साधनपथाच्या पहिल्या टप्प्यावर, ‘‘मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।’’ म्हणजेच अशाश्वतात रमवणाऱ्या अशा ज्या इच्छा आहेत त्या सोडून दे आणि शाश्वताशी जोडणाऱ्या, व्यापकाशी जोडणाऱ्या इच्छा दृढ धर, अशी सूचना समर्थ करतात. आता संकल्प म्हणजे काही प्रत्यक्ष कृती नव्हे, पण संकल्प जितका मनात घोळत जातो तितका कृतीलाही उद्युक्त करतो. म्हणूनच निदान मनात येणारे विचार तरी शाश्वताशी जोडणारे असू देत आणि अशाश्वताशी जखडलेल्या विचारांना सोडून देत जा, असं समर्थ साधकाला सांगत आहेत. पुढे ते म्हणतात, ‘‘मना कल्पना ते नको वीषयांची। विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।।’’ हे मना, सदोदित विषयांच्याच कल्पनांमध्ये रममाण होत राहिलास तर मग कृतीही विषयासक्तीतच जखडवणारी होईल. त्यानं मग विकारांच्या झंझावातात अडकशील आणि मग लोकांमध्ये छीथू होईल. अनेकांना हे सारं सांगणं आणि प्रत्यक्ष जगणं यात मोठा भेद वाटेल. किंवा हे सारं सांगण्यापुरतं ठीक आहे, प्रत्यक्ष आचरणात कुणाच्याच येऊ शकत नाही, ज्याच्या आचरणात येतं त्याला हा बोध सांगण्याची वा ऐकण्याची गरजही नाही आणि हा बोध सामान्य माणसाला प्रत्यक्ष कृतीत उतरवता येत नसेल, तर मग तो त्याला सांगून तरी काय उपयोग? असे प्रश्नही मनात उत्पन्न होतील. आपणच थोडा विचार करा, देहभान हरपून, आपल्यातल्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजांना तिलांजली देत जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देतो तेव्हाच तो जगावेगळं काही उत्तुंग काम करू शकतो ना? अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत, गायक, राजकीय नेते, डॉक्टर, समाजधुरीण यांची चरित्रं पाहा, त्या सर्वानी क्षुद्र, संकुचित गोष्टींमध्ये अडकणं थांबवलं आणि जगण्याचा क्षणन् क्षण हा व्यापक ध्येयासाठीच दिला तेव्हाच ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकले ना? मग अध्यात्माचं क्षेत्रही त्याला अपवाद कसं असेल? उलट हे क्षेत्र तर ‘मी’पणाचे सर्व संकुचित बंध तोडून व्यापकता रुजवू पाहाणारं आहे. तिथे देहबुद्धीशी जखडलेल्या, देहबुद्धी जोपासणाऱ्या पापसंकल्पांना कसा काय थारा देता येईल? बरं, एखादा थोर शास्त्रज्ञ असो, एखादा बिनीचा राजकीय नेता असो, प्रभावी अभिनेता असो, प्रवाही साहित्यिक असो.. ते जर संकुचित विकारांना बळी पडले तर समाज त्यांच्याकडे आदरानं पाहातो का? एक लक्षात घ्या, इथे परंपरेला छेद देऊन, समाजाचा विरोध पत्करूनही व्यक्तिगत पातळीवर दोन व्यक्तींमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या प्रेमाच्या नात्याकडे संकेत नाही. तर केवळ विकारवश होऊन शारीर भावानं जो स्वैराचार होतो, त्याकडे संकेत आहे. तर अशा स्वैर, कामुक वृत्तीच्या व्यक्तिनं कोणत्याही क्षेत्रात किती का मोठं काम केलं असेना, समाज त्याच्याकडे आदरानं पाहात नाही, हे सत्य आहे. जो अध्यात्माच्या मार्गावर निश्चित ध्येय ठेवून आला आहे, त्याला तर कोणत्याही भावनिक नात्यात अडकण्याची गरजच नाही. नव्हे त्यानं फार सावधपणे अशा सर्व सापळ्यांतून दूरच राहीलं पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? ‘आपण मागावं एका रामाजवळ’, हे जणू ब्रीदवाक्य असलं पाहिजे. अन्य कोणाच्याही मानसिक, भावनिक आधाराची ओढ साधकाला वाटताच कामा नये. ती वाटत असेल तर त्याच्या साधनेतच काहीतरी उणीव आहे, यात शंका नाही. ज्येष्ठ साधकानं दुसऱ्या साधकांना आधार दिला पाहिजे, असंही काहींना वाटतं. त्यातून मग नकळत सद्गुरूंच्या खऱ्या परमाधाराची उपेक्षा होते आणि दोन्ही बाजूंनी देहभावच अधिक बळकट होतो. मग साधक विकारांच्या सापळ्यांत कसा अडकतो, हे नाथांनीही सांगितलं आहेच. तर अशा सत्यसंकल्प भासणाऱ्या ‘पापसंकल्पां’पासूनही दक्षतेनं दूर राहीलं पाहिजे !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा