लोखंडाला चुंबकापासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला! प्रल्हादाच्या मनातलं भक्तीचं आणि भगवंताचं खूळ जावं यासाठी गुरुजनांनी अधिक परिश्रम घेतले. साम, दाम, दंड आणि भेदाच्या उपायांचा प्रल्हादावर उत्तम परिणाम झाल्याचं वाटल्यावर पुन्हा त्याला एकवार घरी जाऊ देण्यात आलं. आपल्या पुत्राला पाहाताच हिरण्यकशिपुला प्रेमाचं भरतं आलं. त्याला त्यानं वराच काळ आपल्या छातीशी कवटाळून धरलं. बघा हं! गळाभेट झाली, पण प्रल्हादाच्या कंठातलं नाम काही पित्याच्या गळ्यात उतरलं नाही! हृदयभेट झाली, पण प्रल्हादाच्या हृदयकोषातलं भगवत्प्रेम याच्या हृदयी काही आलं नाही.. प्रेमाश्रूंनी आपल्या लेकाला सिंचित करून हिरण्यकशिपुनं नव्या उमेदीनं विचारलं, ‘‘बाळा सांग.. गुरूगृही तू जे काही शिकलास, जो काही अभ्यास झाला त्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांग!’’ गुरूपुत्रही आतुर होऊन ऐकू लागले.. प्रल्हाद उत्तरला, ‘‘श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीनुसार समर्पित आचरण हाच या जगातला श्रेष्ठ अभ्यास आहे!’’ हे ऐकताच हिरण्यकशिपुचे ओठ संतापानं फडफडू लागले (प्रस्फुटित अधर:!) त्यानं शुक्राचार्याच्या पुत्राला संतप्त स्वरात विचारलं की, ‘‘माझ्या या अजाण पुत्राच्या डोक्यात तुम्ही हे काय भरवलं आहे?’’ गुरूपुत्र उद्गारला, ‘‘हे इंद्रशत्रो! हा मुलगा माझ्या किंवा अन्य कुणाच्याच सांगण्यानं भ्रमित झालेला नाही. ही याची जन्मजात स्वाभाविक बुद्धीच बोलत आहे. (नैसर्गिकीयं मति: अस्य). मग हिरण्यकशिपुनं प्रल्हादाला खडसावलं की, ‘‘हे सारं तू कुठून शिकलास? तुझा बुद्धीभेद कुणी केला?’’ ज्यांची बुद्धी मुळातच खुजी असते त्यांनाच बुद्धीभेदाची सारखी भीती भेडसावत असते. त्यामुळे दैत्यवंशाच्या वारसदारानं विपरीत बुद्धीच्या आहारी जाऊ नये, ही हिरण्यकशिपुची इच्छा होती. पित्याच्या या प्रश्नावर प्रल्हाद काय म्हणाला? मुळातच वाचण्यासारखं आहे हो सारं! तो म्हणाला, ‘‘बाबा, या जगातले सर्वच जीव जे भरडलं गेलं आहे तेच ओरबाडून भरडत आहेत.. जे चघळलं गेलं आहे तेच चघळू पाहात आहेत..’’ काय सुरेख आहे पाहा! जो स्वत: प्रारब्धानं भरडला जात आहे तोच दुसऱ्यालाही आपल्या ‘मी’पणाच्या मदानं भरडू पाहात आहे! जो स्वत: काळाच्या मुखात आहे, काळाच्या कराल दातांखाली आहे तोच दुसऱ्याला ‘खाऊन टाकण्याची’ भाषा करीत आहे! प्रल्हाद सांगत आहे, ‘‘किती जन्म सरले तरी तेच तेच विषय भोगण्यासाठी अतृप्त जीव वारंवार जन्म घेत आहे आणि जगतानाच नरकयातना भोगत आहे.. अशा (मी आणि माझेरूपी) प्रपंचात आसक्त जिवाची बुद्धी कुणाच्या शिकवणुकीवरून आपोआप पालटू शकत नाही. किंवा आपल्या सारख्याच प्रपंचासक्त जिवांच्या संगतीनंही हरिच्या मार्गाकडे ती वळत नाही.’’ प्रल्हाद मग विशुद्ध भक्तीचा महिमा जसजसा गाऊ लागला तसतसा हिरण्यकशिपुचा राग अनावर झाला. मग तोदेखील ‘ज्ञान’ पाजळू लागला. म्हणाला की, ‘‘अरे जो अवघ्या पाच वर्षांत माता-पित्यांच्या प्रेमाला जागू शकला नाही तो विष्णुचं तरी काय हित करणार आहे?’’ जणू विष्णुच्या हिताचीच त्याला काळजी होती! तो क्रुद्धपणे ओरडला की, ‘‘दैत्यांनो जा, याला तात्काळ मारून टाका..’’ आपल्याच पुत्राला निर्दयीपणे ठार मारण्याच्या कृतीचं समर्थन करताना दैत्य म्हणाला, ‘‘आपल्या देहाला जर एखाद्या अवयवाच्या रोगग्रस्त होण्यानं धोका पोहोचत असेल तर तो अवयव कापूनच टाकला पाहिजे. त्यात गैर काहीच नाही. कारण त्यामुळे अन्य शरीर तरी निरोगी राहील आणि माणूस सुखानं जगेल!’’ या आज्ञेनुसार दैत्यांनी प्रयत्न करूनही प्रल्हादाला काहीच झालं नाही तेव्हा स्वत: हिरण्यकशिपुच सरसावला.