मनोबोधातल्या सहाव्या श्लोकाकडे नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते ती म्हणजे कामना विकाराच्याही आधी कामना विकाराच्या अपूर्तीमुळे जो उत्पन्न होतो, त्या क्रोधविकाराचा प्रथम उल्लेख आहे! याचं एक कारण असं की कामना ही सुप्त असते, अदृश्य असते, तिच्या पूर्तीतून जोपासला जाणारा लोभ आणि मोहही सुप्त असतो, अदृश्य असतो. या कामनांच्या अपूर्तीतून उत्पन्न होणारा क्रोध मात्र दृश्य असतो.. ढळढळीतपणे दिसणारा आणि दुसऱ्याला झळा लागतील, असा असतो! एवढंच नाही, तर तो ज्याच्या अंतरंगात उत्पन्न झाला असतो त्याचीही आंतरिक शांती अंतिमत: उद्ध्वस्त करणाराच असतो! त्यामुळे समर्थ थेट दिसणारा जो विकार आहे, तो आटोक्यात आणायला प्रथम सांगत आहेत आणि त्याचबरोबर तो ज्या सूक्ष्म विकारांतून उगम पावतो त्या कामादि नानाविकारांकडे लक्ष वेधत आहेत. श्रीकाणेमहाराज यांनी पाचव्या श्लोकाच्या ‘विकारे घडे हो जनीं सर्व ची ची’ या अखेरच्या चरणाची सांगड सहाव्या श्लोकाच्या प्रारंभाशी जोडली आहे. कारण समाजात नालस्ती झाली तर क्रोधच उत्पन्न होतो ना? म्हणून ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी।’ अशी या सहाव्या श्लोकाची सुरुवात आहे, असं काणेमहाराज सांगतात. तर समर्थाच्या बोधानुसार या षट्विकारदर्शनाचा थोडा संक्षेपानं मागोवा घेऊ. अध्यात्मही एकवेळ बाजूला ठेवू, पण विकारांच्या जाळ्यात जो बद्ध आहे तो भौतिक आयुष्यातही खरं समाधान प्राप्त करून घेऊ शकत नाही. इतकंच नाही, तर विकारांशी झुंजण्यातच त्याची शक्ती खर्च होत असते आणि त्यामुळे उत्तुंग ध्येय तो ठरवूही शकत नाही. समर्थानी ‘दासबोधा’त बद्धाचं वर्णन करताना म्हटलं आहे, ‘‘बहु काम बहु क्रोध। बहु गर्व बहु मद। बहु द्वंद्व बहु खेद। या नाव बद्ध।। बहु दर्प बहु दंभ। बहु विषये बहु लोभ। बहु कर्कश बहु अशुभ। या नाव बद्ध।।’’ (दशक ५, समास ७). कामना ज्या मनात सदोदित प्रसवत आहेत तिथं त्यांच्या अपूर्तीतून उत्पन्न होणारा क्रोधही प्रमाणाबाहेर असणारच! जिथं कमालीचा गर्व आहे तिथं कमालीचा मद असणारच. जिथं दर्प, दंभ आणि अनेकानेक विषयांचा लोभ आहे तिथं शुभ-अशुभाचं भान सुटून वागू नये तसं वागलं जाणार, बोलू नये तसं बोललं जाणार, करू नये ते केलं जाणार.. मग त्यातून दुसऱ्याशी सदोदित द्वंद्वाचे कर्कश प्रसंग ओढवत राहाणार! अशा विकारांच्या तुरुंगात माणूस स्वत:हून बद्ध झाला आहे. भगवद्गीतेचा आधार घेत समर्थही सांगतातच, ‘‘दंभ दर्प अभिमान। क्रोध आणी कठीण वचन। हें अज्ञानाचें लक्षण। भगवद्गीतेंत बोलिलें।।’’ (दासबोध, दशक १२, समास १०, ओवी २८). हे जे सहा विकार आहेत ते भल्याभल्यांना हतप्रभ करतात, पराभूत करतात. समर्थ सांगतात, ‘‘भल्यांसी वैर करिताती तें साही। वोळखा बरें। षड्रिपू कामक्रोधादि मद मत्सर दंभ तो।।’’ (षड्रिपुनिरूपण लघुप्रकरण, ओवी पहिली). भल्यांसी वैर करिताती! भला म्हणजे मोठा माणूस. मग तो समाजकारणात असो, राजकारणात असो, धर्मकारणात असो.. आपल्या क्षेत्रात एखादा माणूस कितीही का मोठा असेना, विकार त्याच्यापेक्षा मोठेच असतात! तो या विकारांच्या वेठबिगारीतच असतो. जो त्यांच्यावर ताबा मिळवतो, तोच खरा मोठा होतो! बरं या ओवीत समर्थानी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ या पाचच विकारांचा उल्लेख केला आहे. सहाव्या वैऱ्याचा उल्लेख या लघुप्रकरणाच्या पुढच्या ओवीत आहे आणि हा जो वैरी आहे त्याला समर्थानी ‘प्रपंच’ म्हटलं आहे, कारण लोभ आणि मोहानंच तर प्रपंच बरबटलेला असतो! हीओवी सांगते, ‘‘प्रपंच साहवा वैरी हे वैरी जिंकितां बरें। भल्यांसी लाविती वेढा परत्रमार्ग रोधिला।।’’ तर पहिल्या वैऱ्याचा विचार करू.
-चैतन्य प्रेम