संतजनांनी ज्या ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्या सर्वच जेव्हा सुटतील आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत, त्या सर्व भावानिशी आचरणात येतील तेव्हा आंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण यात सुसंगति येईल. आंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण असं सुसंगत साधणं हाच खरा थोर सदाचार आहे. अशा सदाचारानं जो जगतो तो जनीं तोचि तो मानवी धन्य होतो। म्हणजे तोच जनांमध्ये अर्थात संतजनांमध्ये आणि मानवांमध्ये अर्थात सर्वसामान्य माणसांमध्येही धन्य ठरतो.. आता संतजनांनी निंदा केलेल्या, त्याज्य गोष्टी कोणत्या आणि त्यांनी समर्थन केलेल्या, आचरणात आणण्यासारख्या गोष्टी कोणत्या हे आधीच सांगितल्याप्रमाणे मनोबोधाच्या चार ते दहा क्रमांकाच्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे. त्याकडे आपण आता वळू, त्याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचा मननार्थ एकत्रितपणे पुन्हा पाहू. हे श्लोक असे आहेत..
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। २।।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।। ३।।
मननार्थ : हे मना, संतसज्जनांनी सांगितलेला जो भक्तीपंथ आहे, त्या मार्गानंच गेल्यावर तो सद्गुरू सहज प्राप्त होतो. तो त्याचा स्वभावच आहे. पण या मार्गावर चालण्यासाठी संतजनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरविल्या आहेत त्या सोडून दे आणि ज्या गोष्टी त्यांनी आचरणयोग्य ठरविल्या आहेत त्या आचरणात आण. (२). साधकजीवनाच्या प्रारंभिक स्थितीत मनात शाश्वत तत्त्वाचं चिंतन अखंड सुरू ठेव आणि जगात वावरतानाही या अशाश्वत जगाचा आधार तो शाश्वत परमात्माच आहे, याची जाणीव अंतरंगातून कधी लोपू देऊ नकोस. हाच खरा श्रेष्ठ सदाचार आहे. जो या सदाचाराचं पूर्ण पालन करतो तो मनुष्यमात्रांमध्येच नव्हे तर संतजनांमध्येही धन्य होतो (३) .
आता संतजनांनी ज्या गोष्टी त्याज्य आणि स्वीकारणीय ठरविल्या आहेत त्या कोणत्या हे सांगणाऱ्या श्लोकांकडे वळू. मनोबोधातला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा श्लोक असा आहे..
मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सारवीचार राहो।।४।।
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।। ५।।
या श्लोकांचा प्रचलित अर्थ असा – हे मना, दुष्ट वासनेनं कधीच काही साधत नाही. हे मना अंतरंगात पापबुद्धीची कणमात्रही लागण होऊ देऊ नकोस. त्याचबरोबर नीतियुक्त आचरणाला कधीच अंतरू नकोस आणि शाश्वत तत्त्वाचा विचार अंतरंगातून कधी लोपू देऊ नकोस (४). हे मना, पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्पाला प्राणाप्रमाणे जप. विषयजन्य कल्पनांमध्ये गुरफटून फसू नकोस. त्या विषयजन्य कल्पनांमध्ये फसूनच माणूस विकारवश होतो आणि मग लोकांमध्ये त्याची नालस्ती होते (५). या चौथ्या श्लोकापासून समर्थानी अगदी आत्मीयतेनं मनाला समजवायला सुरुवात केली आहे. एकच गोष्ट अनेक परींनी, अनेक उदाहरणांसकट समजावून सांगावी, त्याप्रमाणे हे समजावणं आहे. आता या श्लोकांचं अधिक सखोल मनन सुरू करू.
चैतन्य प्रेम