‘मनोबोधा’चा ९१वा श्लोकाचा पहिला चरण सांगतो की, ‘‘नको वीट मानूं रघुनायेकाचा!’’ म्हणजे रघुनायकाचा वीट मानू नकोस. हा रघुनायक म्हणजे राम, अर्थात सद्गुरूच! त्याचा वीट म्हणजे त्यानं जो बोध केला आहे तो आपल्या आचरणात, आपल्या जीवनात उतरवण्याचाच वीट आहे.. त्यानं सांगितलेल्या साधनाभ्यासाचा वीट आहे. साधनाभ्यास म्हणजे तरी काय? तर, आध्यात्मिक साधना ही व्यक्तिगत बाबच असते आणि तिनं मनात जो पालट घडतो तो जगण्यात प्रतिबिंबित झाला का, हे पाहण्याचा अभ्यास म्हणजे साधनाभ्यास! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, परमार्थ हा एकटय़ानं खेळायचा खेळ आहे.. स्वत:नं स्वत:शी खेळायचा खेळ आहे! आता इथं ‘खेळ’ म्हणजे परमार्थाला सामान्यपणा दिलाय, असं समजू नका. तर खेळात मनाचं जे रमणं असतं, जे उन्नयन असतं, ते इथं अभिप्रेत आहे. हा खेळ कसला आहे? महाराजांचा जो निरोप पू. बाबा बेलसरे यांनी सांगितला आहे, ‘‘खेळाऐसा प्रपंच मानावा!’’ ती या विलक्षण खेळाची सुरुवात आहे. प्रपंचाला खेळ मानायचं म्हणजे तरी काय हो? तर खेळ आपण मोठय़ा उमेदीनं खेळतो, जिंकण्याच्या ईर्षेतून आपल्यातलं जे सर्वोत्तम कसब आहे ते पणाला लावून खेळतो, पण तरी शेवटी पराभव झाला तरी तो खेळीमेळीनंच स्वीकारतो! प्रपंचाकडे तसं पाहावं असंच महाराजांना सुचवायचं आहे. प्रपंच आपण कसा करतो? तर तो ‘मी’पणानं करतो. त्यातलं अपयश आपण खेळीमेळीनं स्वीकारत नाही. एक तर उद्ध्वस्त होतो नाही तर निराशेनं मत्सरग्रस्त होतो. परमार्थाच्या ‘खेळा’ची सुरुवातच मात्र प्रपंचाकडे खेळीमेळीनं पाहण्यापासून आहे. त्यात जिंकण्याच्या ईर्षेनं प्रयत्न तर करायचे, पण हरलो तरी उमेद गमवायची नाही, कारण प्रपंचातल्या चढउतारांबरोबर मनाचं हिंदकळणं हीच साधनेच्या आड येणारी पहिली बाब असते. प्रपंचाकडे खेळीमेळीनं, निश्चिन्तपणं कधी पाहता येईल? जेव्हा ‘मी’ हा केंद्रबिंदू न उरता ‘तो’ अर्थात सद्गुरू, हाच प्रपंचाचाही केंद्रबिंदू होईल! ‘मी’ या एकाचा अंत नाही तोवर खरा एकांत नाही.. तोवर मी खरा एकटा नाही! जेव्हा ‘मी’पणा ओसरेल तेव्हा मी खरा एकटा होईन.. आणि तेव्हाच परमार्थ हा एकटय़ानं एका परमात्म्याशी खेळायचा खेळ सुरू होईल! जोवर ‘मी’ हा एक शिल्लक आहे तोवर हा ‘मी’पणाच सद्गुरू आणि माझ्या मध्ये येत राहील. तोवरच मला त्यांच्या बोधानुरूप जगण्याच्या अभ्यासाचा वीट येत राहील. या सद्गुरूला चराचराचं प्रेम आहे, पण या एका ‘मी’पणाचं, या एका जीवाहंकाराचं प्रेम नाही.. समर्थही सांगतात, ‘‘रघू ना येकाचा!’’ त्याचबरोबर हेदेखील बजावतात की, बाबा रे, तू वीट मानून त्यांच्या बोधाकडे दुर्लक्ष केलंस तर त्यात थोर हानी तुझीच आहे. ते काही तुझ्या एकटय़ाकरिता ताटकळत थांबणार नाहीत.. ‘‘रघू ना येकाचा!’’ त्यांना सर्वच जीवमात्रांना या मार्गावर वळवीत त्यांना वळण लावायचं आहे. परिस्थितीचे तडाखे जेव्हा तुझ्यातल्या ‘मी’पणाचं उग्र बाधक रूप तुला दाखवतील तोवर ते तुला प्रारब्धाच्या छायेत वावरू देतील. त्या तडाख्यांनी जाग आल्यावर जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा खरा एक सद्गुरूच तुझ्या हितासाठी तुझ्या पाठीशी आहे ही जाणीव होईल! पण या अनुभवातून जाण्याची काय गरज? आताच जागा हो आणि. ‘‘अतीआदरें बोलिजे राम वाचा!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा