मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाचं विवरण आता संपलं. नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नानाविकारी।। नको रे मना सर्वथा अंगिकारूं। नको रे मना मत्सरू दंभभारू।। या सहाव्या श्लोकाच्या निमित्तानं ‘दासबोध’ आणि ‘षड्रिपूनिरूपण’ या लघुप्रकरणाच्या आधारानं आपण या विषयाचा संक्षेपानं मागोवा घेतला. आता हा षट्विकारांचा त्याग सोडा, त्यांचा त्याग करण्यासाठीचा अभ्यास जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा काय घडतं आणि त्या स्थितीला साधकानं कसं तोंड दिलं पाहिजे, याचं फार मार्मीक मार्गदर्शन समर्थानी पुढील सातव्या श्लोकात केलं आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा:
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें।
मना बोलणें नीच सोशीत जावें।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें।
मना सर्व लोकांसि रे नीववावें।। ७।।
या श्लोकाचा प्रचलित अर्थ असा – हे मना, चित्तात श्रेष्ठ म्हणजे सात्त्विक धैर्य धारण कर आणि दुसऱ्याचं नीच बोलणंही सहन कर. शांतपणे ते सोसत जा. स्वत: मात्र नम्रपणे दुसऱ्यांशी बोलत जा आणि त्यायोगे सर्व लोकांचं अंत:करण शांत करीत जा.
आता या प्रचलित अर्थाला पुष्टी देणाऱ्या ‘दासबोधा’तील काही ओव्यांचा उल्लेख समर्थ साहित्याचे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी ‘मनोबोध’ या पुस्तकात केला आहे. त्यानुसार ‘‘सकलांसि नम्र बोलणें। मनोगत राखोन चालणें।।’’ म्हणजे सर्वाशी नम्र बोलून दुसऱ्याचं मनोगत राखून वर्तन करावं, ‘‘उदंड धिक्कारून बोलती। तरी चळों न द्यावी शांति। दुर्जनांसि मिळोन जाती। धन्य ते साधू।।’’ दुसरा कितीही धिक्कारून का बोलेना, तरी जो आपली आंतरिक शांती ढळू देत नाही असे साधू वृत्तीचे साधक धन्य आहेत किंवा ‘‘धके चपेटे सोसावे। नीच शब्द साहीत जावे। परस्तावोन परावे। आपले होती।।’’ म्हणजे दुसऱ्याचे वाक् ताडन सोसत गेल्यावर परक्यांनाही पस्तावा होतो आणि ते आपले होतात! आता दुसऱ्याचं असं टाकून बोलणं सोसता येणं एवढं का सोपं आहे? आणि सुरुवातीलाच आपल्यासारख्या साधकांना ते कसं साधेल? त्यामुळे या मनोबोधाच्या सातव्या श्लोकाचा आपल्यासाठी काही खास अर्थ आहे का, याचा शोध घेत गेलो ना तर एक अद्भुत असा गूढार्थ हाती येतो! सहाव्या श्लोकात काय सांगितलं? तर षट्विकारांना आवरायला सांगितलं. आता आपण ठरवलं, क्रोध सोडायचा. आजपासून रागवायचं नाही की आपण रागवावं अशा अनेक घटना अवतीभवती घडू लागतात! किंवा दुसरा मुद्दाम असं वागतोय की आपला रागावर ताबाच राहू नये, असंही आपल्याला वाटतं. थोडक्यात आपण षट्विकार आवरू लागताच परिस्थिती जणू आपली परीक्षा पाहू लागते आणि अंतर्मनही ढुश्या देऊ लागतं! काय गरज आहे ऐकून घ्यायची? अरेला कारे केलंच पाहिजे. काय गरज आहे आपल्या मनाविरुद्ध घडू द्यायची? आपल्याला हवं ते केलंच पाहिजे, मग दुसऱ्याला किती का वाईट वाटेना.. अशा तऱ्हेचे विचार मनात उसळू लागतात. वरून त्या विचारांनुरूप कृती न करण्याचा निश्चय असतो, पण आतून त्या कृतीसाठी ते विचार उद्युक्त करत असतात. सुप्त मनच हे विचार उत्पन्न करीत असतं आणि जागृत मनच ते विचार थोपवू पाहात असतं. सुप्त मनाचं हे जे आंतरिक बोलणं आहे ते अगदी खोलवरून सुरू आहे. हेच ते नीच बोलणे! आपण जसं जगायचं ठरवलं आहे त्या विपरीत जगण्यासाठी सुप्त मनाचं जे आक्रंदन सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मोठं धैर्य लागतं. म्हणूनच समर्थ सांगतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें। मना बोलणें नीच सोशीत जावें!!
– चैतन्य प्रेम