प्रपंचदु:खाचं हलाहल केवळ शिवभावानं पचविता येईल, पण आपल्याच अंतरंगातील इच्छा-अपेक्षांचं मरण सोसणं एवढं सोपं नसतंच. केवळ श्रीसद्गुरूंच्या आधारानं ते सोसता येतं. समर्थ म्हणूनच म्हणतात, ‘‘तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं!’’ हा अंत म्हणजे जसा मृत्यू आहे, तसाच हा अंत आहे इच्छांचा! श्रीगोंदवलेकर महाराज यांनीही ‘इच्छामरण’ या शब्दाची फोड इच्छांचं मरण, अशीच केली आहे. या चरणातला अंतकाळ म्हणजे मृत्यू आहे आणि तो मनातल्या इच्छा, वासना आणि अपेक्षांमुळेच त्रासदायक होतो, असं पू. बाबा बेलसरे यांनीही नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘सामान्यपणे जीवनात माणसाच्या सर्व वासना तृप्त होत नाहीत. त्या आज ना उद्या तृप्त होतील या आशेमध्ये तो जगतो. जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा अतृप्त वासना त्यास मागे खेचतात, पण आयुष्य संपल्याकारणाने त्याला देह सोडावाच लागतो. या ओढाताणीमध्ये जीवाचे हाल होतात. जो माणूस भगवंताचे नामस्मरण अभ्यासतो त्याच्या एकंदर वासना मुळातच क्षीण होतात. शिवाय मृत्यू पावणाऱ्या जीवास पुढील जीवनक्रम दाखविण्याची व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेच्या नियमानुसार भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या जीवाला वरचा वर्ग मिळतो. त्याचा उल्लेख समर्थानी या दोन श्लोकांत (क्र. ८४ व ८५) केला आहे.’’ (सार्थ मनाचे श्लोक, श्रीसमर्थ सेवा मंडळ प्रकाशन, पृ. ७७, ७८). आता अंतकाळी वासनांचा, इच्छांचा कल्लोळ जीवाला अडकविणारा असतोच, पण मृत्यू फार दूरची गोष्ट झाली, जर हा इच्छा आणि अपेक्षांचा कल्लोळ जगत असतानाच ओसरला, तर किती बरं होईल! माणसाच्या मनातला इच्छांचा हा गुंता सुटणं मात्र फार कठीण असतं. केवळ सद्गुरू बोधानुसार जीवन जगण्याचा अभ्यास करीत गेलं, तरच इच्छांचा हा अंतकाळही आनंदानं स्वीकारता येतो. तेव्हा हा रामच, हा सद्गुरूच तुम्हाला त्या ‘अंतकाळी’ सोडवू शकेल, असं समर्थ सांगतात. त्यामुळे इच्छा-अपेक्षांत गुंतविणाऱ्या नश्वर जीवांच्या स्मरण, चिंतन, मनन आणि गुणगानात रमण्यापेक्षा या इच्छा-अपेक्षांतून सोडविणाऱ्या सद्गुरूचिन्तनात खरा आराम आहे, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ८६व्या श्लोकात सांगतात. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा