श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकात भक्त प्रल्हादाचं चरित्र मांडलं आहे. त्यायोगे, नामस्मरणाच्या आधारानं दानवानं मिळविलेल्या परमोच्च सहजभावस्थितीची आणि साधलेल्या आत्मोद्धाराची उत्कट नोंद आहे. या आधीच्या दोन श्लोकांत महादेव आणि मग मानवानं नामाच्या आधारानं साधलेल्या परमहिताचा उल्लेख झाला. आता हा श्लोक दानवाचा साधनापथावरील प्रवास मांडतो. प्रल्हादाची ही कथा ‘श्रीमद्भागवत महापुराणा’च्या सातव्या स्कंधात सविस्तरपणे आली आहे. ही कथा सर्वपरिचित आहेच, तरीही या श्लोकाच्या अनुषंगानं तिचा संक्षेपानं मागोवा घेऊ. हिरण्यकशिपुचा भाऊ हिरण्याक्ष याला विष्णुच्या हातून मरण आलं होतं. त्यामुळे सूडाग्नीनं पेटलेल्या हिरण्यकशिपुनं उग्र तप आरंभलं. त्या तपश्चर्येनं त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि कोणीही तोवर प्राप्त न केलेला वर मिळवला होता. त्या वरामुळे हिरण्यकशिपुचा वध करणं कोणत्याही मनुष्याला, पशुला, देवतेला वा दैत्याला साधणार नव्हतं. घरात किंवा घराबाहेर, दिवसा वा रात्री, धरतीवर वा आकाशात आणि कोणत्याही अस्त्रानं वा शस्त्रानंदेखील तो अवध्य ठरणार होता. युध्दात तो अजेय राहाणार होता आणि समस्त प्राण्यांचा एकछत्री सम्राट ठरणार होता. या वरामुळे त्रिभुवनाची सत्ता एकहाती त्याच्याच हाती एकवटली. अशी पाशवी सत्ता एकवटली आणि अहंकार वाढत असला की काय होतं, याचा ही कथा म्हणजे प्राचीन चिरंतन दस्तावेज आहे! सर्व जीवमात्रांवर त्याचाच अंमल लागू झाला. दिक्पाल आणि लोकपालांची सर्व शक्तीही त्यानं बळकावली आणि त्यांची पदंही ग्रहण केली. देवराज इंद्राच्याच महालात तो राहू लागला. दानवच काय, देवही त्याच्यासमोर मान झुकवू लागले. ब्रह्मा, विष्णु आणि महेश वगळता अन्य सर्व देवता त्याची सेवाही करू लागले. नारदमुनी सांगतात की, विश्वावसु, तुम्बरू तसंच आम्ही सर्वजण त्याच्यासमोर गायन करू लागलो होतो. गंधर्व, सिद्ध, ऋषिगण, विद्याधर आणि अप्सराही त्याची स्तुती करीत.. पाशवी सत्तेसमोर सत्त्वगुणी, तमोगुणी, रजोगुणी, ज्ञानवंत, तपोवंत, प्रज्ञावंतही कसे नतमस्तक होतात आणि जुळवून घेतात, याचं हे हजारो वर्षांपूर्वीचं वर्णन आहे! यातलं कुणीही सत्तांध आणि मदांध झालेल्या ‘मी’ नावाच्या दैत्याला वास्तवाची जाणीव करून देऊ शकत नाही! पण एक गोष्ट घडली होती. हिरण्यकशिपु तपश्चर्यारत होता तेव्हा देवांनीही त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी संघर्ष केला होता. दानवांवर विजय मिळवण्यासाठीची निकराची लढाई त्यांनी केली होती. त्या संघर्षांत दानवांची धूळधाण उडत असतानाच हिरण्यकशिपुची पत्नी कयाधू हिला देवर्षी नारदांनी आपल्या आश्रमात आश्रय दिला होता. तिच्या पोटात त्यावेळी असलेल्या प्रल्हादानं भगवद्भक्तीची सूत्रं नारदांकडून ग्रहण केली होती. त्यामुळे हिरण्यकशिपुचा हा चौथा पुत्र प्रल्हाद दैत्यकुळात जन्मला तरी त्याच्या अंत:करणात दैत्यसंस्कारांचं नव्हे, तर भगवद्भक्तीचं बीज जन्मत:च रूजलं होतं. सर्वात लहान म्हणून सर्वात लाडक्या असलेल्या या दैत्ययुवराजाचं विद्याध्ययन योग्य काळ येताच दैत्यगुरू शुक्राचार्याच्या आश्रमात सुरू झालं. पण ज्याला जन्मत:च भक्तीचं ज्ञान लाभलं होतं त्याला ‘ज्ञाना’तलं सार काय आणि नि:स्सार काय, हे उमगतंच ना? त्याप्रमाणे शुक्राचार्याच्या दोन्ही पुत्रांकडून व्यवहाराजं ‘ज्ञान’ प्रल्हाद ‘शिकला’. जे त्यांनी सांगितलं ते सारं यानं घडाघडा ऐकवलं. तेव्हा जो पढवलेलं जसंच्या तसं म्हणून दाखवतो तो हुशार आहे, त्याची ग्रहणक्षमता उत्तम आहे, असं गुरूजनांना वाटलं तर त्यात नवल नाही. पण जे ‘ज्ञान’ भेद शिकवतं आणि वाढवतं ते ज्ञान नव्हे, तर अज्ञानच आहे, ही प्रल्हादाची धारणा त्यांना कुठे ग्रहण करता आली होती!