अंत:करण शुद्ध व्हावं, असं वाटत असेल, तर साधकानं सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तो अभ्यास का गरजेचा आहे? त्यासाठी थोडं आधी आपल्या जगण्याकडे पाहिलं पाहिजे. आपलं जीवन कसं आहे? तर ते कर्मबद्ध आहे. ‘काही न करणं हेदेखील कर्मच आहे,’ असं भगवद्गीतेत भगवंतांनीही सांगितलं आहेच ना? म्हणजेच माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. माणसाच्या हातून जाणतेपणी आणि अजाणतादेखील कर्म घडतच असतं. आता या कर्माचे दोन भाग पडतात. सत्कर्मे आणि दुष्कर्मे अर्थात चांगली कर्मे आणि वाईट कर्मे, शुभ कर्मे आणि अशुभ कर्मे. प्रत्येक कर्म हे कर्ताभावानं होत असल्यानं त्याचं भलं-बुरं फळही भोगावंच लागतं. चांगल्या कर्मानं ‘पुण्य’ लाभतं आणि वाईट कर्मानं ‘पाप’ लाभतं. पापामुळे नरक वाटय़ाला येतो, तर पुण्यामुळे स्वर्ग लाभतो, असं सनातन धर्मविचार सांगतो. बरं, एकदा स्वर्ग लाभला की तो कायमचा टिकतो का? तर नाही! गीतेत भगवंतांनीही स्पष्ट सांगितलं आहे की, एकदा का पुण्य क्षीण झालं की त्या जीवाला मर्त्यलोकात फेकलं जातं! म्हणजेच पुण्यानं लाभणारा स्वर्गदेखील मुक्ती देत नाही. अर्थात पाप जितकं वाईट तितकंच पुण्यही वाईटच! कारण दोन्हीमुळे अडकणं काही संपत नाही. सत्कर्माची एकच बाजू चांगली आहे, ती म्हणजे इतर जीवमात्रांना त्रास होत नाही! पण साधकानं काय करावं? कर्म तर चुकणार नाहीच आणि ते चुकवूही नये, पण कर्म तर घडावं आणि त्यानं अडकूही नये, हे कसं साधावं? साधकाच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही आणि त्यासाठीच सद्गुरूंचा आधार अनिवार्य आहे. कर्म कोणतं करावं, ते कसं करावं, कोणतं कर्म टाळावं, हे सद्गुरू बोधाशिवाय उमगूच शकत नाही. जे कर्म टाळलं पाहिजे तिथेच आपल्या मनाची ओढ असते! जे कर्म हातून घडलं पाहिजे तिथेच मन कंटाळा करत असतं. त्यामुळे सद्गुरू बोधानुसार जगू लागलं पाहिजे. निदान तशा जगण्याला अग्रक्रम दिला गेला पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, ‘‘सावधानता बाकी सर्व वेळेस असते, प्रसंग आला की तिचा विसर पडतो!’’ तेव्हा आपल्या जगण्यात ती सावधानता, ते अवधान आहे का, याचं निरीक्षण-परीक्षण करीत राहिलं पाहिजे. कारण आपण बरेचदा बोलू नये ते बोलतो किंवा वागू नये तसं वागतो ते अनवधानानंच! तेव्हा जगण्यात अवधान आलं पाहिजे.. त्यासाठी अभ्यास पाहिजे. अनेकदा चुकूही, मनाच्या ओढीनुसार वागू किंवा बोलून जाऊही, पण अभ्यासानं त्याचं प्रमाण आटोक्यात येईल. तर जीवनदान मिळताच अजामिळाची जीवनपरीक्षा जशी सुरू झाली होती तशीच परीक्षा साधकाचीही क्षणोक्षणी सुरूच आहे.
अजामिळानं हरिद्वारला जाऊन तपश्चर्या केली. आपणही हरीच्या द्वारी अर्थात सद्गुरूंच्या मार्गात स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. असा अभ्यास नेटानं झाला तर अजामिळाप्रमाणे अखेरच्या क्षणी आपल्याही ओठी शाश्वताचंच नाम येईल.. शाश्वताचंच स्मरण होईल. तुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘‘याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा!’’ सगळा अट्टहास त्यासाठी आहे.. शेवट गोड व्हावा म्हणून! शेवटच्या क्षणी शाश्वताचंच स्मरण व्हावं म्हणून! अजामिळाची कथा तेच सांगते. त्याचबरोबर ‘मनोबोधा’च्या ९५व्या श्लोकात पिंजऱ्यातल्या पोपटाचं नाव ‘राम’ ठेवल्यानं रामनामाचा सतत उच्चार झाल्यानं उद्धरून गेलेल्या गणिकेचाही उल्लेख आहे. हे रूपक आपल्यालाही लागू आहे. आपणही हृदयाच्या पिंजऱ्यात अनंत इच्छांचे राघू पाळले आहेत. आपलं तन-मन जगाच्या सेवेत लावून आपण सुख मिळवण्याच्या आशेनं झुरत जगत आहोत. म्हणून या इच्छांच्या जागीच जर जोडीला रामाचं, शाश्वताचं स्मरण साधण्याचा प्रयत्न केला तर? तर हळूहळू का होईना आपलं मनही उन्नत होऊ लागेल.. आपण कसं जगतो आहोत आणि खरं कसं जगलं पाहिजे, ही जाणीव होऊ लागेल. तर रामनामाच्या आधारानं देव आणि मानव यांच्या आंतरिक स्थितीत कसा पालट झाला, हे ‘मनोबोधा’च्या ९४ आणि ९५व्या श्लोकात आपण जाणलं. आता ९६वा श्लोक दानवाकडे वळवीत आहे!