संकल्प हा निश्चयात्मक असला तरी आपल्या मनात सुरू असणाऱ्या संकल्प आणि कल्पना, यांच्यात एक निसरडी रेघ आहे. आपल्या कल्पना अनंत असतात आणि अगदी त्याचप्रमाणे आपले संकल्पही अनंत असतात. अमुक मिळवावं, अमुक व्हावं, अमुक घडावं, अमुक साधावं, अमुक करावं, अमुक टाळावं, अमुक स्वीकारावं, अमुक नाकारावं, अमुक टिकवावं.. असे अनंत संकल्प मनात क्षणोक्षणी प्रसवत असतात. त्यामुळे त्यांना ‘संकल्प’ म्हणणं खरं तर बरोबर नाही. प्रत्येक श्वासागणिक जणू एक संकल्प उत्पन्न होत असतो. मागेच ‘पूर्ण-अपूर्ण’ सदरात आपण पाहिलं होतं की खरा सत्यसंकल्पी परमात्माच आहे. अर्थात त्यानं सोडलेला संकल्प सत्यच होतो. जीव हा त्याचाच अंश असल्यानं त्याचाही संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही. फरक इतकाच की जीव हा अंशमात्र असल्यानं त्याच्या संकल्पपूर्तीला काळ, वेळ, परिस्थिती यांची साथ अनिवार्य असते. हे सारं जुळून आलं की त्याचा संकल्प पूर्ण होतोच आणि हे सारं कुठल्या जन्मी पूर्ण होईल, ते सांगता येत नाही. त्याचबरोबर हेसुद्धा खरं की जिवाचाही संकल्प वाया जात नाही, अर्थात पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही. तोवर जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटका मात्र नसते! शारदामातांनी सांगितलं आहे की, मिठाईचा तुकडा खायची इच्छा अपूर्ण राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो! तेव्हा माणसाची प्रत्येक इच्छा ही संकल्पच असते आणि ती त्याला सोडत नाही! तेव्हा असं आपलं मन सतत संकल्पांनी ओसंडत असतं. त्याचबरोबर या मनात सतत कल्पनांचाही झंझावात असतो. म्हणजेच अमुक करावं, असा संकल्प होतो. त्यापाठोपाठ, त्यात अमुक अडथळा तर येणार नाही, अशी कल्पनाही येते किंवा तसं झालं तर मग मी काय काय करीन, अशा कल्पनांची वलयं निर्माण होतात. थोडक्यात मनाला संकल्प आणि कल्पनांपासून विश्रांती नाही. मग संकल्प आणि कल्पनेच्या आव्हानाला सामोरं कसं जावं? साधनपथावर पहिली पावलं टाकणाऱ्या साधकाला म्हणूनच समर्थ सावध करत सांगतात की, ‘‘मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।’’ हे मना, पापसंकल्प सोडून दे, सत्यसंकल्प अंत:करणपूर्वक धारण कर! आता पापसंकल्प म्हणजे काय? ‘पाप’ शब्दाची जी व्याख्या आपण पाहिली तीच इथं लागू आहे. भगवंतापासून जे दूर करतं तेच पाप! तेव्हा भगवंतापासून दुरावा उत्पन्न होईल अशा प्रत्येक कृतीची इच्छा हाच पापसंकल्प! इथं एक गोष्ट मोठी रहस्यमय आहे की ‘पापसंकल्प’ सोडून द्यावा म्हणताना ‘पुण्यसंकल्प’ जीवी धरावा, म्हटलेलं नाही! ‘सत्यसंकल्प’ म्हटलेलं आहे! असं का? कारण आपल्या तथाकथित ‘पुण्या’लाही पापवासनेचाच स्पर्श असतो! ‘पुण्या’तूनही आपल्याला पापपूर्तीच साधायची असते किंवा पापातून सुटकेचा उपायही त्यात अध्याहृत असतो. ‘जर माझा हा व्यवहार विनाअडथळा पूर्ण झाला तर मी मोठं मंदिर बांधेन,’ हा वरकरणी पुण्यसंकल्प भासतो, पण हा जो ‘व्यवहार’ आहे तो जर पापाचरणानं बरबटलेला असेल, शेकडो लोकांवर अन्याय करणारा असेल तर मग तो पुण्यसंकल्प कसा म्हणावा? तेव्हा आपले पुण्यसंकल्पही असेच स्वार्थसाधक म्हणून पापयुक्तच असतात. त्यामुळे समर्थ साधकाला सांगतात की, हे मना पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्प धारण कर. तोही कसा? तर ‘जीवीं’! अगदी दृढपणे, प्रेमपूर्वक धारण कर. अनिच्छेनं नव्हे! आता हा सत्यसंकल्प म्हणजे काय? सत्य म्हणजे नेमकं काय? तर जे सार्वकालिक, शाश्वत आहे तेच सत्य आहे. थोडक्यात सत्यसंकल्प हा शाश्वताचाच संकल्प आहे. या व्याख्येतूनच स्पष्ट होतं की पापसंकल्प हाच असत्यसंकल्प आहे, कारण तो अशाश्वताचा संकल्प आहे!
-चैतन्य प्रेम