माणसाच्या जन्माला येऊन अंत:करण व्यापक झालं नाही, तर काय उपयोग? माणसाव्यतिरिक्त या जगात अनंत प्राणी, पक्षी आणि जलचर जन्माला येतात. त्या त्या जन्मात मरणभयाच्या निसर्गप्रदत्त सूक्ष्म अंत:प्रेरणेनुसार ते जगत असतात. भूक शमवण्यापुरती बुद्धी त्यांना लाभलेली असते. निवारा तयार करण्याचे कौशल्य काही पक्षियोनींत आढळते. प्रजननक्षम कालावधीपुरती कामवासना त्यांच्यात दिसते. असे असले तरी, ‘सुख’ वा ‘दु:ख’ भोगताना ‘मी’ म्हणजे अमुक, अशी स्वत:ची जाण त्यांना नसते! जन्मत:च आपल्याला नाव दिलं जातं. आपला जन्म सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा विविध स्तरांवरचा असतो. तरीही त्या नावाची व त्या स्तरानुसार आपण ‘गरीब’ आहोत की ‘श्रीमंत’, ‘संपन्नावस्थेत’ आहोत की ‘विपन्नावस्थेत’ आहोत, याची जाण नसते की भानही नसते. ‘समज’ येऊ लागते तसे प्रथम आपल्याला दुसऱ्या कुणी तरी दिलेल्या नावाशी अखंड सौख्य निर्माण होते. मग मला जे नाव दिलं आहे, माझं जे आडनाव आहे ते धारण करणारा तोच मी, हे ‘मी कोण?’ या प्रश्नाचे कायमचे स्वाभाविक उत्तर होते. मग माझा जो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर असतो किंवा मी प्रयत्नांनी साध्य करतो तो स्तर हादेखील माझी ओळख ठरतो. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्ष्याला ‘ओळखी’चं असं ओझं घेऊन जगावं लागत नाही! मग माझी जी ओळख होते किंवा जी मला भावते ती टिकावी, हाच माझ्या जन्माचा हेतू आहे, असं मला वाटतं. सगळं जगणं त्याभोवतीच आणि त्यापुरतंच केंद्रित होतं. देहाच्या आणि अंत:करणाच्या सगळ्या क्षमता त्यापुरत्याच सदोदित राबवल्या जातात. हाच माझ्या जन्माच्या मूळ उद्दिष्टाचा, माझ्या विलक्षण क्षमतांचा संकोच असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा