जेव्हा आंतरिक भावना व्यापक होईल, तेव्हाच अंत:करणातली संकुचित धारणा सुटेल. पण ही प्रक्रिया सोपी नाही. समर्थही सांगतात, ‘‘भवाची जिवा मानवा भूलि ठेली। नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली।।’’ जिवाला भवाची भूल पडली आहे आणि त्यामुळे ‘नसे वस्तुची’ जी गोष्ट मुळातच मिथ्या आहे, नासणार आहे, नष्ट होणार आहे तिचीच धारणा त्याच्या अंत:करणात दृढ झाली आहे. या धारणेनुसारचं त्याचं सारं आकलन आहे. त्याची जीवनदृष्टी आहे. त्यानुरूप त्याचं जगणं सुरू आहे. ही धारणाच मुळात चुकीची असल्यानं त्याचं जगणंही विसंगतींनी भरलं आहे. असं जीवन सार्थक कसं म्हणावं? ते व्यर्थच आहे. आता ही जी भवाची भूल आहे, ते ‘भव’ काय आहे? ही जी ‘नसे वस्तु’ आहे म्हणजेच नसूनही भासणारी गोष्ट आहे ती काय आहे? तर जिथं आपला जन्मजात भाव जडला आहे आणि त्यानुसारच स्वभाव घडला आहे तो ‘मी’ हाच ‘भव’ आहे.. आपलं अवघं जग आणि जगणं यांचा एकमेव आधार आहे. या ‘मी’भावातून अंत:करणात जो भवसागर पसरला आहे.. या ‘मी’च्या तालावर नाचताना जो ‘भवताल’ सुरू आहे तो खऱ्या परम भावापासून मला वंचित करीत आहे. हा ‘मी’ म्हणजे कोण? तर माझा देह, या देहाला लाभलेले आप्त, या देहाला सुखावणाऱ्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती. हा ‘मी’ खरा कोण, हे मी ओळखतही नाही. त्यामुळे या ‘मी’च्या आधारावर जे ‘माझे’ निर्माण झाले आहे, त्यांचंही खरं आकलन मला नाही. या ‘मी’च्या धारणेतलं मिथ्यत्व जसजसं उमगू लागेल तसतसा या ‘मी’चा जगण्यावरील प्रभाव ओसरू लागेल. मग जगापुरता ‘मी’ राहील, पण स्वत: ‘मी’च्या जोखडातून मोकळं झाल्याचा अनुभव येईल. श्रीसद्गुरूंचं प्रथम दर्शन झालं तो प्रसंग स्मरतो. त्यांनी विचारलं, ‘‘तुम्ही कोण?’’ आपल्याला हा प्रश्न कुणीही विचारला की आपण आपलं नावच प्रथम सांगतो ना? तसं मी नाव सांगितलं. त्यांनी माझं नाव घेत विचारलं, ‘‘साठ वर्षांपूर्वी तुम्ही कुठे होता?’’ मी गोंधळलो. म्हणालो, ‘‘मला माहीत नाही.’’ त्यांनी पुन्हा नाव घेत विचारलं,‘‘साठ वर्षांनंतर तुम्ही कुठे असाल?’’ मी अधिकच गोंधळून म्हणालो, ‘‘तेही माहीत नाही!’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मग या मधल्या साठ वर्षांत ‘मी’ म्हणजे अमुक हे जे तुम्ही दृढपणे मानता आहात तेवढं विसरायचं एवढंच अध्यात्म आहे! जगापुरती तुमची ही ओळख ठेवा, पण ‘मी म्हणजे अमुक’ हे जे मनानं घट्ट धरलं आहे ते सोडा!’’ खरंच आज आपण स्वत:ला जे जे मानतो ते कायमचं राहाणारं आहे का?  सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी-धंदा या सर्वामुळे आपल्या ‘मी’ला जी ओळख आहे तीसुद्धा ठिसूळच नाही का? ‘मी’ची धारणाच भ्रामक, तर ‘माझे’ म्हणून जे-जे आहे त्याचीही मान्यता, धारणा, आकलन भ्रामकच नाही का? पण त्यांनाच सत्य मानून आपण सदोदित ‘माझे’ जे काही आहे ते ‘मी’लाच सदोदित अनुकूल राहीलंच पाहिजे, असं मानून त्यांना आपल्या मनाजोगतं राखण्याची अव्याहत धडपड करतो. त्या धडपडीतच दु:ख भोगतो. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत, ‘‘जे स्थिर नाही त्याला स्थिर करण्याची माणूस धडपड करतो, पण जे स्थिर आहे तिकडे दुर्लक्ष करतो.’’ स्थिर काय नाही? सदोदित प्रवाहित असं माझं जीवन स्थिर नाही. सुख-दु:खाच्या दोन काठांमधून जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्याला केवळ सुखापाशीच स्थिर करण्याची धडपड व्यर्थ आहे! माझ्याप्रमाणेच अनंत जीव जन्मतात आणि मरतात, पण जीवन कायम आहे. ज्या जीवनशक्तीच्या, प्राणशक्तीच्या जोरावर ते कायम आहे ती ज्या एका आधारावर स्थिर आहे, त्या एकाकडे आपलं लक्ष जात नाही! जे सतत ओसरत आहे, त्याचीच व्यर्थ धारणा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

 

– चैतन्य प्रेम