थोडं देवाचं करावं आणि भरपूर समाधान मिळावं, सर्व कटकटी मिटाव्यात, यासाठी साधनेच्या मार्गावर आलो तर मधेच ‘प्रपंचीं वीट मानिला। मनें विषेयत्याग केला। तरीच पुढें आवलंबिला। परमार्थमार्ग।।’’ हा एवढा भलाथोरला डगमगता पूल आलाच का? असं अनेकांना वाटतं. अनेकजण हताश होऊन घराकडे म्हणजेच ‘मी’ आणि ‘माझे’कडे वेगानं माघारी फिरतात. तर काही या पुलाआधीच हताशपणे बसून राहातात. या बसून राहिलेल्या, माघारी न फिरलेल्या जिवांना समर्थ हा पूल पार कसा करायचा, ते सांगताना पुढील ओवीत म्हणतात, ‘‘त्याग घडे अभावाचा। त्याग घडे संशयाचा। त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै।।’’ या पुलावर पहिलं पाऊल टाकण्यासाठी जो विश्वास हवा, त्याचाच अभाव आहे ना? हा पूल मला पार करता येईल का, हाच संशय आहे ना? आणि हा पूल पार करावा तरी कसा, याबाबत अज्ञान आहे ना? तर या अभावाचा, संशयाचा, अज्ञानाचा त्याग शनै शनै म्हणजे पावला पावलागणिक घडत जाईल! एखादा रस्ता निसरडा भासतो, पण त्यावर पहिलं पाऊल टाकलं की दुसरं पाऊल टाकण्यासाठीचा विश्वास बळावतोच ना? जसजसा रस्ता तुडवत जाऊ तसतसा, एवढा मोठा रस्ता मला पार करता येईल का, हा संशयही मावळत जाईल ना? चालावं कसं, याचं सांगोपांग ज्ञान मिळवण्यातच वेळ गेला आणि प्रत्यक्षात चाललंच नाही, तर काय उपयोग? त्यापेक्षा जो चालतच राहातो त्याला चालावं कसं, हे ज्ञान नसलं तरी काय बिघडतं? मग रस्ता जितका मागे पडेल तितकं, त्यावरून मला मुक्कामाला पोहोचता येईल का, हे अज्ञानही मागे पडेल! प्रपंचाचा वीट वाटणं काही क्षणार्धात साधणार नाही. कुणी तर विचारेल की, असं ठरवून एखाद्या गोष्टीचा वीट वाटू शकतो का? अगदी बरोबर! यासाठी एकच करायचं की जो प्रपंच आपण अजाणतेपणानं करतो, तो जाणतेपणानं करू लागायचं. जो प्रपंच आपण अनवधानानं करीत आहोत, तो अवधानानं करू लागायचं. एवढं केलं तरी प्रपंचात आपण किती वेळ, श्रम, शक्ती वाया घालवत असतो त्याची जाणीव होईल. साधी गोष्ट घ्या. पुढील आठवडय़ात एका महत्त्वाच्या प्रापंचिक कामानिमित्त मला कुणाला तरी भेटायचं आहे. तर तो आठवडा कसा जातो? अनंत चिंतांमध्ये जातो! जे काम करायचं आहे त्याबाबतची उलटसुलट चिंता. ते काम होईल की नाही, याची चिंता. ज्या माणसाला भेटायचं आहे तो भेटेल की नाही, याची चिंता. तो भेटला नाही तर नंतर कधी भेटेल, याची चिंता. तो भेटला, पण त्यानं कामात मदतच नाही केली तर काय होईल, याची चिंता. त्याचं मन कसं वळवता येईल, याची चिंता. त्यानं होकार दिला तरी काम किती दिवसांत होईल, याची चिंता. त्याउप्परही जर सर्व काही जुळून आलं आणि काम मनासारखं झालं तरी पुढे त्यात काही अडचण येणार नाही ना, याची चिंता! एका कामासाठी किती चिंतांचं ओझं आपलं मन वाहात असतं.. आणि अशी शेकडो कामांची रांग मनात लागली असते बरं का! प्रपंचाचा वेगच असा आहे की त्यात आपण जुंपलो गेलो की त्याचा वीट वाटणं सोडूनच द्या, त्याबाबत तटस्थपणे विचार करणंही आपल्याला साधत नाही. त्यामुळेच आपल्याच प्रपंचगतीचा थोडा थोडा तटस्थपणे विचार करीत गेलं तरी अनेक गोष्टींतली आपली नाहक ओढ, नाहक आसक्ती, नाहक चिंता, नाहक व्यग्रता, नाहक गोंधळ, नाहक हट्टाग्रह आपल्या लक्षात येऊ लागतील. अख्खा जन्म सरूनही प्रपंच अपूर्णच राहातो. कारण श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, खारटपणा हा जसा मिठाचा स्वभावधर्म आहे त्याप्रमाणे अपूर्णता हा प्रपंचाचा स्वभावधर्मच आहे. मग अशा अपूर्ण प्रपंचाचा भले वीट नसेलही वाटत, पण त्यात आवडीनं रुतण्यात तरी काय लाभ, एवढा विचार तरी मनाला शिवेल ना?
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

– चैतन्य प्रेम