भगवंताच्यात आणि माझ्यात आंतरिक दुरावा निर्माण करणारी बुद्धी हीच पापबुद्धी. ती सोडण्याचा उपाय समर्थ सांगतात तो असा.. मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सारवीचार राहो।। म्हणजे नीतीयुक्त आचरणाचा आधार घेतला आणि अंतरंगात सार काय आणि असार काय, याचा विचार करीत गेलो, तर बुद्धी शुद्ध राहू शकते, भगवंताशी जोडलेली राहू शकते. आता ही ‘नीती’ आणि ‘सारविचार’ म्हणजे नेमकं काय? प्रथम ‘नीती’च्या अर्थाची उकल करू. बेळगावचे काणे महाराज यांनी मनाच्या श्लोकांवर ‘आत्मदर्शन’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात मना सर्वथा नीति सोडूं नको हो। या चरणाचा पाठभेद मना धर्मता नीति सोडूं नको हो। असा आहे. काणे महाराजांनी या ‘धर्मता नीती’चा अतिशय मनोज्ञ अर्थ सांगितला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार ‘धर्मता नीती’ म्हणजे ‘नामस्मरण’! भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या विवरणाच्या आधारे प्र. ह. कुलकर्णी यांनीही ‘मनोबोधामृत’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात ‘सद्गुरू आज्ञापालनाचे वचन पाळणे हीच नीती,’ असा ‘नीती’चा अर्थ सांगितला आहे! सद्गुरूंच्या बोधानुसार जगणं हीच नीती आणि या ‘नीती’चं जर प्रयत्नपूर्वक पालन करीत गेलो तर पापबुद्धी उत्पन्नच होणार नाही! याचं कारण माझ्या मनाचा पापाचरणाकडे कसा ओढा आहे आणि कोणत्या गोष्टींच्या सापळ्यात मी सहज अडकू शकतो, हे केवळ सद्गुरूच जाणतात. त्यामुळे त्यांचा बोध, त्यांची आज्ञा मला त्या गुंत्यातून सोडवणारीच असते. आता ज्यांना साक्षात देहात असलेले खरे सद्गुरू लाभले आहेत, त्यांना सद्गुरूंच्या बोधाचा लाभ सहज असतो. ज्यांनी या घडीला सगुण रूपात नसलेल्या अशा सत्पुरुषाला अंत:करणपूर्वक सद्गुरू मानून साधना सुरू केली आहे, त्यांना असा थेट बोध लाभत नाही, असं आपल्याला वाटू शकतं. तरीही त्यांनादेखील असाच बोध कसा लख्ख लाभतो, ते आता पाहू. श्रीगोंदवलेकर महाराजांची प्रवचनं अनेकजण वाचतात, समजा एकच प्रवचन अनेकांनी वाचलं तरी त्यातून प्रत्येकाला भिडणारी गोष्ट वेगवेगळी असू शकते. याचं कारण जो ज्या क्षुद्र वासनेत अडकला आहे त्या वासनेवर महाराज जे बोट ठेवतात ते ज्याचं त्यालाच स्पष्ट कळतं. अंतरंगातून सद्गुरू कसा बोध करतात, हे अधिक स्पष्ट करणारी एक सत्यघटना सांगावीशी वाटते. ‘चैतन्य चिंतन’ या सदरातही ती सांगितली होती. सद्गुरूंचा आधार मनानं घट्ट धरला तर अंतरंगातून बोध कसा आपोआप होत जातो, हे या प्रसंगानं जाणवलं तेव्हाची भावावस्था शब्दांत सांगता येत नाही. झालं असं. माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती. गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया आलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता. मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती. चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’ त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’ आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं. त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं, ‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी. म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’ तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला, ‘‘मीच!’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा