जगात वावरतानाही सद्गुरूंचं स्मरण राखणं म्हणजेच ‘‘हरी चिंतने अन्न जेवीत जावे’’! आधीच सांगितल्याप्रमाणे ‘अन्न’ म्हणजे बाह्य़ जगाच्या संपर्कात इंद्रियांद्वारे जे जे ग्रहण केले जाते ते. ‘अन्न’ मध्ये ‘अन्य’ अशीही अर्थछटा आहे. म्हणजेच जे जे अन्य आहे त्याच्या संपर्कात असतानाही एका सद्गुरूंशी अनन्य राहणं. या चरणाचा ‘‘हरी चिंतने अन्न सेवीत जावे,’’ असाही पाठभेद आहे. त्यानं हे सेवन अधिक स्पष्ट होतं. तर बाह्य़ जगात वावरत असतानाही जेव्हा आंतरिक लय एका सद्गुरूंशीच असेल तेव्हा जगाचा प्रभाव उरणार नाही. जागोजागी सद्गुरूंचीच जाणीव होत राहील. त्या हरीच्या म्हणजेच सद्गुरूंच्या चिंतनानं त्यांच्याच अनुभवाचं सेवन होत जाईल. या प्रक्रियेची सुरुवात बहू चांगल्या, अति साजिऱ्या, स्वल्प, सोप्या आणि फुकाच्या अशा नामानंच होते. हे नाम ‘बहू चांगलं’ आहे. म्हणजे या जगातल्या अनंत गोष्टी माझी व्यग्रता वाढवतातच. पण अन्य साधनाही कधी कधी व्यग्रता वाढवतात. साधना, मग ती कोणतीही असो, ती खरं तर मला एकाग्र करणारीच असते. पण नामाव्यतिरिक्त अन्य ज्या साधना आहेत त्यांनी अनुभव लवकर येतो, असं वाटतं. त्यामुळे अहंकार पटकन वाढू शकतो. नामानं मात्र आंतरिक जडण-घडण मुळापासून सुरू होते, पण ती लक्षातही येत नाही. त्यामुळे ‘अनुभव’ जाणवत नाहीत. म्हणूनच नाम हे अनेक साधनांमध्ये ‘बहू चांगलं’ आहे. ते ‘अति साजिरे’ आहे. म्हणजे या नामाची व्याप्ती एवढी आहे की या जगातल्या प्रत्येक गोष्टीला ते व्यापून टाकू शकतं. अशाश्वतातील शाश्वत जे आहे, निस्सारातील साजरं असं, साररूप असं जे आहे ते नामानंच उमगतं. नाम हे स्वल्प अर्थात सूक्ष्म आहे. त्याला कोणत्याही उपाधीची गरज नाही. ते सोपं आहे. म्हणजे ते घेण्यासाठी आणि घेण्याआधी कोणत्याही शारीरिक, मानसिक, बौद्धिक पूर्वतयारीची अनिवार्यता नाही. हे नाम फुकाचं आहे. म्हणजे ते सहज मिळालं आहे आणि अवघी माया ते फुंकून टाकू शकतं! तर असं नाम हेच माझा संकुचितपणा मला जाणवून देत व्यापक होण्याची प्रेरणा देतं. माझ्या मनाच्या, बुद्धीच्या आकुंचित कक्षांची जाणीव करून देत त्या कक्षा रुंदावण्याची प्रेरणा देतं. नामानं अंतरंगातील भ्रम, मोह, दुर्गुण जाणवू लागतात. पण त्यांच्यापासून मुक्त कसं व्हावं, हे उमगत नाही. त्यानं तळमळ वाढू लागते. या ‘मुक्ती’साठी हरी अर्थात सद्गुरूंची खरी प्राप्ती व्हावी, म्हणजेच त्यांचा अखंड आंतरिक योग साधावा, अशी तळमळ वाढू लागते. शाश्वतासाठीची तळमळ हीच भक्तिप्रक्रियेची सुरुवात आहे. आजवर अशाश्वत जगासाठी तळमळणाऱ्या माझ्या मनात साध्याशा भासणाऱ्या नामानं या दिव्य तळमळीचा प्रारंभ होतो!
-चैतन्य प्रेम