विकार अलगद कसं जाळं टाकतात आणि कब्जा मिळवतात, हे लक्षात येत नाही. वरकरणी चांगल्या भासणाऱ्या कृतींतूनही विकार चोरपावलांनी मनात अलगद शिरकाव करतात. सुरुवातीला ते लक्षात येत नाही. नव्हे आपल्या कृतीतले सद्गुणच प्रथम जाणवत असतात. साधी उदाहरणं पहा. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जगणाऱ्या माणसाला सहकार्य करणं, आधार देणं वाईट आहे का? कुणालाही वाटेल की ही चांगलीच गोष्ट आहे. असा आधार निरपेक्षपणे दिला जातो का? सुरुवातीला तसं वाटेलही, पण मग ज्याला आपण आधार दिला त्यानं आपलं बोलणं झिडकारलं तर राग येईल ना? तर हा ‘क्रोध’ मोठा विकार आहे! मुलांचं संगोपन करणं, त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांना सांभाळणं, हा वात्सल्यगुण आहे. त्याच मुलांनी आपल्या सांगण्याबाहेर जाऊ नये, आपलं होऊनच राहावं, हा ‘लोभ’ आणि ‘मोह’ विकार झाला. आर्थिक उन्नती साधणं, उत्तमात उत्तम शिक्षण घेणं, हे चांगलंच आहे. जर दुसरा त्याबाबतीत आपल्यापुढे गेला तर वाटणारी असूया म्हणजेच ‘मत्सर’ हा विकार आहे. तसंच या बाबतीत आपल्यापेक्षा गरीब वा अशिक्षित असलेल्यांबद्दल मनात तुच्छताभाव येत असेल तर त्यातून ‘दंभ’ विकार जोपासला जात आहे, यात शंका नाही. एकाच साधनपथावरील साधकांमध्येही सहवासातून आणि परस्परांच्या निरीक्षणातून सद्संस्कार जसे होऊ शकतात त्याचप्रमाणे हे विकारही उद्भवू शकतात. क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ, मत्सर हे सारे विकार सहसाधकाविषयी चिकटू शकतात. त्यामुळेच मनात वाईटही कल्पना नकोत की चांगल्याही कल्पना नकोत! कारण चांगल्या कल्पनेतून माणूस विकल्प भोवऱ्यात अडकून वाईटाकडेच घसरत जातो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? आपण वाईट वासनेच्याच बाजूचे आहोत! त्यामुळे जे चांगलं आहे ते वाईट करण्याची कला माणसाला सहज अवगत आहे. त्यामुळे समर्थ सांगतात, ‘‘मना कल्पना ते नको वीषयांची।’’ हे मना, कोणत्याच कल्पनेच्या खोडय़ात अडकू नकोस, कारण त्यातूनच विकार अलगद शिरकाव करीत बळावत जातात आणि विकार बळावले की काय होतं? ‘‘विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।।’’ विकारांच्या कह्य़ात गेलेल्या माणसाची माणूस म्हणून घसरण होत जाते आणि मग समाजात त्याची निंदा होते, नालस्ती होते, छीथू होते.. आणि एकदा अशी निंदा झाली की क्रोध उफाळून येतो! तेव्हा पाचव्या श्लोकाचा अखेरचा चरण हा ‘‘जनी सर्व ची ची’’ सांगतो आणि पुढील सहाव्या श्लोकाची सुरुवातच ‘‘नको रे मना क्रोध हा खेदकारी।’’ अशी होते! तेव्हा पाचव्या श्लोकाचं विवरण इथं संपलं. हा श्लोक आणि त्याचा मननार्थ एकत्रितपणे पुन्हा पाहू. मनोबोधातला हा श्लोक असा आहे :
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।। ५।।
मननार्थ : भगवंतापासून दुरावणारी प्रत्येक कृती आणि विचार हाच पापवत आहे. त्यामुळे हे मना, अशाश्वताची ओढ लावणाऱ्या विचार आणि कृतींमध्ये गुंतू नकोस. त्यांचा मनातून त्याग कर. भगवंताशी जोडणारी प्रत्येक कृती आणि विचार हाच सत्य आहे. त्या शाश्वताशी जोडणारी कृती आणि विचार हृदयात धारण करून त्यानुसार आचरणाचा प्रयत्न कर. असं आचरण करीत असताना कल्पनांत रमू नकोस. कारण या कल्पना अखेर विषयांना आणि विकारांनाच बळकटी देतात. त्यामुळे ध्येयपथावरून घसरण तर होतेच, पण समाजातही दुहेरी नालस्ती होते!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा