प्रापंचिकाचा बात्याग आहे तो आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा. हा बाह्य़त्याग आहे आसक्तीयुक्त गोष्टींसाठी नाहक वाया जात असलेल्या वेळेचा आणि क्षमतांचा! आता म्हणजे नेमकं काय? समर्थानी, चालता-बोलता, खाता-पिता, येता-जाता नामस्मरण करावे, अशी मुभा दिली आहेच. कारण हे सर्व सोडून नाम घ्या, म्हटलं तर कुणीच घेणार नाही. अगदी त्याचबरोबर एका जागी बसून काही वेळ तरी साधना करायलाही सर्वच संतांनी आणि समर्थानीही सांगितलं आहेच. आता जर एका जागी बसून ठरावीक वेळ साधना करायची असं आपण ठरवलं तर पहिली गोष्ट ही होते की आपल्या नेहमीच्या प्रापंचिक कर्माच्या धबडग्यातून आपल्याला काही वेळ काढावा लागतो! जस जशी साधना सुरू होते तसतसा साधनेसाठी ‘वाया’ जात असलेल्या वेळेची आपल्या आजूबाजूचे ‘हितचिंतक’ही अधेमधे जाणीव करून देत असतात. आपल्याला तसं वाटत नसलं तरी अगदी तसंच वाटत नसतं असं मात्र नव्हे! कारण तासाभरात कितीतरी काम उरकली असती, असं मनात येतंच ना? किंवा त्या तासाभरातच कितीतरी करायची असलेली, पडून असलेली कामं मन आठवून देतंच ना? मन असं आतून ढुश्या मारत असतानाच तरीही प्रयत्नपूर्वक, निग्रहपूर्वक आपण साधना करीत असतो. सुरुवातीला अनेकदा साधनेपेक्षा ठरावीक वेळेनंतर साधना संपल्याचाच आनंद असतो! ‘झालं बुवा एकदाचं नाम’, ‘आजच्या माळा झाल्या एकदाच्या’ असं मनात येतंच ना? म्हणजे एकदा का तो जप झाला की मग दिवसभर मन त्याच्या कलानं जगायला मोकळं! तेव्हा प्रापंचिकाचा पहिला बाह्य़त्याग हा वेळेचा असतो. त्या वेळेला त्याच्यादृष्टीनं फार फार महत्त्व असतं. कितीतरी कामं बाजूला ठेवून नाम ‘केलं’ जात असतं. आता एकदा साधना करून टाकलेल्या साधकाला समर्थ थोडंच मोकळं सोडणार? मग ते म्हणतात, चालता-बोलता, येता-जाता, खाता-पिता नाम घेत जावे! मग काय होईल एकदा या सर्व क्रिया करतानाही नाम सुरू झालं ना की या क्रियांमधली ओढ अगदी सूक्ष्मपणे ते नाम शोषून घेऊ लागेल! चालता-बोलता नाम घेत गेलं की अकारण, मनाच्या ओढींपायी वणवण करीत राहण्यात पूर्वीसारखा रस उरणार नाही. अकारण, अनावश्यक गप्पांमध्ये मन रमणार नाही! खाता-पिता नाम घेत गेलं की गरजेपलीकडे खात राहाण्याची आवड कमी होऊ लागेल. मन आणि शरीराला बाधक अशा खाण्या-पिण्याबाबत औदासिन्य निर्माण होऊ लागेल. येता-जाता नाम घेत गेलं की येण्या-जाण्यात सावधानता येऊ लागेल. तेव्हा प्रापंचिकाचा बाह्य़त्याग हा असा आपोआप घडू लागेल. मग आपलं मन कोणत्या विचारांत रमत आहे, याचं परीक्षण सुरू होईल. आपल्या बुद्धीचा वापर आपण कशासाठी करीत आहोत, याचं परीक्षण सुरू होईल. आपल्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक क्षमतांचा गैरवापर कमी होऊ लागेल. वेळेचं महत्त्व क्षणोक्षणी तीव्रतेनं जाणवू लागेल. मग अत्यंत हिशेबी माणूस जसा पैसा फार जपून वापरतो किंवा पैसा कमी असेल तर आपण तो जसा जपून वापरतो अगदी त्याचप्रमाणे बरंच आयुष्य निघून गेलं आहे आता जे उरलंसुरलं आयुष्य आहे त्याचा वापर साधनेसाठीच झाला पाहिजे, ही जाणीव तीव्र होत गेली की वेळेचा अपव्यय थांबेल. तेव्हा आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा त्याग घडू लागेल. आसक्तीयुक्त गोष्टींसाठी नाहक वाया जात असलेल्या वेळेचा आणि क्षमतांचा त्याग घडू लागेल. अर्थात त्या वेळेचा आणि क्षमतांचा वापर केवळ साधनेसाठी सुरू होईल. मग जगणं आणि साधना या दोन गोष्टी नाहीत. जगणंच साधना आहे, ही जाणीव झाली की जगणं अर्थपूर्ण होत जाईल. तो डगमगता सेतु कधी मागे पडला ते कळणारही नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-चैतन्य प्रेम

-चैतन्य प्रेम