साधक जीवनाच्या प्रारंभिक वाटचालीत मनात सुरू असलेलं शाश्वताचं चिंतन जगात वावरतानाही सुटू न देणं, तो परमात्माच या जगाचा आधार आहे, हे लक्षात ठेवणं म्हणजेच ‘‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।।’’ हे आपण जाणलं. आता या आंतरिक धारणेनुसार आचरण करताना काय केलं पाहिजे? आचरण कसं असावं? हे जाणण्यासाठी परत दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या दोन चरणांकडे वळू. समर्थ सांगतात, जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। संतजनांना जे आवडतं ते आचणात आणावं आणि त्यांना जे आवडत नाही त्याचा त्याग करावा. संतजनांना काय आवडतं आणि काय आवडत नाही? त्याचं सूचन याच दुसऱ्या श्लोकाच्या पहिल्या चरणात आहे. मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। सज्जनांना भक्तीपंथावरून चालणं आवडतं! हा भक्तीपंथ कसा आहे, याचं विवरण या श्लोकात नसलं तरी नवविधाभक्ती आपल्याला ऐकून माहीत आहे. दासबोधातही चौथ्या दशकात तिचं विस्तृत विवरण आहे. त्या दशकाचा ‘‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।’’ हा आधारभूत श्लोकही सर्वज्ञात आहे आणि त्याचं दासबोधातलं विवरणही पारंपरिक अर्थानं आहे, यातही शंका नाही. तरीही याच श्लोकातून आणि समर्थानी त्यावर दासबोधात निरूपित केलेल्या ओव्यांतून आपल्यासारख्या प्रारंभिक साधकाला प्रेरणा देईल, असाही एक अर्थ हाती लागतो! कारण अहोरात्र ‘मनी काम चिंतीत जावा’, या पठडीत आपलं आयुष्य सरत आहे. आता ते राम चिंतीत जावा, या धाटणीचं करायचं आहे. तेव्हा हा श्लोकही तशीच प्रेरणा देत असला पाहिजे, नाही का? या श्लोकाकडे अगदी बारकाईनं लक्ष द्या.. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या भक्तीच्या नऊ पायऱ्या त्यात आहेत. ‘रामचिंतन’ हेच ज्यांचं जीवनध्येय झालं आहे त्याच्यासाठी या नवविधा भक्तीचं विवरण समर्थानी केलं आहेच, पण भक्तीचा हा आवाका आपला नाही, असं आपल्याला वाटतं. पण ‘कामचिंतना’तच आयुष्य व्यतीत करताना आपणही जगाची भक्ती अशीच तर करतो! श्रवण म्हणजे संत जे सांगतात त्या सारतत्त्वाचं श्रवण.. आपण आपल्या मनाचं सांगणंच तर सतत ऐकत आहोत! मनाचं सतत ऐकणं आणि त्या मनाच्या आवडीनुरूप वागणं हेच तर आपलं श्रवण आहे! कीर्तन म्हणजे वैखरीनं परमात्म्याचं अखंड नामसंकीर्तन.. आपण आपल्याच मुखानं आपलीच स्तुती गाण्यातच तर दंग आहोत. या स्वकीर्तन भक्तीनं आपण कधीच थकत नाही.. स्मरण म्हणजे शाश्वताचं स्मरण.. देहबुद्धीचं सहज स्मरण आपल्याला आजन्म साधलेलं आहे.. पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या मार्गानं चालणं.. ज्यांच्याकडून आपला स्वार्थ साधला जातो त्यांनी कितीही लाथा घातल्या तरी आपण त्या चरणांना कधी अंतरत नाही.. अर्चन म्हणजे परमात्म्याची पूजा करताना आपण पूज्य म्हणजे शून्यवत् होऊन जाणं.. ते आपल्याला कठीण वाटतं, पण जगाच्या पूजेत आपली किंमत गमावून बसताना मात्र आपल्याला काहीच वाटत नाही! अशाश्वत जगाला वंदन करण्यात, अशाश्वत जगाचं दास्य पत्करण्यात आणि अशाश्वत जगाशी सख्य साधण्यासाठी धडपडण्यात आपण आपली किती शक्ती, क्षमता, वेळ वाया घालवत असतो! संत शाश्वत परमात्म्यावरच सर्वस्व भावानं प्रेम करतात.. ती आत्मनिवेदन भक्ती आपण जगाकडे वळवतो.. अशाश्वत अशा जगावर आपण आत्मवत् प्रेम करतो आणि त्या जगाला कणमात्रही परकं न मानता त्या जगावर आत्मीय प्रेम करतो.. थोडक्यात जगाची का होईना, पण नवविधाभक्ती आपल्यालाही साधत असतेच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा