हिरण्यकशिपूनं जेव्हा अहंकारानं त्या स्तंभात आपली धारदार तलवार खुपसली तेव्हा ब्रह्मांड थरारले इतका भीषण ध्वनी झाला. राजमहालही हादरला आणि त्या स्तंभातून उग्ररूपी भगवान नृसिंह प्रकटले. शरीर ना धड माणसाचं ना सिंहाचं.. डोळ्यांतून क्रोधाच्या ठिणग्या फुलून बाहेर पडत होत्या.. अंग, चेहरा आणि आयाळ रक्तधारांनी माखली होती जणू सिंहानं एखादी शिकार भक्षिली असावी! भगवंताचं ते उग्र रूप पाहून प्रल्हाद वगळता सर्वच भयकंपित झाले तिथं हिरण्यकशिपूची काय कथा! तरीही हिरण्यकशिपूनं उसनं अवसान आणून भगवंतावर वार करायचा प्रयत्न केला तेव्हा भगवंतानं त्या उंबरठय़ावर त्याला आपल्या नखांनी फाडून जमिनीवर आदळलं. तेव्हा दिवस मावळला होता, पण रात्रीचा समय सुरू झाला नव्हता. भगवंताच्या त्या उग्र रूपाच्या अस्तित्वानं वातावरण कंपित होत होतं. काही क्षण जो-तो त्या अनपेक्षित दृश्यानुभावानं दिङ्मूढ झाला होता. अखेर हिरण्यकशिपूचा अंत झाला आहे हे पाहताच देवांनी सुटकेचा नि:श्वास सोडत आनंद साजरा करायला सुरुवात केली. मात्र भगवंताच्या त्या उग्रावताराचा दाह जाणवू लागताच त्या अवताराला शांत करण्यासाठी काय करावं, या विचारानं देवांनाही चिंतेत टाकलं! अखेर प्रल्हादच सामोरा गेला आणि हात जोडून त्यानं भक्तिपूर्वक आळवणी केली. ‘श्रीमद्भगवता’च्या सप्तम स्कंधाच्या नवव्या अध्यायात या आळवणीचे ४३ श्लोक आहेत! तर या भक्तप्रार्थनेनं भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रल्हादाला वर माग, असं सांगितलं. प्रल्हादानं दिलेलं उत्तर आपण आपल्या चित्तात गोंदवून घ्यावं, असं आहे. प्रल्हाद म्हणाला, ‘‘हे प्रभो! मी जन्मापासूनच भोगात लिप्त आहे. आता वर मागायला सांगून मला आणखी मोहित करू नका! बहुधा माझ्यात भक्ताची खरी लक्षणं उतरली आहेत की नाहीत, हे जोखण्यासाठीच तुम्ही वर मागायला सांगत आहात! हे परमाधारा, तुमच्याकडून ज्याला आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्याशा वाटतात, त्याला सेवक कसं म्हणता येईल? तो तर सौदेबाज! (न स भृत्य: स वै वाणिक्!) जो स्वामींकडून कामनापूर्तीची अपेक्षा करतो तो खरा दास नव्हे आणि जो अखंड सेवा करून घेता यावी या हेतूनं सेवकाची मनोकामना पूर्ण करीत राहतो तो खरा स्वामीच नव्हे! हे प्रभो, मी तुमचा निष्काम सेवक आहे आणि तुम्ही माझे निरपेक्ष स्वामी आहात! म्हणून याउपरही जर मला वर द्यायची तुमची इच्छाच असेल तर मग असा वर द्या की, माझ्या या क्षुद्र हृदयात कधीच कोणती कामना उत्पन्न न होवो!!’’ भक्ताच्या हृदयात सेवेव्यतिरिक्त अन्य कुठलीही मनोकामना उत्पन्न झाली तर काय आंतरिक हानी होते, हे मांडताना प्रल्हाद पुढे म्हणाला की, ‘‘हे भगवन! कारण या हृदयात एकदा का कामना उत्पन्न झाली तर मग इंद्रियं, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, श्री, तेज, स्मृती आणि सत्य हे सर्वच नष्ट होतात!’’ निव्वळ एका मनोकामनेनं तब्बल एकवीस गोष्टींना भक्त कसा अंतरतो, याचं हे विराट वर्णन आहे. सद्गुरूव्यतिरिक्त अन्य मनोकामना उत्पन्न झाली की दहा इंद्रियं आणि मन हे देहाला त्या कामनापूर्तीसाठी राबवू लागतात. त्या कामनापूर्तीसाठी प्राण कंठाशी येतात. बुद्धी आणि लज्जा लयाला जाऊन भक्त आपला सेवाधर्म गमावतो आणि ‘मी तुमची इतकी भक्ती करतो तरी माझी इच्छा अजून पूर्ण का होत नाही,’ असा प्रश्न थेट गुरूला विचारण्याचं धैर्य कमावतो! साधनेसाठीचं धैर्य कायमचं मावळतंच, पण जीवनातलं आध्यात्मिक वैभव (श्री) आणि तपाचरणाचं तेजही झपाटय़ानं ओसरतं. आपल्या जीवनाचं ध्येय काय, याची स्मृती जाते आणि अखेरीस सत्यस्वरूप सद्गुरूचाही भावजीवनातून अस्त होतो! जीवन पूर्ण अभावग्रस्त होतं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा