जगच खरं सुख देईल, जगच सुखाचं स्थान आहे, जगच खरा आधार आहे, या धारणेचा पगडा जन्मापासून मनावर आहे. त्यामुळे आपले सर्व मनोव्यापार हे जगाला धरून ठेवण्याचेच आहेत. जगाला चिकटलेलं हे मन केवळ नामानं, श्रीसद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या अभ्यासानं आणि त्यांच्या बोधानुरूप आचरण सुरू केल्यानंच मोकळं होऊ लागतं. हे नाम जो शुद्ध हेतूनं घेऊ लागतो त्याला सद्गुरूप्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. मग अध्यात्माच्या मार्गावर पाऊल टाकल्यावर नामानंच का सुरुवात करायची, याचा ऊहापोह समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०१व्या श्लोकाच्या अनुषंगानं आपण करणार आहोत. हा श्लोक म्हणजे जणू ‘मनोबोधा’चा उंबरठा आहे! ‘मनोबोधा’चे २०५ श्लोक आहेत. त्यातला २०५वा श्लोक फलश्रुतिचा आहे १०२व्या श्लोकापासून समर्थ आंतरिक वाटचालीसाठी अधिक व्यापक मार्गदर्शन करणार आहेत. तर त्या आंतरजगतात पाऊल टाकण्याआधी या उंबरठय़ावर आपण उभे आहोत! प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:
जया नावडे नाम त्या येम जाची।
विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची।
म्हणोनी अति आदरें नाम घ्यावें।
मुखें बोलतां दोष जाती स्वभावें।।१०१।।
प्रचलित अर्थ : ज्याला भगवंताचं नाव आवडत नाही त्याला यमराज कष्ट देतो. नामाविषयी तर्क काढणे म्हणजे नरकातच जाणे! म्हणून अत्यंत पूज्यभावानं नाम घ्यावे. असे नाम घेतले म्हणजे देहबुद्धीचे दोष आपोआप नाहीसे होतात.
आता मननार्थाकडे वळू. ‘जया नावडे नाम त्या येम जाची,’ या चरणाचा अर्थ जो नाम घेत नाही त्याला यम जाच देतो, असाच गृहित धरला जातो. ‘‘बाप नामाचे निजतेज। यम वंदी चरणरज। नामापाशीं अधोक्षज। चतुर्भुज स्वयें तिष्ठें।। नामाचेनि पडिपाडें। कायिसें भवभय बापुडें। कळिकाळाचें तोंड कोणीकडे। नामापुढें रिघावया।।’’ (नामाचं तेज विलक्षण आहे. नामधारकाची पायधूळ यमराजही मस्तकी धारण करतो. नामापाशी चतुर्भुज श्रीकृष्ण सदा तिष्ठत असतो. नामप्रभावापुढे भवभय टिकत नाही आणि कली तसंच काळही तोंड दाखवत नाही) असं एकनाथ महाराजांनीही ‘भागवता’त म्हटलं आहे. अनेक संतांनीही वेळोवेळी नामाचा असा महिमा गायला आहे. पण या ‘जया नावडे नाम त्या येम जाची,’ या चरणाचा काही वेगळा अर्थ आहे का? तर आहेच! एकतर आधी माणूस अध्यात्माच्या मार्गावर वळतच नाही. वळला तरी जगातला कर्तेपणाचा सर्व भाव घेऊन आणि ‘मी’पणाच्या सगळ्या ताठय़ासह तो या मार्गात येतो आणि चालूही पाहातो! त्याच्या मनाला भगवंताचं एखादं नाम घेत राहाण्याची साधना फारशी पटत नाही. नुसतं एकच नाम सतत घेत राहून काय होणार आहे, असा तर्क तो लढवतो. ज्याचा नामावर सहज विश्वास नाही, ज्याला नामाचा नेम रुचत नाही त्याला ‘येम जाची’ म्हणजे ‘यमा’पासून साधनाभ्यास सुरू करावा लागतो! साधनेची आटाआटी, खटपट करावी लागते. यम-नियम, शम-दमादि साधना अविरत करीत राहावी लागते! आता याचा अर्थ या यम-नियमांना आणि शम, दम आदी साधनांना कमी महत्त्व आहे असं नव्हे. पण त्या साधनांचं जे फलित आहे ते नामानं साधणार असेल तर नामच का घेऊ नये? आता यासाठी थोडं यम-नियमांकडे ओझरता कटाक्ष टाकावा लागेल. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पाच यम आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान हे पाच नियम आहेत. या ‘यम-नियमोपासने’पासून साधनाभ्यासाचा प्रारंभ करावा लागतो.