समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात मदाचाही मागोवा घेतला आहे. त्यात मदोन्मत्त माणसाची अवस्था दाखविताना समर्थ म्हणतात की, ‘‘मदानें भुलला प्राणी विचारें उमजेचिना। पराचें सत्य मानेना विवरेना कदापिही।।’’ एकदा का माणूस मदानं भुलला की मग विचाराची उमज संपते. दुसऱ्यानं सांगितलेलं तो खरं मानतच नाही की स्वत:ही त्या सांगण्यावर अलिप्तपणे विचार करीत नाही. उलट त्याला असंच वाटतं की, ‘‘चालणें थोर तें माझें माझा मीच बहू भला। न्यायाची गोष्टि मानेना नीतीनें कोप येतसे।। आपणापरतें नाहीं सर्व कांहीं भुमंडळीं। गुणग्राहकता नाहीं पराचें तुच्छ होतसे।।’’ माझं चालणं म्हणजे मी जे वागतो आहे ते वागणंच काय ते थोर आहे, श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. मीच काय तो खरा भला आहे, श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. मग खऱ्या न्यायबुद्धीनं वागणं ओसरतं. आपण म्हणून तीच योग्य नीती, हा भाव आल्यानं दुसऱ्यानं सांगितलेली नीती ही क्रोधाचं कारण बनते. या जगात आपल्यासारखा श्रेष्ठ कुणी नाही, या भावानंच जगणं माखून जातं आणि मग दुसऱ्याचं जे जे काही बागणं, बोलणं, सांगणं आहे ते सारं तुच्छ मानलं जातं. यामुळे गुणग्राहकता संपते आणि दुसऱ्याला तुच्छ लेखल्यानं त्याच्याकडून घेण्यासारखं जे काही आहे त्याचीही उपेक्षाच होते. मदोन्मत्त वृत्ती अशी घातक असते. आपली ती वृत्ती होता कामा नयेच, पण अशा वृत्तीच्या व्यक्तीची संगतसुद्धा करू नये, असं समर्थ स्पष्ट बजावतात. ते म्हणतात, ‘‘ऐशाचा संग तो खोटा हित तेथें असेचिना। स्वहीत आपुलें नाहीं परहीत कसें घडे।।’’ अशा मदोन्मत्ताचा संग खोटाच आहे. मदोन्मत्त माणूस स्वत:चाच घात करीत असतो, तो स्वत:चं हित करूच शकत नाही, साधू शकत नाही तर मग दुसऱ्याचं हित कसलं साधणार? या मदाच्या कह्य़ात जाऊन माणूस आपलं खरं माणूसपण विसरतो. आपल्या मर्यादा विसरतो, आपला आवाका विसरतो, आपली योग्यता विसरतो. मर्यादा ओलांडून, अनेकदा आवाक्यापलीकडे जात, योग्यता नसताना तो मदांधपणे जगात वावरत राहातो. आपल्या संपत्तीचा, रूपाचा, सामाजिक स्थितीचा, दर्जाचा, विद्येचा मद काय कायमचा राहू शकतो? समर्थ म्हणतात, ‘‘थोर आयुष्य मोलाचें मदें व्यर्थचि नाशिलें। पापी हा उमजों नेदी शेवटीं दूरि होतसे।।’’ मदाच्या खोडय़ात अडकून मनुष्यजन्मासारख्या अनमोल संधीचा नाश होतो. या मदाला समर्थानी ‘पापी’ म्हटलंय. कारण हा मद भगवंतापासून दूर करणारी दुर्बुद्धीच जोपासत असतो. तर हा मद खरी उमज, खरी समज मला येऊच देत नाही आणि शेवटी, मृत्यू मला कब्जात घेतो तेव्हा हा मद नामानिराळा होतो! समर्थ म्हणतात, ‘‘मरतां मद काशाचा पुसे कोण तया मदा। पूर्वीच कळला नाहीं तऱ्हेनें जन्म नाशिला।।’’ मेल्यावर कसला मद आणि कसला ताठा? त्या मदाला विचारतोय कोण? मृत्यूआधी मदोन्मत्ताला जर हे कळलं असतं तर? ते जगताना कळलं नाही आणि म्हणूनच मदाच्या तऱ्हांमध्ये गुंतून जन्म वाया गेला.. ‘‘देह गेलें बळ गेलें द्रव्य गेलें येकीकडे। बंड गेलें थोंब गेलें एकला जातसे खळु।।’’ माणसाला देहाचा मद असतो, बळाचा म्हणजे शक्तीचा मद असतो, द्रव्याचा मद असतो, बंड म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा मद असतो, थोंब म्हणजे आपलं स्तोम माजवण्याची गोडी आणि त्या स्तोमाचा मद असतो.. हा देह मृत्यू पावताच हा देहाचा, शक्तीचा, द्रव्याचा, कर्तृत्वाचा, स्तोमाचा मद पार लयाला जातो. त्याची किंमतच उरत नाही. असे अनेक देह माझे गेले आणि अशी अनेकदा या मदाची नसलेली किंमत सिद्धही झाली, तरी माझ्यात पालट झाला नाही! अखेर एकटय़ालाच जावं लागतं.. ज्या ज्या गोष्टींचा मद होता त्यातली एकही बरोबर नेता येत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा