मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाच्या आधारावर साधकाला आणि साधनेलाच केंद्रबिंदू मानून आपण षट्विकारांचा संक्षेपानं मागोवा घेत आहोत. या श्लोकातील नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नानाविकारी।। या दोन चरणांचा मागोवा घेताना काम आणि क्रोधाचा उलगडा काही प्रमाणात आपण केला. लोभाचा विचार आपण मत्सर आणि दंभाच्या वेळी करणार आहोत. आता पुढील दोन चरणांत समर्थ सांगतात की, नको रे मना सर्वथा अंगिकारूं। नको रे मना मत्सरू दंभभारू।। यातील तिसऱ्या चरणाचा पाठभेद नको रे मदा सर्वथा अंगिकारूं। असा ग्राह्य़ मानून आपण मद या विकाराचा मागोवा आता घेऊ. हा मद कसा आहे? समर्थ ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात सांगतात की, ‘‘मदाचीं गुप्त हें कामें अंतरींचा कळेचिना।।’’ म्हणजे हा मद अंतरंगात अत्यंत सुप्तपणे, गुप्तपणे वसत असतो आणि कार्यरत असतो. त्याच्या इशाऱ्यानुसार होणारी हालचाल दिसते, पण तो मात्र दिसत नाही. हा मद कसा आहे? ‘‘मद हा वोखटा मोठा मद हा खेदकारकु। ’’ हा मद मोठा खोटा आहे आणि खेदच उत्पन्न करणारा आहे. हा मद किती प्रकारांनी वावरतो? समर्थ सांगतात, ‘‘देहाचा मद शक्तीचा द्रव्याचा मद अंतरीं। विद्येचा मद भाग्याचा मदरूप बहुविधा।।’’ देहाचा मद आहे आणि त्यामुळे देहाच्या रुपाचा, शक्तीचा, क्षमतांचा मद माणसात प्रसवत असतो. द्रव्याचा आधार वाढता असेल तर त्या संपत्तीचा मद अंतरंगात वसू लागतो. आता म्हणतात, विद्येचा मद भाग्याचा! म्हणजे विद्या आहे म्हणून खरं तर भाग्याची साथ मिळते, पण त्या भाग्याचाच मद निर्माण होतो! आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा मद निर्माण होतो आणि भाग्याची साथ असते त्यामुळे तो मद लोक सहन करतात! ज्ञानाचा गर्व निर्माण होतो आणि मग अजाण, अज्ञानी लोकांबाबत तुच्छभाव उत्पन्न होतो. तसाच देहाचा मद निर्माण झाला की आपल्यापेक्षा बलहीन, रूपहीन असलेल्यांबाबत तुच्छताभाव जोपासला जातो. संपत्तीचा मद निर्माण झाला की संपत्तीहीनाबाबत तुच्छताभाव जोपासला जातो. असा तुच्छताभाव जोपासणं थांबावं आणि मद किती हानीकारक आहे, हे उमजावं म्हणून समर्थ कळकळीनं सांगत आहेत की, ‘‘नको रे मदा सर्वथा अंगिकारूं।’’ इथं ‘अंगिकारू’ हा शब्द फार अर्थगर्भ आहे. मद जणू या शरीराच्या आकारातच व्याप्त होतो! नव्हे, हे शरीर हाच जणू मदाचा आकार होतो!! एखाद्या गोष्टीचा आपण अंगीकार करतो, याचा अर्थ त्या गोष्टीसाठी तन आणि मन दोन्ही समर्पित होतं. या मदानं काय घडतं? ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात समर्थ सांगतात की, ‘‘मदानें थोकली विद्या पुढें आणीक होइना। मानेना ना मना येना आपुले होरटी कढे।।’’ या मदामुळे विद्या म्हणजे शिकणं, आकलन हेच खुंटून जातं. ठप्प होतं. मदामुळे मीच काय तो सर्वज्ञानी, मलाच सारं काही समजतं, इतरांनी मला सांगण्याची गरज नाही, इतरांकडून मी शिकावं असं काही उरलेलंच नाही, अशी भावना झाली की मग शिकणंच संपलं. आकलन संपलं. वाढ संपली. विकास संपला. मग तो दुसऱ्याचं मानतच नाही की दुसऱ्यानं सांगितलेलं सत्यही त्याच्या मनात उतरत नाही. तो आपलाच हट्टाग्रह जोपासत कुढत राहातो! खरं तर हे एक संकट काय कमी का आहे? अध्यात्मात तर मला समजू लागलं, असं ज्याला वाटू लागतं त्याची समजच प्रत्यक्षात ओसरू लागली असते आणि आपल्याला खरं तर काहीच कळलेलं नव्हतं, अशी ज्याची भावना होत जाते त्याला खरं कळू लागलेलं असतं. आपल्यातलं अज्ञान ओळखता येणं यापेक्षा मोठं ज्ञान नाही आणि आपल्या अज्ञानालाच ज्ञान मानू लागणं यासारखं दुसरं मोठं अज्ञान नाही! यापेक्षा दुसरा मोठा आत्मघात नाही!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा