अजामिळानं मृत्यूच्या क्षणी पुत्राला ‘नारायण’ अशी आर्त हाक मारली. तेवढय़ानं तो पूर्णत: पापमुक्त झाला; पण त्याची एक मोठी परीक्षाही भगवंतानं घेतली. यमदूतांना समजावताना विष्णूच्या दूतांनी सांगितलं होतं की, ‘‘तपस्या, दान, जप आदी प्रायश्चित्त घेऊन पापं तर नष्ट झाली, पण पापांनी मलिन झालेलं हृदय काही या प्रायश्चित्तांनी शुद्ध होत नाही! ते केवळ भगवंताच्या चरणसेवेनंच शुद्ध होतं!!’’ आता ही खरी ‘चरणसेवा’ कोणती, हे आपण नंतर जाणून घेणार आहोतच. तर, भगवन्नामाच्या प्रभावानं अजामिळाची पापं भस्मसात झालीच होती, पण त्याला चरणसेवेची संधी द्यायचं भगवंतानं ठरवलं. संधी कसली, परीक्षाच ती! ही परीक्षा म्हणजेच जीवन-परीक्षा! कारण मृत्यूच्या क्षणी अजामिळानं नाम घेतलं म्हणून त्याची सोडवणूक विष्णूच्या दूतांनी केली. त्याला यमदूतांनी आक्षेपही घेऊन पाहिला होता.. आणि आपल्यालाही वाटतं की, जन्मभर ज्यानं पापच केलं त्याला अशी मुक्ती मिळणं न्याय्य आहे का? त्यासाठीच जणू ही परीक्षा झाली. अजामिळाचा मृत्यू टळला आणि त्याला जीवन-दान लाभलं. मृत्यूच्या क्षणी अजामिळानं विष्णुदूत आणि यमदूतांमधला संवाद ऐकला होताच. आपण आता पूर्णत: पापमुक्त झालो, असंही त्यानं ऐकलं होतं. त्यामुळे भयमुक्त झालेल्या अजामिळाला जेव्हा पुन्हा जगण्याची संधी मिळाली तेव्हा त्याला अगदी मनासारखं जगण्याची इच्छाही सहज झालीच असती.. आणि हीच त्याची मोठी कसोटी होती! पुन्हा जगायला मिळताच मन पूर्वसंस्कारानुरूप उसळी मारणं शक्य होतं. आता लाडक्या पुत्र नारायणाचे लाडकोड पुरवण्यात उरलेलं आयुष्य घालवता आलं असतं; पण अजामिळानं विष्णुदूत आणि यमदूतांमधला संवाद ऐकला होता आणि त्यानं त्याचं अंत:करण प्रकाशित झालं होतं. यमदूतांनी प्रवृत्तिधर्मानुसार विवेचन केलं होतं. त्यामुळे आपल्या पापाचे किती भयंकर परिणाम आपल्या वाटय़ाला आले होते, हे त्याला उमगलं होतं. त्याच वेळी विष्णुदूतांनी विशुद्ध भागवत धर्माचं विवेचन केलं होतं आणि त्यानुसार अजाणतेपणी का होईना अजामिळानं नारायणाचं नाम घेतलं आहे आणि त्यामुळे तो पापमुक्त झाला आहे, हा युक्तिवादही ऐकला होता. आता एवढं होऊनही नव्यानं जगण्याची संधी मिळताच ते सारं विसरलं जाऊन मनाच्या जुन्याच ओढी पुन्हा उत्पन्न होण्याचा मोठा धोका होताच. अजामिळानं त्या क्षणी मात्र मनाला सावरलं आणि पश्चात्तापानं त्याचं अंत:करण पोळू लागलं. तो स्वत:चा धिक्कार करू लागला. आपल्यामुळे आपल्या सोशीक पत्नीला आणि वृद्ध माता-पित्याला झालेल्या त्रासाची जाणीव होऊन तो अत्यंत कष्टी झाला. नुकताच जो दिव्य संवाद आपण ऐकला ते स्वप्न तर नव्हतं, असा प्रश्नही त्याला पडला. मात्र त्या अनुभवानं आपलं चित्त अगदी प्रसन्न, शांत झालं आहे, हेदेखील त्याला उमगलं. त्याला काही तरी बोलायचं आहे, हे पाहताच विष्णूचे ते दूत अंतर्धान पावले होते. त्यामुळे तर अजामिळाचं मन उत्कंठेनं भरलं होतं. जगाकडून ऐहिक सुख मिळवण्याच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा मावळल्या होत्या. त्यामुळे नव्यानं लाभलेल्या जीवनाचा त्यानं संधीसारखाच उपयोग केला. तो हरिद्वारला गेला आणि उर्वरित आयुष्य त्यानं तपाचरणात व्यतीत केलं. विष्णुदूत म्हणाले होते ना? की, खरं प्रायश्चित्त हरिचरणाची सेवा हेच आहे! साधकांनीही हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हरी म्हणजे जो समस्त भवदु:खाचं हरण करतो तो सद्गुरू आणि त्याची चरणसेवा म्हणजे त्याच्या मार्गानं वाटचाल करणं! तेव्हा नुसत्या नामानं पापमुक्ती होईलही, पण अंत:करण शुद्ध व्हायचं असेल तर सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. अजामिळानं जसं नव्यानं मिळालेलं जीवन सार्थकी लावलं, तसं आपल्या जीवनाला आपणही सार्थक केलं पाहिजे. आपणही जीवनाच्या परीक्षेला आनंदानं सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंचाच आधार अनिवार्य आहे.
३०४. जीवन-परीक्षा
अजामिळानं मृत्यूच्या क्षणी पुत्राला ‘नारायण’ अशी आर्त हाक मारली.
Written by चैतन्य प्रेम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2017 at 02:11 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy