अनेक आध्यात्मिक तत्त्वचिंतकांनी, अवतारी सत्पुरुषांनी नामाचा मार्ग साधना म्हणून सांगितला नाही, असा पवित्रा त्यांचे अनुयायी घेतात, पण या सत्पुरुषांचं नुसतं नाव घेताच त्यांच्या अनुयायांच्या अंत:करणातला भाव उचंबळतोच ना? नाम इतकं सर्वव्यापी आहे! त्यामुळे समर्थ म्हणतात की, समस्तांमधे नाम हें सार आहे! आणिक ते कसं आहे? तर, दुजी तूळणा तूळितांही न साहे.. म्हणजे त्या नामाशी, नामाच्या त्या प्रभावाशी अन्य कशाची तुलनाच होऊ शकत नाही. नाम हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक आहे. गोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, पतंग उडविताना जोवर पतंगाचा दोर हातात आहे तोवर पतंगही हातात असतोच. त्याचप्रमाणे जोवर भगवंताचं नाम सुरू आहे तोवर तोही जवळ येण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आपण नाम घेतो, नामोच्चार करतो तेव्हा स्मरणही त्यापाठोपाठ येतंच. आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव उच्चारून पहा.. तो उच्चार होताच अंतरंगात त्याचं स्मरणही जागं होतं आणि प्रेमभावही उचंबळतो. तेव्हा नाम हे स्मरणही तात्काळ जागं करतं आणि भावही जागा करतं. आता जे प्रिय आहे, प्रेयस आहे, त्यापासून समर्थ जे श्रेय साधून देणारं अर्थात श्रेयस आहे, त्याकडे पुढील श्लोकात वळवीत आहेत. ‘मनोबोधा’चा हा पुढील ८२वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
बहू नाम या रामनामीं तुळेना।
अभाग्या नरा पामरा हें कळेना।
विषा औषध घेतलें पार्वतीशें।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे।। ८२।।
प्रचलित अर्थ : अनेक नाममंत्र आहेत, पण रामनामाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. ते सर्वश्रेष्ठ आहे. पण अभागी पामर नराला हे कळत नाही. साक्षात शंकरांनी हलाहल नामक अत्यंत जहाल विषावर उतारा म्हणून हे रामनाम कंठी धारण केले. शंकर रामनामाला इतके जपतात, मग बापडय़ा मानवांची काय कथा?
आता मननार्थाकडे वळू. हे ‘बहू नाम’ काय आहे हो? अनेक जण सर्व नाम मंत्रांमध्ये ‘रामनाम’च श्रेष्ठ आहे, असा या चरणाचा अर्थ घेतात. प्रत्यक्षात आधीच्या श्लोकातील ‘समस्ता’शीही याचा संबंध आहे. आपलं जीवन शब्दमय आहे, हे आपण मागे पाहिलंच. ‘नाम’सुद्धा प्रथम शब्दरूपच भासतं. आपल्या मनातले विचार, कल्पना, भावना या सर्व शब्दरूपच असतात. विविध ‘आपल्या’ माणसांच्या नावांनीही मनात स्थान मिळवलं असतं. हा सर्व ‘बहू नामा’चा पसारा आहे! हा सर्व पसारा ‘मी’पणाशी जखडलेला, ‘मी’पणा जोपासणारा आहे. मी जसा नाशिवंत आहे, तसंच हे ‘माझे’ही नाशिवंतच आहेत. या ‘बहू नामा’त अडकलेला आणि त्यासाठी तळमळणारा ‘मी’ मनानं खऱ्या अर्थानं नि:शंक आणि निश्चिंत होऊच शकत नाही. त्यासाठी संकुचिताच्या पसाऱ्यातून मला व्यापकतेकडे नेणारं आणि व्यापक करणारं असंच साधन आवश्यक आहे. परम व्यापक अशा परमात्म्याचं नामच त्यादृष्टीनं अतुलनीय आहे. निर्थक कल्पनांमध्ये तो तासन्तास रमू शकतो, पण भगवंताचं नाम घेताना त्याला ती गोडी वाटत नाही! निर्थक गप्पामध्ये वेळ कसा जातो त्याला कळत नाही, पण नाम घेताना वेळ जाता जात नाही! अशा आपल्याला जागं करताना समर्थ म्हणतात की, साक्षात शंकरांनासुद्धा हलाहल पचविण्यासाठी रामनामाचाच आधार घ्यावा लागला.. महादेव असूनही एकही देव त्यांच्या साह्यसाठी धावू शकला नाही मग हे मना, भवसागराच्या मंथनातून भ्रम, मोह आणि आसक्तीमुळे प्रपंच दु:खाचं जे हलाहल निर्माण होतं ते तू कशाच्या आधारावर पचविणार आहेस? कोणता जीव, कोणता मानव आणि कोणता किंकर तुझ्या मदतीला धावून येणार आहे? सर्वच जण किंकर्तव्यमूढ आहेत!
-चैतन्य प्रेम