श्रीसमर्थ रामदास महाराज यांच्या मनोबोधाच्या श्लोकांतल्या चौथ्या श्लोकाचं विवरण इथं पूर्ण झालं. हा श्लोक आणि त्याचा मननार्थ एकत्रितपणे परत एकदा पाहू. हा श्लोक असा आहे..
मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सारवीचार राहो।।४।।
मननार्थ : हे मना, वासनांच्या पूर्तीसाठी जगत राहू नकोस. कारण एका वासनेची पूर्ती होताच दुसरी वासना तात्काळ जन्म घेते. तिची पूर्ती होताच, तिसरी वासना जन्म घेते. याप्रमाणे वासनांची पूर्ती कधीच होत नाही. नवनव्या वासनांच्या झंझावातात आयुष्य संपून जातं. ज्या हेतूसाठी हा मनुष्यजन्म लाभला होता, त्या हेतूचीही पूर्ती होत नाही. त्यामुळे वासना ही फसवी आणि म्हणूनच दुष्ट असते. या वासनेच्या पाठी लागू नकोस. हे मना, वासनांच्या जाळ्यात अडकायचं नसेल तर शाश्वत भगवंताच्या जवळ राहाण्याचा प्रयत्न कर. भगवंतापासून दूर करणाऱ्या पापबुद्धीचा संग धरू नकोस. भगवंताच्या जवळ वासनेचा वास नाही. त्यामुळे बुद्धीही शुद्ध होत जाईल. हे साधण्यासाठी श्रीसद्गुरूंनी वा संतसत्पुरुषांनी जो बोध केला आहे त्यानुसार जगण्याचा अभ्यास कर. हीच खरी नीती आहे. ही नीती क्षणभरही सुटू देऊ नकोस. त्याच जोडीने अंत:करणात सतत नामानुसंधान राखण्याचा प्रयत्न कर. मनात नाम सतत चालू ठेवण्याचा अभ्यास करणे आणि जगण्यात किती निर्वासनता साधली आहे, वासनामुक्त जगणं कितपत साधलं आहे, अशी त्या नामाची प्रचीती पाहणं हाच सारविचार आहे! हे मना असा सार-विचार सतत करीत राहा.
तेव्हा चौथ्या श्लोकाचा गूढार्थ असा विराट आहे. आता पाचव्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक असा आहे..
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।। ५।।
या श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ प्रथम पाहू. ‘‘हे मना, पापसंकल्प सोडून सत्यसंकल्प चित्तात धरावा, विषयांची कल्पनाही मनात आणू नये, विकारवशतेमुळे जगात मनुष्याची छी:थू होते,’’ असा अर्थ समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी दिला आहे. सत्यसंकल्प म्हणजे शाश्वत सत्याचा अर्थात ब्रह्माचा संकल्प आणि पापसंकल्प म्हणजे मिथ्या संसाराचा किंवा विषयांचा संकल्प, असंही त्यांनी नमूद केलं आहे. (सार्थ मनोबोध, ढवळे प्रकाशन). हा अर्थ आपल्यालाही ऐकून माहीत आहे, पण या चरणांकडे नीट लक्ष न दिल्यानं अर्थाच्या अंत:प्रवाहाकडे आपलं लक्षच जात नाही. या श्लोकात दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. ‘संकल्प’ आणि ‘कल्पना’! संकल्पातही ‘पापसंकल्प’ आणि ‘सत्यसंकल्प’ असे दोन प्रकार सांगितले आहेत. बघा हं, ‘पापसंकल्प’ आणि ‘पुण्यसंकल्प’ असं म्हटलेलं नाही आणि त्यामागेही एक रहस्य आहे! ते ओघानं जाणून घेऊच. दुसरी गोष्ट म्हणजे ‘कल्पना’. ‘कल्पना’ म्हणजे काय? तर अमुक व्हावं, तमुक व्हावं, असा विचार. ‘संकल्पा’तही अमुक करीन, तमुक करीन, हीच छटा असते, पण कल्पनेत निश्चयात्मकता नसते, संकल्पात निश्चय असतो. कल्पना ही चांगल्या आणि वाईट अशा दोहोंची असते. चांगलं घडण्याच्या कल्पनेनं मनाला हुरूप येतो, वाईट घडण्याच्या कल्पनेनं मन चिंतेनं झाकोळतं. संकल्प मात्र चांगल्यासाठीच असतो, त्या ‘चांगल्या’चं आकलन मात्र आपल्या क्षमतेनुसार असतं!
-चैतन्य प्रेम