे जो इंद्रियगणांचा अधिपती आहे, अशा ‘गणाधीश’ सद्गुरूकडूनच ती कला शिकता येते. त्या गणाधीश सद्गुरूला वंदन असो!!
– चैतन्य प्रेम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा