समर्थ रामदास यांनी ‘मनोबोधा’च्या ८८व्या श्लोकात रामनामाचं माहात्म्य मांडलं आहे. हे रामनाम सोपं आहे आणि फुकट लाभलेलं आहे.. त्यासाठी एक पैदेखील खर्च करावी लागलेली नाही.. मीराबाईही म्हणतात, ‘‘पायोजी मैने रामरतन धन पायो। वस्तु अमोलिक दी मेरे सत्गुरू किरपा करि अपनायो।’’ रामनाम हे रत्न आहे.. हे अनमोल धन सद्गुरूंनी कृपा करून मला दिलंय.. ‘‘जनम जनम की पूंजी पाई, जग में सभी खोवायो.. पायो जी मैने रामरतन धन पायो।’’ या नश्वर जगात जे शेवटी नष्टच होणार आहे आणि शेवटी सोडूनच जावं लागणार आहे त्या भौतिकाचा केवळ मनानं त्याग घडला आणि अनंत जन्मांचा ठेवाच मला गवसला! पुढे म्हणतात या रामनामाला काही खर्च नाही, यात काही खोट नाही आणि कोणताही चोर ते चोरू शकत नाही! उलट दिवसेंदिवस ते वाढतच जातं! आता खरी गोष्ट अशी की जी गोष्ट सहजासहजी लाभते, फुकट लाभते तिचं खरं महत्त्व, खरं मोल पटकन उमगत नाही. नाम तोंडानं घेण्यात काय कष्ट आहेत? तरीही प्रथम तर त्या नामावर विश्वासच बसत नाही. नुसतं नाम घेऊन काय होणार आहे, हा पहिला प्रश्न मनात येतो. बरोबर आहे.. नुसतं नाम घेऊन काही उपयोग नाही.. त्या नामाच्या संस्कारानं अंतर्मनात पालट घडत गेला पाहिजे आणि त्यानुसार जगण्याची रीतही बदलत गेली पाहिजे. पण हा अभ्यास सुरू तर करायला हवा? समर्थ म्हणतात.. ‘‘बहू चांगले नाम या राघवाचें!’’ बहू म्हणजे अनंत गोष्टींमध्ये चांगलं रामनामच आहे. आता या अनंत गोष्टी कोणत्या आणि कशासाठीच्या? माणूस जन्मभर अनंत गोष्टी करतो, अनंत धडपड करतो ती सारी मन आनंदी व्हावं म्हणूनच असते. मन आनंदी होण्याची प्रामाणिक इच्छा जागी झाली की जाणवतं की अनेकदा इच्छापूर्तीनं सुख लाभतंच असं नाही. उलट मनाजोगतं घडल्यावर जे घडलं त्याची वाईट बाजूही दिसू लागते आणि दु:खच वाटय़ाला येतं. गरजा आटोक्यात आल्या तर प्रत्येक गरज पूर्ण होऊ शकते, हा अनुभवही येऊ लागेल. त्यामुळे मनातला इच्छांचा कोलाहल कमी व्हावा, असंही प्रत्येकाला वाटतं. प्रत्यक्षात कितीही आटापिटा केला, कितीही धडपड केली तरी अंतरंगातल्या इच्छा-वासनांचा कोलाहल काही शमत नाही. यावर उपाय एक नामच आहे, असं समर्थासह सर्व सत्पुरुष सांगतात. हे नाम साजरे आहे, सोपे आहे.. म्हणजे ते घेण्यात क्लिष्ट नाही. हे नाम स्वल्प आहे! हा स्वल्प शब्द जो आहे तोही मोठा सूचक आहे. अगदी प्रभावी औषध जे असतं ना ते अगदी थोडंच घ्यायचं असतं. तसं नाम आहे. ते स्वल्प म्हणजे सूक्ष्म आहे! आणि आपण विचार केला तर जाणवेल की आपल्या मनातला सर्व कोलाहल हा सूक्ष्मच आहे! आपल्या इच्छा, वासना, कल्पना, भावना, जाणिवा, प्रेरणा, ऊर्मी या साऱ्या सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्म जे असतं त्याची शक्ती फार तीव्र असते. स्थूलावर त्याचीच सत्ता असते. कारण सूक्ष्म इच्छा आणि ऊर्मीनुसार हा स्थूल देह या दृश्य जगात सतत धडपडत असतो. त्यामुळे मनाच्या सूक्ष्म घडणीत जोवर सकारात्मक बदल होत नाही तोवर दृश्य जगातील आपल्या जगण्यातही बदल होणार नाही. त्यामुळे सूक्ष्मात पालट घडवण्यासाठी सूक्ष्मापर्यंत पोहोचणारं सूक्ष्म साधनच पाहिजे. असं साधन नामस्मरण आहे. ते फुकाचं आहे म्हणजे जगण्यातली जी समस्त नश्वरता आहे ते फुंकून टाकणारं आहे! मीराबाईंच्या शब्दांत सांगायचं तर.. जनम जनम की पूंजी पाई, जग में सभी खोवायो.. जे अशाश्वत आहे ते मनातून आत्ताच फुंकून टाकलं तर शाश्वताची जाणीव ओसरणार नाही. ते फुकाचं आहे म्हणजे त्यासाठी मनाची, शरीराची, भौतिकाची कोणतीही पूर्वतयारी लागत नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा