समर्थ म्हणतात, ‘‘हरी तिष्ठतु तोषला नामघोषें। विशेषें हरामानसीं रामपीसें।।’’ अत्यंत आदरानं, प्रेमानं जेव्हा भगवंताचा नामघोष सुरू होईल तेव्हा हरी अर्थात सद्गुरू हा अत्यंत संतोषानं तिथं तिष्ठत थांबेल. पण असा नामघोष कधी सुरू होईल? कोणाकडून सुरू होईल? कोणाला रामाचं अर्थात सद्गुरूंचं विशेष प्रेम लागेल? तर समर्थ म्हणतात, ‘‘विशेषें हरामानसीं रामपीसें।।’’ इथे ‘हरा’ म्हणजे शंकर असा अर्थ प्रचलित आहे, पण हरा-मानस म्हणजे ज्यानं सद्गुरूंसमोर खरी शरणागती पत्करली आहे तो! अशा सद्गुरूशरणागत साधकाच्या मनातलं जगाचं वेड ओसरलं असतं. त्याजागी सद्गुरूंचं विशेष प्रेम विलसू लागलं असतं. तुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’’.. ज्याच्या अंतरंगात नश्वर, अशाश्वत जगाच्या आसक्तीचा वीट उत्पन्न झाला आहे, तोच खऱ्या अर्थानं ध्यानात निमग्न होऊ शकतो. तसंच ज्याच्या मनातलं जगाचं पिसं म्हणजे प्रेम ओसरलं आहे त्याच्याच मनात रामाचं खरं प्रेम उत्पन्न होतं. अशा मनातच हरी म्हणजे सद्गुरू अत्यंत आनंदानं तिष्ठत असतो! हे जे तिष्ठणं आहे ते कसं आहे? तर त्यात प्रेम आहे, वात्सल्य आहे, दयाद्र्र करुणा आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, तुम्हाला कळत नाही इतकं तुम्ही कसे आहात ते मला कळतं, तरीही तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे-पुढे उभा आहे! तसं हे तिष्ठणं आहे! वैखरीनं नुसता नामघोष ऐकूनही हरीला संतोष वाटतो. कारण माणसाचा जन्म नेमका का आणि कशासाठी मिळाला, हा प्रश्न या जिवाच्या मनात आता उत्पन्न होईल, अशी त्याला आशा वाटते! एका तरी इंद्रियांचा भगवंतासाठी वापर सुरू झाला, याचं प्रेम वाटतं. मग जो या नामात पूर्णत: रममाण होत जाईल त्याच्याच मनातून जगाची आसक्ती लोप पावू लागेल. जगाची आसक्ती म्हणजे जगाकडूनच सुख मिळेल या आशेतून सुरू असलेला अपेक्षापूर्तीसाठीचा हट्टाग्रह. सुख म्हणजे आपल्या मनासारखं घडणं! तेव्हा जग आपल्या मनासारखं वागेल, जग आपल्या अनुकूल होईल, या आशेतून माणूस जगात सुखासाठी धडपड करीत असतो. जेव्हा जग आहे तसंच राहणार, हे वास्तव उमगतं आणि परिस्थिती मनाला अनुकूल बनविण्याच्या धडपडीऐवजी कोणत्याही परिस्थितीत मनाला स्थिर राखण्याचं महत्त्व उमगतं, तेव्हाच जगाचं दास्य, जगाला शरणागत होण्याची लाचार वृत्ती लयाला जाते. खरी सद्गुरूप्रीती मनात उत्पन्न व्हावी, अशी ओढ लागते. जगात ‘मी’ला सिद्ध करण्याच्या स्पर्धेतून माघार घेतली जाते आणि सद्गुरूंसमोर खरी अंत:करणपूर्वक हार स्वीकारली जाते. असा जो आहे त्याच्या मनात म्हणजेच ‘हरा-मानसी’ सद्गुरूंचं खरं विशेष प्रेम निर्माण होतं. जेव्हा हा नामाचा प्रेममय घोष सुरू होतो तेव्हा तो हरीही तिथं प्रेमानं आणि प्रेमासाठी ताटकळतो! ‘गीते’त भगवंतानी या प्रेमघोषाचं माहात्म्य मांडलं आहे. भगवान म्हणतात, ‘‘नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ। मद्भक्ता यत्र गायन्ति। तत्र तिष्ठामि नारद।।’’ माऊली याचा भावानुवाद करताना म्हणतात, ‘‘तो मी वैकुंठीं नसे। वेळ एक भानुबिंबींही न दिसे। वरी योगियांचींही मानसें। उमरडोनि जाय।। परी तयापाशीं पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोष बरवा। करिती माझा।।’’ हे अर्जुना, मी एकवेळ वैकुंठातही नसेन किंवा योग्यांच्या हृदयात किंवा रविबिंबातही नसेन, पण जिथे माझे निजजन, माझ्यापासून क्षणमात्रही मनानं विभक्त न होणारे माझे भक्त जिथं माझा नामघोष करीत असतील तिथं मी स्वत:ला विसरून उभा असेन! भक्तांची मांदियाळी असलेल्या अशा प्रेमसभेचं वर्णन ‘दासबोधा’तही आहे. त्यात समर्थ म्हणतात, ‘‘आतां वंदू सकळसभा। जये सभेसी मुक्ति सुल्लभा। जेथें जगदीश स्वयें उभा। तिष्ठतु भरें।।’’ भगवंत असा उभा का बरं आहे? तर आपल्या प्रेमात बुडालेल्या या भक्ताच्या रक्षणासाठी! संतांच्या मनातून जगाचं दास्य सुटलं आणि भगवंत त्यांचा दास झाला! त्यांनी स्वत:ला ‘रामदास’ म्हणवलं, पण ‘रामदास’ म्हणजे रामाचा दास की राम ज्याचा दास आहे तो, असा प्रश्न पडावा एवढी एकरूपता देव-भक्तांत विलसू लागली! अशी एकरूपता शिष्याची आपल्याशी साधावी हीच सद्गुरूंची इच्छा असते. कारण जेव्हा सद्गुरूंशी असा खरा संग साधेल तेव्हाच मन जगापासून नि:संग होईल. जगात असूनही आणि जगण्यातली सर्व कर्तव्य पार पडत असूनही जीवन्मुक्ती अनुभवेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा