हे साधका, तुला आपल्या दोषांची खरंच खंत वाटते का? तर हे भगवंताचं नाम ते दोष ज्या वर्तनातून घडतात त्या वर्तनाचीच ओढ मनातून हळूहळू काढून टाकेल! एकदा दोष मावळले की सदोष वर्तन मावळेल. ते घडलं की पापाचरण थांबेल आणि मग पुण्याचा ठेवा निर्माण होत जाईल. आता भगवंताचं विस्मरण हेच सर्वात मोठं पाप आहे कारण भगवंतापासून मनानं दूर होणं हीच दुर्बुद्धी असते. या दुर्बुद्धीनं अहंभावातून विपरीत वर्तन घडू लागतं. गंमत अशी की माणसाला पाप करायला आवडतं, पण त्या पापाचं फळ भोगायला त्याला आवडत नाही! तेव्हा खरं पाहाता नरकात गुंतवणारं पाप जितकं वाईट तितकंच स्वर्गात अडकवणारं पुण्यसुद्धा वाईटच असतं. फरक इतकाच की पापाचरणाचा लोकांना त्रास होतो, पुण्याचरणानं ते घडत नाही. आणि एकदा पुण्याचरण सुरू झालं की सद्बुद्धीही जागी होते आणि ती अंतरंग व्यापक केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही! तेव्हा संकुचित माणसानं व्यापक होणं, यापेक्षा उत्तम गती दुसरी कोणती आहे? तर एका नामाच्याच आधारावर इतकी झेप घेता येते, असं समर्थ सांगतात. पण एवढय़ानं मन काय सहजासहजी नामाला तयार होतंय थोडंच! ते मन अनेक प्रश्नांचं जाळ फेकू लागतं आणि या प्रश्नांच्या अनुरोधानं समर्थ ‘मनोबोधा’च्या ७२व्या श्लोकात पुन्हा फटकारतात! समर्थ म्हणतात –
न वेंचे कदा ग्रंथिचे अर्थ कांहीं।
मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं।
महाघोर संसार शत्रू जिणावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।। ७२।।
अरे, साधंसोपं नाम घे! त्यावर जीव काय म्हणतो? अहो त्या अमक्या ग्रंथात तर अमुक म्हटलंय, तमक्या ग्रंथात तर तमुक म्हटलंय! गणेशमहापुराण तर सांगतं की श्रीगणेश हीच सर्वश्रेष्ठ देवता आहे, देवीपुराण तर सांगतं की देवी हीच सर्वश्रेष्ठ देवता आहे.. प्रत्येक देवतेचं पुराण केवळ त्या त्या देवतेलाच श्रेष्ठत्व देतं. मग काय करावं? भगवान शंकरांनी पार्वतीला जी ‘गुरूगीता’ सांगितली त्यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की, ‘‘वेदशास्त्रं आणि पुराणं ही आधीच भ्रमित असलेल्या जिवाला अधिकच भ्रमित करतात!’’ म्हणजे वेद किंवा शास्त्रांचं खरं आकलन न झाल्यानं जो तो स्वत:ला ज्ञानी ठरवून त्यांचं विवेचन करून अधिकच दिशाभ्रम करीत असतो. तेव्हा समर्थ बजावतात की बाबा रे.. न वेंचे कदा ग्रंथिचे अर्थ कांहीं! ग्रंथांचा अर्थ काढून स्वत:ची दिशाभूल करीत राहू नकोस. कारण एकच परमतत्त्व अनंत रूपांत प्रकटलं आहे, हे सत्य जाणून त्या एकाकडे अनेकांतून पोहोचण्याऐवजी केवळ एकांगी झालास तर, खरा अर्थ हाती न लागता जर विपरीत अर्थ लावून त्यातच अडकलास तर आणखीनच घसरण होईल. त्यापेक्षा मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं! मुखानं साधं सोपं नाम घे! आता मग मनात येतं की नाम घ्यायला लागलो की संसार सुटेल का? संसाराचं वाटोळं होईल का? समर्थ सांगतात, अरे हा प्रपंच काय केवळ तुझ्या सुखासाठीच निर्माण झाला आहे का? प्रपंचानं तुला वेठबिगार करून ठेवलंय. प्रपंच तुझ्या ताब्यात नाही, त्या प्रपंचाच्या ताब्यात तू गेला आहेस. मानसिक, भावनिकदृष्टय़ा या प्रपंचानं तुला पंगु करून टाकलंय. त्या प्रपंचाचं खरं स्वरूप जाणून त्यात केवळ कर्तव्यभावनेनं राहून मन आणि भावना या व्यापक, शाश्वत अशा परमात्म्याकडे वळवणं, हाच या मनुष्यजन्माचा खरा लाभ आहे. हे खरं ध्येय आहे. त्यासाठी संसाराचं, या जगाचं, या प्रपंचाचं खरं रूप लक्षात घेऊन त्याचा गुलाम न होता, त्याच्या तंत्रानं जगत परतंत्र होण्यापेक्षा स्वतंत्र हो! खऱ्या शुद्ध स्वप्रेरणेनं जगणं सुरू कर. त्यासाठी नामाचा खरा प्रामाणिक अभ्यास सुरू कर!
–चैतन्य प्रेम