पाप आणि पुण्य या मानवी जीवनातल्या दोन अतिचर्चित गोष्टी आहेत. पाप केल्यानं नरकयातना वाटय़ाला येतात आणि पुण्य केल्यानं स्वर्गसुख लाभतं, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. पण पाप नेमकं कोणतं आणि पुण्यकारक काय, हे ठोसपणे सांगता येत नाही. हत्या हे पाप आहे, पण युद्धात शत्रूची हत्या हे वीरासाठी कर्तव्यकर्म अर्थात पुण्यकर्म आहे, असं गीताही सांगते. एखाद्याचा पाय तोडणं हे पापकर्म आहे, पण शरीरात विष पसरेल अशी बाधा त्या पायाला झाली, तर शस्त्रक्रियेनं तो पाय कापणं हे डॉक्टरांसाठी पुण्यकर्मच आहे. खोटं बोलणं पापच, पण मरणशय्येवर असलेल्याला, ‘तू लवकर बरा होशील,’ हे सांगून दिलासा देणं, हे पुण्यकर्मच आहे. तेव्हा कोणत्या कर्माला ‘पाप’ म्हणावं आणि कोणत्या कर्माला ‘पुण्य’ म्हणावं, हा प्रश्न माणसाला अनेकदा पडतो. त्याचं फार सोपं उत्तर गोंदवलेकर महाराजांनी दिलं आहे. ते म्हणजे, ज्या कर्मानं भगवंत दुरावतो ते पापकर्म आणि ज्या कर्मानं भगवंत जवळ येतो ते पुण्यकर्म! पण प्रत्येक कर्माचा असा बारकाईनं विचार करून भगवंताचा संग ज्यातून साधेल अशी र्कम आपल्याकडून व्हावीत, ही इच्छा फार थोडय़ांच्या मनात उत्पन्न होते. आपली बहुतांश र्कम ही मनाच्या ओढीनं घडतात. मन हे अनंत जन्मांच्या संस्कारांनी युक्त असतं. मग ज्या क्षणी जे संस्कार जागे होतात त्यानुसार कृती करण्याकडे मनाची ओढ असते. ही ओढ सहज आणि जबर असते. ‘मन आवरत नाही,’ म्हणतात ना? उतारावर घसरणारी गाडी किंवा वेगानं वाहणारा जलप्रवाह थोपवणं जसं अवघड , तसंच मनाचे संस्कारांनी जागृत वासनावेग आवरणं कठीण.
अजामिळाच्या बाबतीतही हेच घडलं. ब्राह्मणपुत्र अजामिळावर वेदशास्त्राचे सर्व संस्कार बालवयापासून झाले होते. घरी पवित्र वातावरणही लाभलं होतं. पण केवळ या जन्मातली पाश्र्वभूमी किंवा संस्कार मन घडवतात, असं सनातन तत्त्वज्ञान मानत नाही. अनंत जन्मांचे अनंत संस्कार किंवा अनुभवांचे, धारणेचे, आकलनाचे ठसे मनात खोलवर सुप्त विसावले असतात. प्रसंगवशात ते जागे होतात आणि त्यानुसारही माणूस कृती करीत असतो. अनेकदा आपल्या वागण्याचं त्यालाही आश्चर्य वाटतं, पण तरी मनोवेगांत त्याच्याकडून कृती घडतच असते. एकदा पित्याच्या सांगण्यावरून अजामिळ जंगलात यज्ञासाठी समिधा, कुश आणि फुले आणण्यास गेला होता. तिथं त्यानं एका गणिकेला एका पुरुषाशी रत होताना पाहिलं आणि त्याच्यातले अनंत जन्मांचे कामसंस्कार उफाळून आले. लक्षात घेण्यासारखी विशेष गोष्ट अशी की अजामिळ हा विवाहित होता. अर्थात कामवासनापूर्तीचा अनुभवही त्याच्या गाठी होता. तरी तो कामांध झाला. आपल्या अंतरंगात उफाळत असलेल्या या कामावेगाची त्याला जाणीव झालीच आणि त्यानं आपल्या मनाला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. आपलं संपूर्ण ज्ञान आणि धैर्य एकवटून त्यानं हे मनोवेग रोखण्याची धडपड केली. पण त्याला यश आलं नाही! ‘भागवता’त म्हटलं आहे, ‘‘.. न शशाक समाधातुं मनो मदनवेपितम्!’’ मग तो त्या गणिकेच्या प्रेमात इतका वाहावत गेला की त्यानं नवविवाहित पत्नीला सोडलं, मातापित्यांकडे दुर्लक्ष केलं. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गानं पैसा आणि वस्तू आणून तो तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी हळूहळू चौर्यकर्मेही बेलाशक करू लागला. त्याच्यापासून त्या गणिकेला दहा पुत्र झाले. दहाव्या पुत्राचं नाव त्यानं ‘नारायण’ ठेवलं. त्याच्यावर याचं आत्यंतिक प्रेम होतं. जेवताना तो त्यालाही भरवल्याशिवाय राहत नसे. पाणी पिताना त्यालाही पाणी दिल्याशिवाय राहत नसे. थोडक्यात कोणत्याही गोष्टीत त्याचा विचार करीत असे. मुखानं सतत नारायणाचा नामोच्चार, मनानं सतत नारायणाचं मनन, चित्तात सदा नारायणाचं चिंतन सुरू होतं, पण ते नारायणभावानं नव्हे, केवळ पुत्रप्रेमभावानं! आणि अखेर या सवयीनंच तो ‘मुक्तिदाता’ प्रसंग घडला..