लोभ आणि मोहानं बरबटलेला प्रपंच हा षट्विकारातला मोठा विकार आहे. लोभ आणि मोह इतका सूक्ष्म असतो की त्याचं अस्तित्व पदोपदी असूनही तो लपवण्याचाच आपण प्रयत्न करत असतो. किती गोष्टींचा लोभ आणि मोह जिवाला जडला असतो, ते समर्थ एका चरणात सांगतात, ‘‘घर गांव ठाव माझा वाडे शेत मळे गुरें। पुत्र कन्या वधू माझी सर्व सांडोनि चालिला।।’’ माझं घर, माझा गाव, माझा वाडा, माझं शेत, माझा मळा, माझी गुरं, माझा पुत्र, माझी कन्या, माझी पत्नी.. जन्मभर माझं-माझं करत ज्यांच्यात गुंतत राहिलो आणि ज्यांच्यासाठीच जगत राहिलो ते सर्व शेवटच्या क्षणी सांडून जावंच लागतं. केवळ तो सर्व माझेपणा घट्ट करणारे लोभ आणि मोहाचे ठसे माझ्या वासनापुंजासोबत पुढील जन्माकडे हस्तांतरित होतात. तरी जे नाही त्याचा लोभ आणि जे आहे त्याचा मोह, या सापळ्यात माणूस अडकतच राहातो. जे आहे त्यातलं अनुकूल ते सारं टिकावंसं वाटतं आणि अधिक काही मिळवावंसं वाटतं. लोभ आणि मोहाचा प्रवाह हा असा अंतरंगात सतत वाहाता असतो. हे सारं इथंच सोडून जायचंय, हे माहीत असूनही या साऱ्यातलं मनाचं गुंतणं काही कमी होत नाही. एकदा श्रीसद्गुरू म्हणाले की, ‘‘ज्या ज्या गोष्टींना तुम्ही माझेपणानं पकडलं आहे त्यातली एकही शेवटी बरोबर येणार नाही. मग जे बरोबर येणार नाही ते आत्ताच मनानं सोडलंत तर काय हरकत आहे?’’ खरंच मृत्यूच्या अखेरच्या श्वासापर्यंत मनानं आपण काहीच सोडत नाही आणि अखेर शरीरानं सारं सोडायची वेळ येते तेव्हा मनाला आत्यंतिक यातना होतात! मग जर मनानंच हे सारं सोडता आलं, तर अखेरच्या क्षणीही मन तृप्तच असेल. आता हे सारं सोडायचं म्हणजे खरं सोडून द्यायचं नाही. जे आहे ते राखायचं, पण त्यात अडकायचं नाही. त्येन त्यक्तेन भुंजीथा:! मनानं त्यागून शरीरानं त्यातच राहायचं. आता प्रश्न असा की, साधकाला हे साधेल का आणि कसं? यासाठी आंतरिक मनोवेगांकडेच नीट लक्ष द्यावं लागेल. माझ्या मनात कोणत्या गोष्टींचा लोभ आहे आणि कोणत्या गोष्टींचा मोह आहे, याचा शोध घेत राहावं लागेल. ज्या गोष्टींचा लोभ व मोह आहे त्या कायमचा आधार ठरू शकतात का, हे ठरवावं लागेल. मग माझ्याच जीवनप्रवाहाकडेही एकवार पाहून छाननी करावी लागेल. मला ज्या वेळी ज्या गोष्टींची गरज भासली त्या कधी कधी अनपेक्षितपणे मला प्राप्त झाल्या नाहीत का? भले त्यासाठी माझे प्रयत्न कारणीभूत ठरले असतील, पण त्या वेळच्या त्या प्रयत्नांनाही यश सुलभतेनं आलं नाही का? जर आठवू लागलो तर असे अनेक प्रसंग आठवतीलही. तेव्हा ज्या गोष्टींची खरी निकड असते त्या प्राप्तही होतात. पण बरेचदा लोभ आणि मोह हा मनाच्या हवेपणातून, अतृप्तीतूनच उफाळला असतो. त्यामुळे अवास्तव गोष्टींची प्राप्ती मी इच्छितो का, याचं परीक्षण करावं लागेल. सर्वात खरा आणि सोपा उपाय म्हणजे, राजयाचि कांता काय भीक मागे? या तुकाराम महाराजांच्या सवालाचं स्मरण ठेवणं. माझा सद्गुरू जर अनंत कोटी ब्रह्माण्डांचा नायक आहे तर माझी इच्छा अपूर्ण राहीलच कशी? जर ती अपूर्ण असेल तर ती माझ्या हिताची नाही त्यामुळेच ती पूर्ण झालेली नाही आणि होणारही नाही, ही जाणीव जागी करणं! मग काही हवं (काम) हा हट्ट ओसरू लागेल, हवं ते मिळालं नाही की मनाची होणारी तगमग (क्रोध) शांत होईल, जे मला हवं होतं ते दुसऱ्याला मिळालेलं पाहून येणारी उद्विग्नता (मत्सर) कमी होईल, माझ्यात ज्या क्षमता सहजगत्या आहेत वा सहज विकसित झाल्या आहेत त्यांच्याबद्दलचा गर्व (मद) लयाला जाईल, जे नाही त्याची ओढ आणि आहे त्याची आसक्ती (लोभ-मोह) यातला फोलपणा उघड होईल. हे सारं होऊनही सत्त्वगुणातून सुटणं फार कठीण. कारण तिथं दंभाचा मोठा अडसर आहे!
– चैतन्य प्रेम