अनेकांचा असा समज असतो की बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ आणि स्वतंत्र आहे. लोकमान्य टिळक यांनीही ‘गीतारहस्य’ या ग्रंथात म्हटलं आहे की, ‘‘मनुष्य कोणतेही कर्म करू लागला म्हणजे ते कर्म बरे आहे किंवा वाईट आहे, करण्यासारखे आहे किंवा नाही इत्यादि गोष्टींचा तो आपल्या ‘व्यवसायात्मिक’ (अर्थात निवड करण्याची क्षमता असलेल्या) बुद्धींद्रियाने प्रथम विचार करतो आणि मग ते कर्म करण्याची इच्छा अगर वासना (म्हणजे वासनात्मक बुद्धी) त्याच्या मनात होऊन सदर कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो, असा मनोव्यापाराचा क्रम आहे.’’ (गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, पृ. १२७, टिळक बंधु प्रकाशन, १९६३). प्रत्यक्षात असाच क्रम दिसतो का? आपल्यातील मनोवेगांच्या प्रवाहाकडे आणि त्यानुसार आपल्याकडून होणाऱ्या वर्तनाकडे बारकाईनं पाहिलं तरी जाणवेल की, आपण बुद्धीप्रमाणे वागत नाही, तर मनाच्या आधीन होऊन वागतो! थोडक्यात निर्णय बुद्धीच्या नव्हे, तर मनाच्या प्रभावानुरूप घेतला जातो. मनानं घेतलेल्या निर्णयाला ‘मम’ म्हणून दुजोरा देण्यापुरताच बुद्धीला आपण वाव देतो आणि नंतर मनानं भावावेगांनुसार घेतलेल्या त्या निर्णयाच्या आणि त्यानुसार झालेल्या कृतीच्या बचावासाठी, समर्थनासाठी आपण बुद्धीला युक्तिवाद करण्यासाठीही राबवतो. त्यामुळे लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे, कर्म करू लागल्यानंतर ते बरे आहे की वाईट, हे माणूस ठरवतो, असं नव्हे, तर मनाच्या ओढींपायीच माणूस कर्मपसाऱ्यात गुंतत जातो. कर्तव्यकर्माची सीमारेषा ओलांडून मोहासक्त होऊन तो अनंत कर्मात नाहक गुंतत जातो. त्या कर्माचा बरे-वाईटपणा आणि त्या कर्मापायी ओढवू शकणारा बरा-वाईट परिणाम बुद्धी जाणवून देतेही, पण मनाच्या ओढीसमोर तिचा स्वर जणू क्षीण होऊन जातो. तेव्हा बुद्धीवरही अंमल गाजविण्याची मनाची ही शक्ती जाणूनच समर्थ म्हणतात, ‘‘नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।’’ जर बुद्धी निर्णय घेत नाही तोवर मन शांत बसून असते, बुद्धी निर्णय घेत नाही तोवर एकाही कर्माकडे मन वळले नाही, अशी स्थिती असेल, तर मग, ‘‘न होता मनासारिखे दु:ख मोठे।’’ हा चरण समर्थानी सांगितलाच नसता! आता या बुद्धीचे सात्त्विक बुद्धी, राजस वा तामस बुद्धी (जी अनेकदा दुर्बुद्धीही भासते) आणि सदसद्विवेकबुद्धी असे बुद्धीचे तीन प्रकार नाहीत, हे नमूद करून लोकमान्य याच ग्रंथात पुढे म्हणतात, ‘‘बुद्धी एकच असून चांगल्याची निवड करणे, हा सात्त्विक धर्म त्या एकाच बुद्धीच पूर्वसंस्काराने, शिक्षणाने, इंद्रियनिग्रहाने किंवा आहारादिकांनी येत असतो; आणि या पूर्वसंस्कारादि कारणांच्या अभावी तीच बुद्धी केवळ कार्याकार्यनिर्णयाच्या कामीच नव्हे, तर इतर बाबतीतही राजस किंवा तामस होऊ शकते.. (त्यामुळे) आपली बुद्धी सात्त्विक करणे हे प्रत्येकाचे काम होय आणि इंद्रियनिग्रहाखेरीज ते काम होऊ शकत नाही.’’ (गीतारहस्य, पृ. १२९). आता या इंद्रियनिग्रहाचा संबंध थेट मनोवेगांशीच तर आहे ना? मनोवेग बेलगाम होतात म्हणूनच इंद्रियनिग्रहाचा विचार आला ना? आपण मागेच पाहिलं त्यानुसार विषयांची गोडी इंद्रियांना नसते. ती मनाला असते. डोळ्यांद्वारे तेच पाहिलं जातं ज्याची मनाला गोडी असते. कानांद्वारे तेच ऐकलं जातं जे ऐकायची मनाला गोडी असते.. तेव्हा इंद्रियं ही मनाच्या ताब्यात असलेली निव्वळ उपकरणं आहेत. त्यामुळे ‘शरीररूपी रथाच्या इंद्रियरूपी घोडय़ांचे मनोमय लगाम बुद्धीरूपी सारथ्याच्या हाती एकवटले पाहिजेत,’ हे कठोपनिषदातील जे रूपक लोकमान्य वापरतात त्यावरून हे लगाम बुद्धीच्या हाती या घडीला नाहीत, हेच सूचित होते! म्हणूनच समर्थ या मनाला बजावतात, ‘‘नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे..’’
-चैतन्य प्रेम