अंत:करणात नामाभ्यास सुरू असेल तर जगण्याची जी रीत आहे तिचंही सूक्ष्म निरीक्षण-परीक्षण होऊ लागेल. किंवा तसं झालं पाहिजे. त्या नामाचा अधिकाधिक संग घडत गेला पाहिजे. समर्थ सांगतात, ‘‘सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।।’’ (दासबोध, दशक ५, समास ९). श्रीगोंदवलेकर महाराजही सावधानता हे साधकाचं प्रधान लक्षण सांगतात. सावध झाल्याशिवाय नित्य काय आणि अनित्य काय, याचा विवेक साधणार नाही. नव्हे, त्याकडे लक्षच जाणार नाही. आपण कृती करतो, बोलतो तेव्हा हा सावधपणा नसतो. म्हणूनच तर अनवधानानं झालेल्या त्या कृतीनं, बोलण्यानं दुसऱ्याला आपण सहज दुखवतो. जगण्यातली सारी विसंगती ही अनवधानानं जगण्यामुळे ओढवली आहे. अवधान देऊन जगू लागू, सावधपणे जगू लागू तेव्हाच ही विसंगती कमी होत जाईल. आता हा सावधपणे जगणं म्हणजे काही कृत्रिमपणे, यांत्रिकपणे जगणं नाही. आपल्या वागण्या-बोलण्यात प्रेम, आत्मीयता, ऋजुता असावी पण गुंतणं नसावं! समर्थच सांगतात, ‘‘प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करील जाण। प्रपंचीं जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।’’ (दासबोध, दशक १२, समास १). बरेचदा काय होतं, संत काय सांगतात ते आपण नीट आणि पूर्ण अवधानानं ऐकतच नाही. त्यातलं आपल्या मताचं जे भासतं तेवढय़ाच वाक्याचं बोट पकडून त्यांना आपल्या प्रपंचजाळ्यात ओढू पाहातो! आपण मागेही एका सदरात पाहिलं होतं की, ‘प्रपंच करावा नेटका।’ असं समर्थ सांगतात. याचा अर्थ प्रपंच उत्तम करावा, असाच आपण मानतो. प्रत्यक्षात नेटका म्हणजे नेमका! आपण म्हणतो ना की त्यानं नेटक्या शब्दांत आपलं मत मांडलं. तर नेटक्या म्हणजे भारंभार नव्हे! जेवढं गरजेचं होतं तेवढंच. त्याची मर्यादा ओलांडणं म्हणजे नेटकेपणाची मर्यादा ओलांडणंच! तर प्रपंच नेटका करा, म्हणजे नेमका करा, जरूरीइतकाच करा. असा जर नेटका प्रपंच साधला ना, तरच परमार्थाचा विवेक ग्रहण करता येतो! ‘मग घ्यावे परमार्थ विवेका’!! तर त्याप्रमाणेच ‘‘प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करील जाण। प्रपंचीं जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।’’ या चरणाचा खरा अर्थ आपण नीट लक्षातच घेत नाही. आपण बेसावधपणे प्रपंच करीत असतो म्हणूनच तर त्यात फसतो, गुंततो, अडकतो. तो सावधपणे जो करतो त्यालाच परमार्थाची जाण येईल, तोच त्या जाणिवेसह परमार्थ करील. जो प्रपंचात अप्रमाण आहे त्याचा परमार्थही खोटाच! अप्रमाण म्हणजे? भाजीत मीठाचं प्रमाण जास्त झालं तर त्याला आपण अप्रमाण म्हणू ना? तसा जो प्रमाणाबाहेर प्रपंचातच गुंतून राहातो, प्रपंचच करीत राहातो त्यानं परमार्थी असल्याचा कितीही आव आणला तरी त्याचा परमार्थ हा खोटाच असेल, बेगडीच असेल! साऱ्या पसाऱ्यात गुरफटला आहे आणि तोंडानं फक्त म्हणतो आहे की मी निमित्तमात्र आहे, मी ब्रह्मभावातच जगत आहे.. तर ते ढोंग आहे. लौकिकार्थानं संसारात नसलेल्या एखाद्या संन्याशाच्या मनातही जर नावलौकिकाची आस निर्माण झाली, लोकांनी आपल्याला मानावं, अशी ओढ निर्माण झाली, तर त्याचा परमार्थ हा प्रपंचापेक्षाही अधिक घातक आहे, यात शंकाच नाही! तेव्हा नाम जर मनात सतत चालू असेल तर त्या नामाचा मनावर, चित्तवृत्तीवर परिणाम होत आहे की नाही, हेसुद्धा तपासलंच पाहिजे. तो होत नसेल तर नामातलं लक्ष सुटत आहे का, इकडेही पाहिलं पाहिजे. तेव्हा प्रपंचात प्रमाणाबाहेर न गुंतणं, तो नेटका करण्याचा अभ्यास करीत राहाणं आणि मनाला जास्तीत जास्त परमार्थ विवेकाच्या वाटेवर वळवत राहाणं हाच साधक जीवनाच्या प्रारंभीचा ‘सारविचार’ आहे. तसं साधू लागणं हीच अध्यात्माच्या वाटेवरची नामाची पहिली प्रचीती आहे.

-चैतन्य प्रेम

Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल
SET Examination Scheduled For 15th June Via Offline Mode
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?
case of murder of woman due to superstition remains of body thrown in all directions in Phaltan
फलटणमधील मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना फेकले, अंधश्रद्धेतून महिला खून प्रकरण
Story img Loader