समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकाकडे आपण आता वळत आहोत. प्रथम हा श्लोक, नंतर त्याचा प्रचलित अर्थ पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।
जपे रामनामावळी नित्यकाळीं।।
पिता पापरूपी तया देखवेना।
जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ।।९६।।
प्रचलित अर्थ : महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात हिरण्यकशिपूच्या पोटी जन्मला असला तरीही त्याने अखंड नारायणाच्या नामस्मरणाचा छंद घेतला. त्या पापी पित्याला ते न खपून त्याने पुत्राचा अनन्वित छळ केला. त्या दैत्याच्या तोंडून काही देवाचे नाव आले नाही.
आता मननार्थाकडे वळू. या श्लोकाचा अर्थ पाहात असताना आधी ‘श्रीमद्भागवत महापुराणा’त सातव्या स्कंधात प्रल्हादाची जी कथा देवर्षि नारदांनी युधिष्ठिराला सांगितली आहे ती आपण पाहाणारच आहोत, पण त्याआधी देव आणि दानव या रूपकांचाही थोडा विचार करू. देव आणि दानवांची लढाई पूर्वीच्या काळी होत असे, असे म्हणतात. पण आपल्या अंतरंगातही ‘देव’ आणि ‘दानवां’ची लढाई सुरूच तर आहे. सत्त्वगुण आणि तमोगुणाची ही लढाई आपण अनुभवतोच. साधनपथावर आल्यापासून तर ही लढाई अगदी स्पष्टपणे उकलत आहे! नाम घ्यावं, भक्ती करावी, उपासना करावी, असं मनाचं सत्त्वगुणप्रधान अंग सांगत असतं. पण त्याचवेळी हे सारं करून काय होणार आहे, असा प्रश्न मनाचंच तमोगुणप्रधान अंग चोरपावलांनी मांडत असतं. जगाचा प्रभाव, जगाचं महत्त्व, जगातल्या चढउतारांचा परिणाम हेच अंग मनात ठसवत असतं. हिरण्यकपशिपू आणि प्रल्हादाच्या कथेतून साधकाला हीच शिकवण लाभते. ज्या मनात अविचार सुरू असतो, भ्रम-मोह आणि आसक्तीतून ‘मी’ आणि ‘माझे’चा पसारा वाढत असतो, अहंकार उसळी मारत असतो, सर्व जगानं आपलंच ऐकावं, असा हेका रूजत असतो त्याच मनात क्षीणशी का होईना, भक्तीची एक वाट अलगदपणे उजळत असते! त्या वाटेनं जावं, असंही मन अधेमधे आर्तपणे सुचवत असतं, पण तमोगुणानं भारताच हे मन पुन्हा पुन्हा जगाच्याच वाटेकडे वळवत असतं. हिरण्यकशिपूही काही सामान्य नव्हता! त्यानंही उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. पण त्याच्या त्या उग्र तपश्चर्येचं कारण काय होतं? तर जगात आपल्या विरोधात टिकेल, असा कुणीही उरू नये! आपलं सामथ्र्य एवढं असावं की देव, दानव, मानव, पशु कुणाकडूनही आपल्याला मरण येऊ नये, हा त्या तपाचा हेतू होता. परमभावात विलीन होऊन परमस्वरूप प्राप्त करावं, हा हेतू नव्हता. हेतू अत्यंत संकुचित होता. ‘मी’ला निर्विवाद एकहाती सत्ता मिळवून देणारा होता. त्याला तसा वर मिळालाही. मोह आणि मदांध जिवाची हीच तर धडपड असते. आपला ‘मी’ कायम टिकावा, अजेय राहावा, सर्वोच्च राहावा, हीच त्याची सुप्त आणि एकमेव इच्छा असते. जरा या ‘मी’ला अनुकूल, या अहंकाराला पोषक अशा घटना घडू लागल्या की कर्तेपणाच्या ताठय़ानं माणूस स्वत:ला किती मोठं मानू लागतो. देवालासुद्धा तो तुच्छ मानू लागतो. जगात सर्वोच्च जर कुणी असेल, परम कुणी असेल तर तो केवळ मीच आहे, या भावनेनं तो वावरू लागतो. याच आसक्त, मोहग्रस्त, दुराग्रही, हट्टाग्रही मनाला सद्सदविवेकबुद्धीरूपी प्रल्हाद आतून ताळ्यावर आणू पाहात असतो. वास्तवाची जाणीव करून देत असतो. भगवद्भावात विलीन होऊन सर्व संकुचितपणाचं ओझं झुगारायला विनवत असतो. त्यानं ज्ञान जागं होण्याऐवजी क्रोध जागा होतो आणि मग या सूक्ष्म बुद्धीला दडपण्याचीच धडपड सुरू होते.