क्रोधनिरूपणाच्या अखेरीस भल्याने, म्हणजे भल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्यानं कोप सांडावा आणि शांतीनं राहावं, असं समर्थ सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘‘क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तों नव्हे।।’’ आता क्षुल्लक म्हणजे कोण? तर ज्याचं जीवन दिशाहीन आहे किंवा त्या जीवनाला काही दिशा असावी, असंही त्याला जाणवत नाही, ज्याचं जीवन क्षुद्र विकारवासनांच्या पूर्तीसाठीच सरत आहे, त्यानं हवं तर कोप पाळावा! हा पाळावा शब्दही फार खुबीदार आहे. प्रत्यक्षात क्रोधच माणसाला पाळू लागतो. एखादं पाळीव कुत्रं जस मालकासाठी आणि परक्याच्या विरोधात सहज भुंकतं तसा क्रोधानं पाळलेला माणूस त्या क्रोधाच्या आधारावर दुसऱ्याचं मन दुखावेल असं बोलू आणि वागू लागतो. समर्थ म्हणतात, ज्याला जीवन व्यापक ध्येयाच्या पूर्तीसाठी जगायचं आहे त्यानं क्रोधाच्या आहारी जाऊन वेळ आणि श्रम, शारीरिक आणि मानसिक शक्ती वाया घालवू नये. ते त्याचं कामच नाही. आता इथे एक प्रश्न उपस्थित होईल की, व्यापक जीवनध्येय म्हणजे नेमकं कोणतं? तर हा सर्व बोध साधकासाठी असल्यानं हे व्यापक जीवनध्येय आध्यात्मिकच अध्याहृत आहे. संकुचित जगण्याची रीत बदलून व्यापक होत जायचं आहे. मनानं, वृत्तीनं, भावनेनं, विचारानं आणि अगदी कल्पनेनंसुद्धा! मग कुणाच्या मनात असाही प्रश्न येईल की, माणूस काही एकटाच जगत नाही. तो समाजात जगतो. समर्थानीही त्यांच्या काळी समाजाला जे आवश्यक होतं त्याकडेही दुर्लक्ष केलं नाही. त्यासाठी त्यांनी बलोपासनेवर, राजकारणावर, समाजकारणावर भर दिला होता. मग अशा सामाजिक वा राजकीय व्यापक ध्येयासाठी कधीकधी क्रोध आवश्यक किंवा अनिवार्य नसतो का? प्रश्न मोठा चपखल आणि चलाख आहे. सामाजिक वा राजकीय व्यापक ध्येयासाठी ज्यांना जगायचं आहे त्यांनी क्रोधाचा वापर एक साधन म्हणून अनिवार्य असेल तरच अवश्य करावा. अन्यायाविरोधात सामाजिक क्रोध संघटित करणं आणि त्यातून परिवर्तनाला चालना देणं, हादेखील मार्ग आहे. त्याचवेळी साधन हे साध्यापुरतं असतं, हे मात्र विसरू नये. क्रोध हाच राजकारणाचा, समाजकारणाचा पाया होऊ नये. पण खरं सांगायचं तर राजकारणाला किंवा समाजाला वळण लावणारे तशी शक्ती घेऊनच जन्माला येतात. तेव्हा आपण केवळ साधकापुरता आणि त्याच्या साधनेपुरताच विचार करीत आहोत आणि त्या परिघातलं जे व्यापक आध्यात्मिक ध्येय आहे त्यापुरता विचार केला तर क्रोधाच्या सापळ्यातून सुटका झालीच पाहिजे, यात शंका नाही. तर क्रोध हा भल्याचे काम नसेल तर तो सोडण्यासाठी आपल्यातला क्षुल्लकपणा सोडावा लागेल! क्षुल्लक इच्छांमध्ये अडकणं आणि त्यांची पूर्ती झाली नाही तर क्रोधायमान होणं थांबलं पाहिजे. क्षुल्लक मनोवेगांच्या आहारी जाऊन वाहावत जाणं आणि त्या मनोवेगांच्या प्रतिकूल गोष्टी घडल्या तर रागाच्या आहारी जाणं थांबलं पाहिजे. क्षुल्लक कारणावरून चिडणं, क्षुल्लक प्रसंगाला नको तितकं महत्त्व देऊन आपली मानसिक आणि वैचारिक पातळी घसरवणं थांबवलं पाहिजे. जगण्यातले सर्व क्षुल्लक हेतू, क्षुल्लक सोस, क्षुल्लक ओढी मावळल्या पाहिजेत. जगण्याची रीत जर क्षुल्लक असेल तर जगणं भव्य कसं होईल? जगण्याचं ध्येयच जर क्षुल्लक, संकुचित असेल तर जगणं व्यापक कसं होईल? तेव्हा क्षुल्लक भावना, क्षुल्लक कल्पना, क्षुल्लक वासना, क्षुल्लक विचार, क्षुल्लक इच्छा आणि क्षुल्लक संकल्पांच्या आहारी जाण्याची आणि त्यानुसार वाहावत जाण्याची आपली सवय आपल्याला प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक बदलावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा