जीवन हे सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी, अनुकूलता-प्रतिकूलता असं द्वैतमय आहे. त्यामुळे त्यात अडीअडचणी असणारच. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी त्यात मनाची समता, मनाचं स्थर्य टिकणं हेच महत्त्वाचं आहे. कारण मनाची समता केवळ वाईट परिस्थितीतच डळमळते असं थोडंच आहे? उत्तम परिस्थिती असतानाही, ती कायमची टिकेल ना, या भीतीनंही मन अस्वस्थ राहू शकतं. जोवर जीवन निरपेक्षतेनं जगण्याचा विवेक बाणू लागेल तेव्हाच सर्व तऱ्हेची आसक्ती, दुराग्रह, हट्टाग्रह, मोह-भ्रम मावळू लागेल.
अशी विवेकी अवस्था प्राप्त करून घेणं हेच या नरदेहाचं सार्थक आहे. एकदा हा विवेक अंगी बाणला की मायेपासून विभक्त होऊन सद्गुरूंचा अखंड भक्ती-योग साधणार आहे. याच महत्कृत्यानं जन्म-मृत्यूचं चक्र संपणार आहे. समर्थ म्हणतात, ‘‘विवेकें चुकला जन्ममृत्यू। नरदेहीं साधिलें महत्कृत्य। भक्तियोगें कृतकृत्य। सार्थक जालें॥’’ आणि इथं समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०२व्या श्लोकाच्या शेवटच्या दोन चरणांचा सांधा जुळतो. हे चरण असे :
‘देहे कारणीं सर्व लावीत जावें।
सगूणीं अती आदरेंसीं भजावें॥’
आपल्या स्थूल आणि सूक्ष्म तसेच वासना देहांना जगण्यासाठी एकच कारण उरू द्यावं आणि ते म्हणजे सद्गुरुभक्ती! ही सद्गुरुभक्ती म्हणजे सर्व तऱ्हेच्या संकुचित वृत्तीचा त्याग आहे. व्यापकतेची आस आहे. आपल्या सर्व क्षमता, सर्व शक्ती केवळ याच एका कारणासाठी लावायची आहे. ही व्यापकता कशी प्राप्त होईल? तर जो सर्वव्यापी आहे त्याच्याच भक्तीनं!
हे जे सर्वव्यापी अनादि अनंत तत्त्व आहे ते सद्गुरूंच्या रूपातच साक्षात प्रकट आहे. या सगुण सद्गुरूंची भक्ती निराकाराच्या भक्तीपेक्षा वरकरणी तरी सहजसाध्य आहे! पूर्वी दिलेले दोन दाखले परत देतो.
सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वर माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली. केवळ गुरुआज्ञेवरून हा वाक्यज्ञ पार पडला होता. त्यामुळे जिथं जिथं सद्गुरूंचं वर्णन आलं तिथं तिथं माउलींना राहवलं नाही. सद्गुरुमयतेत ते असं वाहवून जात की निवृत्तिनाथांना त्यांचा भावावेग आवरावा लागे. या भावावेगाची परिसीमा झाली ती या वाक्यज्ञाची सांगता झाली तेव्हा! निवृत्तिनाथांसमोर बसलेल्या माउलींच्या मुखातून तो विख्यात अभंग बाहेर पडला, ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा!’ तो जो विठ्ठल म्हणतात ना तो हा समोर बसलेला निवृत्तिनाथच आहे आणि हाच ‘विठ्ठल’ आमच्यासाठी बरवा म्हणजे सोपा आहे, चांगला आहे! कारण याच्याशी आम्ही बोलू शकतो, याला आमचं सुख-दु:ख सांगू शकतो, याचा आधार मिळवू शकतो.
दुसरा दाखला आहे तो मीराबाईंचा. त्या म्हणतात, ‘नाही ऐसो जनम बारंबार। का जाणू कछु पुन्य प्रकटे। भा माणुसा अवतार!’ असा जन्म वारंवार मिळत नाही हो.. कोणता जन्म आहे हा? तर मी माणूस म्हणून जन्मलो असताना सद्गुरूही मनुष्य रूपातच अवतरले! सगुण रूपातच अवतरले! तेव्हा सगुण रूपात प्रकटलेल्या, मी ज्यांच्याशी सहज बोलू शकतो, ज्यांना मी पाहू शकतो, स्पर्शू शकतो, ज्यांची सेवा करू शकतो अशा या सद्गुरूंची अनन्य भक्ती साधावी, हेच या नरदेहाचं, मनुष्यजन्माचं सार्थक आहे. हेच खरं महत्कृत्य आहे. त्या सद्गुरूंना अत्यंत आदरानं भजलं पाहिजे.
आता या सर्वश्रेष्ठ भजनाची प्रक्रिया समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १०३व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात करणार आहेत. त्या श्लोकाकडे गुरुवारी वळू.
चैतन्य प्रेम