समर्थ रामदास यांच्या मनोबोधाच्या श्लोकांतील तिसऱ्या क्रमांकाचा श्लोक हा जणू साधकाच्या आध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा पाया काय असला पाहिजे, हेच सांगणारा आहे. समर्थ सांगतात..
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।। ३।।
पहाटेचा प्रहर मोठा विलक्षण असतो. रात्रीचा अंध:कार सरू लागला असतो, पण पूर्ण प्रकाशही पसरलेला नसतो! अंधार विरून टाकणारे किरण अलगद उगवतीला स्पर्शू लागले असतात. सूर्य उगवण्याची ती चाहूल असते. या मार्गावर पहिलं पाऊल पडतं तेव्हा साधकाची आंतरिक स्थिती अशीच काहीशी असते. ज्ञानाची आस लागली असते, पण अज्ञानमय जगण्यातली गोडी पूर्णपणे संपलेली नसते. म्हणजेच अंधार ओसरू तर लागला असतो, पण पूर्ण प्रकाशही पसरलेला नसतो. जगण्याची रीत ‘मी’पणाचीच असते, पण मधेच काही क्षण अंतर्मुखतेचेही असतात. आपल्या वागण्या-बोलण्याचं किंचित अलिप्त परीक्षणही होऊ लागतं, पण संपूर्ण जगणं ज्ञानयुक्त नसतं. म्हणजेच किरण तर पसरू लागले असतात, पण सूर्य उगवलेला नसतो. तर पहाट आणि साधक जीवनाची सुरुवात ही अशी असते. या पहाटेला काय करावं? तर ‘राम चिंतीत जावा’! पहा हं, इथं राम बोलत जावा, गात जावा, ऐकत जावा, म्हणत जावा.. असं काहीही सांगितलेलं नाही. तर राम चिंतीत जावा, असं सांगितलंय! कारण ज्ञान भारंभार ऐकता येतं, वाचता येतं, सांगता येतं. पण जोवर त्याचं चिंतन होत नाही तोवर मनन होत नाही. मनन होत नाही तोवर आचरणात पालट होत नाही! सगळं जगणं कसं आहे? अहोरात्र राम नव्हे तर काम चिंतीत जावा, या पठडीतलं आहे. सतत कामनांचंच चिंतन आहे, कामनांचंच स्मरण आहे. कामनांचंच मनन आहे आणि त्यामुळे समस्त आचरण त्या कामनापूर्तीसाठीच सुरू आहे. या कामनाही शुद्ध जाणिवेतून स्फुरणाऱ्या नाहीत तर मायासक्त जाणिवेतून सदोदित प्रसवणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यातील कित्येक कामना अवास्तव आणि अशक्य कोटीतल्याही आहेत. त्यामुळेच त्यांच्या अपूर्तीतून चिंता आणि असमाधानही प्रसवत आहे. त्यामुळे सगळं जगणंच असमाधानानं, चिंतेनं भरून आहे. तेव्हा साधनेच्या पंथावर पाऊल टाकत आहात ना? मग आता तरी कामनांचं चिंतन सोडा आणि रामाचं चिंतन सुरू करा, असं समर्थ सांगत आहेत. ‘दासबोधा’च्या १५व्या दशकातील सातव्या समासात एक फार मार्मिक ओवी आहे. ती अशी, ‘‘स्मरण म्हणिजे देव। विस्मरण म्हणिजे दानव। स्मरण विस्मरणें मानव। वर्तती आतां।।’’ देव, दानव आणि मानवाची किती अचूक व्याख्या आहे ही! आत्मस्वरूपाचं स्मरण म्हणजे देव. देवलोकात असूनही ते स्मरण जेव्हा सुटलं तेव्हा दानवाचा जन्म घ्याव्या लागल्याच्या कथा आहेत. त्याचबरोबर दानव वंशात जन्मूनही केवळ स्मरणाच्या जोरावर देवत्व पावलेला प्रल्हादही आहे. माणसात मात्र स्मरण आणि विस्मरणाची सरमिसळ आहे. म्हणूनच तो कधी देवासारखा दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो तर कधी राक्षसासारखा दुसऱ्याच्या यातनांना कारणीभूत ठरतो. रामाचं चिंतन हे आत्मस्वरूपाचं स्मरण साधून देणारं आहे तर कामनांचं चिंतन हे अंतरंगातील दशेंद्रियांच्या रावणालाच जोपासणारं आहे. रामाचं चिंतन हाच अंतरंग प्रकाशित करणारा उजेड आहे आणि रामाचं विस्मरण हाच अंतरंग झाकोळून टाकणारा अंधार आहे. त्यामुळे साधकानं चिंतनाच्या प्रकाशात वाटचाल केली पाहिजे. त्यासाठीच साधक जीवनाच्या प्रभातकाळी ‘‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा,’’ असं समर्थ सांगतात!

-चैतन्य प्रेम

fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Story img Loader